Wednesday, July 18, 2007

रेडियोचे दिवस

मागील काळाच्या आठवणींचा कड काढत "गेले ते दिन गेले...' असे रडगाणे गाण्यासाठी हा ब्लॉग नाही. मात्र गेला आठवडाभर गावी काय गेलो (मु. पो. नांदेड, मराठवाडा), भारनियमानाच्या कृपेने सात दिवस आपला जुना जाणता, बापुडा रेडियो हा सोबती पुन्हा गवसला. याच सोबत्याच्या सहवासात अगदी जगावेगळे आनंदाचे क्षण काही एक काळ व्यतित केले. त्यामुळे त्या दिवसांबद्दल भावनांचे कृत्रिम लाऊडस्पिकर न लावताही, एक कृतज्ञता म्हणून या विषयावर लिहावेसे वाटले. रेडियो हा तसा माझ्या बालपणीच अस्तंगत होत चाललेले माध्यम होते. त्याची ओढ लागण्याची काही कारण नव्हते. तेरा-चौदा वर्षांपूर्वी तर एफएम वाहिन्या नसल्यामुळे तर तेही आकर्षण नव्हते. त्याचवेळेस शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यलयात जाण्यास सज्ज झालो होतो. त्यावेळी जमाना होता कॅसेटस्‌चा. गुलशन कुमार यांची टी-सीरीज, तोरानी बंधुंची टीप्स आणि जैन बंधूंची व्हीनस या कंपन्या फॉर्मात होत्या. या कंपन्या नव्या नव्या चित्रपटांचे हक्क तर घेत होत्याच, त्या स्वतःही चित्रपट आणि खासगी अल्बम काढत होत्या. त्या नव्या गाण्यांचा "ट्रॅक' ठेवणे ही जिकीरीचीच बाब होती. (नव्या चित्रपटाच्या आकर्षणाच्या नावाखाली दिवस रात्र तेच ते गाणे आणि दृश्‍यांचे दळण घालणाऱ्या वाहिन्या अजून भारतीय अवकाशात यायच्या होत्या.) या गाण्यांची माहिती घेण्यासाठी आधार होता त्यावेळी विविध भारतीवर सकाळी लागणाऱ्या "चित्रलोक' कार्यक्रमाचा. यातूनच रेडियोशी पहिला संबंध आला. अगदी लहानपणी कधीतरी "बिनाका गीतमाला' ऐकली होती. त्या आठवणी होत्याच. त्यामुळे सर्वात आधी रेडियो सिलोन (आता ते श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) झाले होते. त्यावर सकाळी गाणे ऐकणे सुरू झाले. हळूहळू आमची "वेव्हलेंग्थ' जुळली आणि या संबंधांचे रुपांतर हलकेच नात्यात झाले.सीमा ओलांडलेल्या लहरीत्यानंतर "शॉर्ट वेव्ह'च्या सर्व थांब्यांवर विविध भारती आणि आकाशवाणीच्या शोधात रेडियोचा काटा फिरवू लागलो. अचानक '92च्या एका पावसाळी रात्री रेडियोचा काटा एका स्टेशनवर थांबला. अत्यंत स्वच्छ स्वरांमध्ये हिंदीतून चालू असलेल्या त्या मुलाखतीने त्याच स्टेशनवर काही काळ थांबण्यास प्रवृत्त केले. सुमारे दहा मिनिटांच्या कार्यक्रमानंतर उद्‌घोषिकेने सांगितले, "यह रेडियो जापान है,' अन्‌ मी जागीच उडालो. म्हणजे...हे कार्यक्रम जपानचे आहेत? अजून बुचकळ्यातून बाहेर पडलोही नव्हतो, अन्‌ तितक्‍यात त्याच जागी जपानी भाषा शिकविणारा कार्यक्रम सुरू झाला. जपानी, अन्‌ त्या अर्थाने कोणत्याही परदेशी भाषेशी ही पहिली ओळख! त्या स्टेशनची जागा नीट पाहून घेतली आणि दररोज "रेडियो जापान'च्या हिंदी कार्यक्रमांच्या वाऱ्या सुरू झाल्या. त्यातूनच विविध परदेशी रेडियो संस्थांच्या कार्यक्रमांची ओळख होऊ लागली. जपानपाठोपाठ जर्मनी (डॉइटशे वेले-इंग्रजीहिंदी), बीबीसी (इंग्रजी आणि हिंदी), वॉईस ऑफ अमेरिका (इंग्रजीहिंदी), रेडियो फ्रान्स इंटरनॅशनल, रेडियो ऑस्ट्रेलिया, रेडियो नेदरलॅंडस्‌, रेडियो ऑस्ट्रिया इंटरनॅशनल, रेडियो चायना इंटरनॅशनल ( इंग्रजीहिंदी) अशा एकाहून एक देशांच्या केंद्रांचे कार्यक्रम ऐकण्यात येऊ लागले.

