Thursday, December 27, 2007

इतना सन्नाटा क्यों है भाई

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर नरेंद्र मोदी आरूढ होऊन आता पाच दिवस होत आले आहेत. मात्र या काळात मराठी ब्लॉग (अलिकडे कोणत्याही मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा मी यांवर जास्त भिस्त ठेवतो. ) अथवा माध्यमांमध्ये फारशी चर्चा झालेली दिसत नाही, हे खरोखरीच खूप आश्चर्यकारक आहे. मोदी विरूद्ध इतर सर्व असा (निवडणुकीचा) लढा ज्या गुजरातेत झाला, तेथील वर्तमानपत्रे वगळता कोणीही या विजयाबद्दल फारशा कौतुकाने बोलतानाही दिसत नाही. (या घटनेचाच उल्लेख अगदी अपरिहार्य झाले म्हणून केला असल्यास न कळे!) मोदी यांचा पराभव झाला असता, तर हेच चित्र दिसले असते का, हा प्रश्न त्यामुळेच विचारावासा वाटतो.

गुजरातमधील निवडणुकांबाबतचे हे बिनविरोध मौन मात्र निकालानंतरच जाणवत आहे, अशातला भाग नाही. निवडणुका संपल्यानंतर म्हणजे मतदानाचे दोन टप्पे पार पडल्यानंतरही त्याबाबत लक्षणीय सामसूम होतीच. बोटाला शाई लागलेला मतदार केव्हा एकदा बाहेर पडतो आणि केव्हा आपण त्याच्या ताज्या मतदानाचा अदमास घेऊन एक्झिट पोलची पोतडी दर्शकांपुढे रिकामी करू, अशा बेतात असलेल्या वाहिन्याही यावेळी बेताबेतानेच आपले अंदाज व्यक्त करत होत्या. त्यांना शक्य असतं, तर मोदी यांचा सपशेल पराभव होणार, असा जाहीर हाकारा त्यांनी केव्हाच घातला असता. संपूर्ण प्रचाराच्या काळात आणि मतदानाच्या वेळेसही (स्पष्टच सांगायचं तर गेल्या एक दीड वर्षातही) वाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी आडून आडून तसे सुचविलेही होते. मात्र थेट आपली कल्हई उघडी न करता वेगवेगळ्या मिषाने मोदींचा उपमर्द करण्याचा प्रयत्न चालूच होता.

मोदींच्या विरोधात बंड करणारे कोण, त्यांचा इतिहास काय याचा काडीमात्र अभ्यास न करता त्यांच्या बळावर गुजरातेत भारतीय जनता पक्षाला पराभवास सामोरे जावे लागेल, असे भाकित वर्तविणारे काही जण होते. त्याचप्रमाणे सोनिया गांधी यांच्या 'चाणाक्ष राजकीय' खेळीमुळे सोहराबुद्दीन प्रकरणाच्या जाळ्यात मोदी सपशेल अडकले, असे ठोकून देणारेही या काळात पाहायला मिळाले. एका मोठ्या मराठी वर्तमानपत्राने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मणीनगरमध्ये (नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ) प्रचार सभा घेऊन कॉंग्रेसच्या बाजूने हवा कशी निर्माण केली, याचा ऑंखो देखा हाल वर्णन केला होता. सोहराबुद्दीनप्रकरणी
तिस्ता सेटलवाड सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 'अशा प्रकरणांतून न्यायालयांनी दूर राहायला हवे,' अशा आशयाचा अग्रलेख 'मुंबई समाचार' या १५० वर्षांहून अधिक जुन्या गुजराती वृत्तपत्राने लिहिला होता. मात्र त्याची दखल घेण्याची कोणाला गरज वाटत नव्हती.

रविवारी, २३ डिसेंबरपासून मात्र कोणत्याही तज्ज्ञांचा आवाज ऐकू येईनासा झाला आहे. केवळ हिंदूत्वाच्या आणि पुराणकथांच्या गोष्टी करणाऱयांना विकास काय कळणार, असा प्रश्न विचारणाऱयांना केवळ विकासाच्या मुद्यावर एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याने विजय मिळविल्याचे पाहावे लागावे, यांहून अधिक दुर्दैव ते कोणते? मॅडमनी सांगितले तर मी घरीही बसेन किंवा मॅडमच्या गेल्या पाच पिढ्यांच्या कर्तृत्वामुळेच या देशाला भाग्याचे दिवस आले आहेत, असे सांगणाऱया स्वाभिमानी नेत्यांच्या या देशात, अमेरिकेने व्हीसा नाकारल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्योजकांशी संपर्क साधून विक्रमी गुंतवणूक आकर्षित करणारा नेता काय कामाचा? अशांचे कुठे कौतुक करायचे? त्यामुळे गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या चर्चेची धूळ अचानक खाली बसली आहे. शोलेचे निर्माते जी. पी. सिप्पी यांचे नुकतेच निधन झाले. याच चित्रपटातील एका संवादाची त्यामुळे अवचित आठवण झाली...

"इतना सन्नाटा क्यों है भाई?"

6 comments:

 1. You are absolutely right. It's quite pathetic to see how biased India media is.

  It seems like they get 'hafta' from Congress and Vatican to publish certain news.

  Narendra Modi is not only cleanest politician but he is very aggressive about development as well as Hindutva. We need more people like him.

  As you succinctly captured in your column, the anti-Modi rhetoric that Media was trying to portray was the very reason Modi won the election. It seems people of Gujarat realized this 'game' quite early. Kudos to them!

  And, kudos to your column for capturing the reality correctly.

  Please keep writing.

  ReplyDelete
 2. या विषयावर मला काही फारशी खोलात माहिती नाही. पण लेख आवडला.
  माध्यमांचा मोदींना विरोध होता असे तुमच्या लेखावरून दिसुन येते. मग त्यांच्या जिंकण्याने माध्यमे निराश झाली असल्यानी गप्पं असावीत.
  एक गोष्टं मात्रं मला खटकली की त्यांच्या शपथविधीला राज्याभिषेक असे शिर्षक का देण्यात आले? लोकशाहीमधे ह्या शब्दाला जागा नसावी असे वाटते.

  ReplyDelete
 3. धन्यवाद चिन्मय.
  माध्यमांच्या काही घटकांमध्ये परदेशी पैसा फिरत असतो हे माध्यमांमध्ये काम करणारया अनेकांना माहित आहे. माध्यमांच्या याच विरोधी अपप्रचारामुळे मोदींना यश मिळाले, हे काही प्रमाणात खरे आहे.
  कसं काय,
  कॉमेंटबद्दल धन्यवाद. माध्यमे गप्प आहेत हे खरे आहे, मात्र ते जे बोलताहेत त्यातही त्यांचे गिरे तो भी टांग उपर ही वृत्ती दिसूनच येते. त्यासाठी उदाहरण म्हणून लोकसत्ताचा
  http://loksatta.com/daily/20071224/edt.htm हा अग्रलेख पाहायला हरकत नाही. गेल्या पाच वर्षांत एकही दंगल न झालेल्या राज्याला इथे हिंसेच्या राजकारणाचा मापदंड म्हणण्यात येत आहे. अशा वातावरणात, मोदींच्या शपथविधीला राज्याभिषेक म्हणण्याची प्रवृत्ती याच भावनेचे निदर्शक आहे. त्यातून मोदी हे सर्वाधिकारी प्रवृत्तीचे (म्हणजेच लोकशाहीशी सुसंगत नसलेले) आहेत असे दाखवून देण्याचा सुप्त प्रयत्न असू शकतो.

  ReplyDelete
 4. DD, chaangalaa abhyaasapoorN lekh lihila ahet.
  btw, tumhi tech 'devidas deshpande' ka je 'Sakal" madhe lihitat?

  ReplyDelete
 5. धन्यवाद पूनम.
  हो, मी सकाळमध्येच काम करतो. त्यात अधूनमधून माझे लेख प्रकाशित होतात.

  ReplyDelete
 6. Good Article DD. MOdi is great and Media is useless.

  I have also written about modi on my blog. my blog is
  http://ashishchandorkar.blogspot.com

  please read and comment also.

  ReplyDelete