हा छंद जीवाला लावी पिसे
माझ्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांना रेडियो हा फक्त गाण्यांसाठी ऐकायचा असतो, हे माहित होते. मात्र गाण्यांसाठी रेडियोकडे वळलेला मी, या केंद्रांच्या कार्यक्रमांतच जास्त वेळ घालवू लागलो. या कार्यक्रमांत काय असायचे? तर बातम्या, त्या त्या देशाच्या धोरणांची माहिती, काही सांस्कृतिक कार्यक्रम, गाणे, त्या त्या देशांतील भाषा शिकविणारे कार्यक्रम (जर्मन, फ्रेंच, जपानी वगैरे) आणि श्रोत्यांचा पत्रव्यवहार...त्यांपैकी शेवटच्या भागाववर माझे जास्त लक्ष होते. साधारण सहा महिने अशा रितीने विविध लोकांचा पत्रव्यवहार ऐकल्यानंतर आपणही पत्र पाठवावे, असे वाटू लागले. मात्र त्यासाठी लागणाऱ्या "एअर-मेल'चा खर्च कोण करणार? अन्‌ करायचा ठरविला तरी एवढ्या केंद्रांशी किती पत्रे लिहावी लागणार, हा प्रश्‍न होताच. त्यावर एक पर्याय याच केंद्रांनी दिला होता. तो कामी आला. सर्व परदेशी केंद्रांना पाठविलेली पत्रे पंधरा पैशांच्या (त्यावेळी) पोस्ट कार्डावर दिल्लीतील दूतावासाला पाठविण्याची सोय होती. तिथून ती त्या केंद्राकडे पोटत असत. मग काय, एका शुभदिनी उचलली पेन, लावली कार्डाला आणि दिली दिल्लीला जपानी दूतावासाकडे पाठवून. त्यानंतर दोन महिने उलटल्यानंतरही काही उत्तर आले नाही म्हणून पत्र पाठविलेला दिवस शुभ होता का नाही, याबद्दलच शंका वाटू लागली. एके दिवशी कॉलेजमधून घरी आलो, तेव्हा एक मध्यम आकाराचा पिवळा लिफाफा माझी वाट पाहत असलेला दिसला. त्यावरील शिक्काच सांगत होता तो जपानहून आला आहे म्हणून. त्यातील कार्यक्रमांचे वेळापत्रक, माहितीपत्रक इ. इ. बघितल्यानंतर पत्र लिहिलेला दिवस शुभच असल्याची खात्री पटली. याच पाकिटात केंद्राच्या प्रसारणाबाबत एक फॉर्म होता (रिसेप्शन रिपोर्ट). तो भरून पाठविला आणि आणखी दोन महिन्यांनी आणखी एक पाकिट होते. त्यात एक सुंदर कार्ड होते. फॉर्मही होता. मीही फॉर्मात होतो. त्यानंतर जपानच्या केंद्रांसोबतच मी अन्यही केंद्रांना पत्रे पाठविली. सगळीकडून काही ना काही येतच होतं. ही "विदग्ध शारदा' ठेवायला घरात जागा पडू लागली. आलेली कॅलेंडर्स वर्षभरातच कालबाह्य होऊ लागली. त्यांच्यावरची चित्रे अप्रतिम असल्याने ती फेकून देण्याचाही प्रश्‍न नव्हता. बरं, याचसोबत सर्व केंद्रांवरील भाषा शिकण्याच्या कार्यक्रमांच्याही छापील प्रती (अर्थात मागणीवरूनच) येऊ लागल्या. त्याचसोबत न मागितलेल्या प्रतीही येऊ लागल्या. त्यामुळे हिंदीतून जर्मन शिकतानाच जर्मनमधून बंगाली शिकण्याचीही प्रेमळ कसरत करता येऊ लागली.मात्र त्याचवेळीस डॉयशे वेलेच्या एका कार्यक्रमात स्वतःचे नाव ऐकल्यानंतर अचानक झालेला आनंद, रेडियो चीनच्या उद्‌घोषकांचे जोरदार अनुनासिक हिंदी व गमतीशीर तमिळ...या मजेशीर आठवणी अन्य कुठे मिळाल्या असत्या.

एक भीती...फुकटची

रेडियोवरून जे पुकटात मिळेल ते मागवत रहायचं, ही माझी सहजवृत्ती झाली होती. कोणतातरी अज्ञात हात आपल्याला फुकट काही देतोय ही भावना सुखद होतीच. मात्र त्या अज्ञात हाताने एकदा चांगलाच हात दाखवला. "वॉईस ऑफ रशिया'च्या केंद्रावरून जपानमधील "ओम शिनरीक्‍यो' या पंथाचा एक कार्यक्रम सकाळी दहा ते साडे दहा चालत असे. मी तो ऐकत असे. त्यांचे साहित्य मागविण्यासाठी तेही पत्ता देत असत. मला कार्यक्रमाशी काही देणे घेणे नसे. मात्र कशाला फुकट सोडायचे, म्हणून पाठविले त्यांना एक पत्र. काही दिवसांनी आले त्यांचे उत्तर. पंथाचे प्रमुख .....यांच्या छायाचित्रासह त्यांचे तत्वज्ञान सांगणाऱ्या पत्रकांचे एक पाकिट. मी ते पाहिले आणि ठेवून दिले. काही दिवसांनी जपानमध्ये भूमिगत रेल्वेच्या मार्गात विषारी वायू सोडून माणसांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात चौदा जणांचा प्रयत्न केला. या घटनेच्या चौकशीत आपले वरील "ओम शिनरीक्‍यो' साहेबच प्रमुख आरोपी निघाले. त्यांची धरपकड करण्यात आली. त्यांच्या पंथाच्या अनुयायांचीही चौकशी करण्यात येऊ लागली. त्यामुळे इकडे भारतात मी मात्र घाबरलो. सुदैवाने चौकशीचे लोण इथपर्यंत आले नाही. त्यानंतर मात्र मी सरकारी केंद्रांवरच भिस्त ठेवण्याचा निर्णय मी घेतला.


आली लहर केला लहर

रेडियोच्या लहरींनी हा नाद लावला आणि त्याची परिणती अर्थातच अभ्यासावरही झाली. पण त्यामुळे डगमगून जाण्याचं ते वय नव्हतं. इंटरनेट अद्याप आलं नव्हतं आणि दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांचा सुळसुळाट होण्याला नुकतीच सुरवात होऊ लागली होती. त्यामुळे माझ्या वेडाला स्पर्धा किंवा आव्हान असे नव्हतेच. रात्री जागण्याची सवय तेव्हाही होतीच. त्यातून रात्री बेरात्री रेडियोवर कळणारे, न कळणारे असे कोणतेही कार्यक्रम किंवा गाणे ऐकण्यास काही प्रतिबंध नव्हताच. एकदा रात्री दोन वाजता मी रेडियोवर अरबी गाणे ऐकत होतो. (गाण्यांचा अर्थ काय, शब्द काय असे क्षुद्र प्रश्‍न मी कधी पडू दिले नाहीत.) शेजारच्या इमारतीतील काही लोक त्यावेळी कुठल्याशा गावाहून आले होते. घरापुढे आल्यानंतर माझ्या खोलीतून आलेल्या गाण्यांचे स्वर ऐकून त्यांचे घामाघूम झालेले चेहरे हा माझ्या चिरंतन आठवणींचा ठेवा आहे. (ज्यांनी कधी अरबी गाणे ऐकले नाहीत, त्यांना त्यातील चित्तथरारक लज्जत कळणार नाही.) रेडियोने मला खूप दिले. सुमारे नऊपैकी किमान चार भाषा तरी मी रेडियोमुळेच शिकलो. केवळ फ्रेंच वगळता. ती भाषा शिकण्याचे श्रेय इंटरनेट या नव्या मित्राला. रेडियोने मला जसे दिले, तसे मीही रेडियोला बरेच काही दिले. (घरात पडलेले किमान पाच निष्प्राण संच याची साक्ष देतील.) परदेशी रेडियोच्या सोबतीमुळे सामान्य ज्ञान जसे वाढले, तसेच संवादाचा आत्मविश्‍वासही वाढला. पुढे इंटरनेट आले आणि माझ्या या परदेशाच्या कौतुकाचा सोहळा संपुष्टात आला. आता इंटरनेटवर ऑडियो ऑन डिमांडचीही सोय आहे. मात्र त्यात अनिश्‍चिततेतून उद्‌भवणारा आनंद नाही. त्यामुळे "शॉर्ट वेव्ह'च्या माझ्या आठवणी नेहमीच "लॉंग लॉंग' राहतील.

3 comments:

 1. it is very good. im also fan of radio. mala sudha junya aathvnichi jagya zalya

  ReplyDelete
 2. mast lihilay.
  tumchi bakichi posts hi chan ahet.

  ReplyDelete
 3. Vaa! eka uttama blog saapaDalaa.
  Radiobaddal vegaLe vaachaayalaa miLaale.

  ReplyDelete