Saturday, July 21, 2007

मी एक "एसएमएस्शाह'

मी या जगात आलो तेव्हापासून हे जग सुधारण्याची मला तीव्र तळमळ होती. मात्र काय करणार, एक सामान्य माणूस म्हणून माझ्या हातात काही शस्त्र नव्हते. त्यामुळे "उद्धवा, अजब तुझे सरकार' असे गात (मनातल्या मनात) मला रहावे लागत असे. मात्र पाच वर्षांपूर्वी या भारतवर्षात वृत्तवाहिन्यांनी "संभवामि युगे युगे' करत अवतार घेतला आणि समस्त "विनाशायच दुष्कृतां' होऊ लागले. तरीही काहीतरी उणं असल्याची जाणीव मनाला बोचत होती. त्या विनाशाच्या कामात आपला खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळत नव्हती. त्यामुळे रुखरुख लागून राहिली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी देशात मोबाईल क्रांती होऊ लागली. या मोबाईल क्रांतीने स्वतःची पिल्ले खाण्याऐवजी वेगळ्या पिल्लांना जन्म दिला. त्यातून संवादाचे पूल उभारले जाऊ लागले. त्यातच आमच्या हाती एक अजब उपकरण आले, त्याचा उपयोग आम्ही कधी शस्त्र तर कधी साधन म्हणून करू लागलो. ते शस्त्र म्हणजे एसएमएस.
या साधनाने मी या जगात एवढी उलथापालथ केली आहे, जगाचा एवढा चेहरामोहरा बदलला आहे, की मला आता लोकांनी "एसएमएस्शाह' (शहेनशहाच्या धर्तीवर) म्हणायला हरकत नाही.या जगातील विषमता, अज्ञान, अन्याय वगैरे निरनिराळे दुर्गुण पाहून पूर्वी मला चीड यायची. आता मात्र मी मोबाईलच्या काही कळा दाबून जगाची ही अवकळा बदलू शकतो. मी एक एसएमएस करायचा अवकाश, या जगात जे काही उदात्त, मंगल वगैरे व्हायचे असेल ते घडू शकते. देशाच्या राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील याच निवडून याव्यात, असे मत मी तीन वाहिन्यांना एसएमएसद्वारे पाठविले होते. आज बघा, त्या निवडून आल्या आहेत. तेही प्रचंड मतांनी. मी एकच एसएमएस केला असता तर त्या साध्या निवडून आल्या असत्या. भारतात अतिवृष्टीचे प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेल्या हवामानातील बदलांमुळेच वाढले आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी व्हायला पाहिजे, असे मत मी एका हिंदी वाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमानंतर एसएमएसद्वारे नोंदविले होते. त्याचा परिणाम म्हणून तापमानवाढही कमी झाली आणि त्यामुळे अतिवृष्टीही कमी झाली. माझ्या एसएमएसमुळेच हा क्रांतीकारी परिणाम झाला.
एकदा आम्ही कुटुंबासह भाजी खरेदी करून घरी परतत होतो. त्या दिवशी भोपळा दोन रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे एकदम पाच किलो विकत घेतले होते. रस्त्यातच एका दुकानात अमेरिकी सैनिकांना इराकमधून परत बोलाविण्याबद्दल सिनेटमध्ये चाललेल्या चर्चेची बातमी दाखवत होते. लगेच घरी येताच आधी ती वाहिनी लावली. त्यानंतर केला एक एसएमएस...‘इराकमध्ये अमेरिकी साम्राज्यवादी धोरणांची हद्द झाली असून, अमेरिकी सैन्य परत आलेच पाहिजे.’ गंमत बघा, दुसऱ्याच दिवशी इराकमधील अमेरिकी सैनिकांसाठी निधी वाढविण्यास सिनेटने नकार दिला.
संपूर्ण जंबुद्वीपाच्या (भारताचे प्राचीन नाव हो. "इंडियन सबकॉन्टिनंट'ची एकात्मता दर्शविण्यासाठी हेच नाव पाहिजे) जनतेप्रमाणे क्रिकेट हा माझाही जन्मसिद्ध हक्क आहे. क्रिकेट हा खेळण्यासाठी नसून, आपली तज्ज्ञ मतं व्यक्त करण्यासाठी केलेली सोय आहे, यावरही माझी इतरांपेक्षा अंमळ जास्तच श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच श्रद्धेचे प्रतिबिंब एसएमएसमधूनही पडायला नको? त्यामुळेच विविध वाहिन्यांवर क्रिकेटची कॉमेंटरी कमी पडेल एवढे एसएमएस मी केले. त्याचा परिणामही भारतीय संघाच्या कामगिरीवर पडलेला दिसला. संघाची तयारी कमी आहे, असा एसएमएस मी संघ वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वीच केला होता. त्यानंतर विश्‍वचषक स्पर्धेत संघाची झालेली वाताहात सर्वांच्या समोर आहे. या पराभवातूनही संघ सावरेल, असा एसएमएस मी एका वाहिनीला केला होता. त्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशमध्ये विजय मिळविला, दक्षिण आफ्रिकेतही चांगली कामगिरी केली.
एसएमएस बाबत मी एवढा तज्ज्ञ झाल्यामुळे माझा आत्मविश्‍वास चांगलाच वाढला आहे. मात्र त्याचा मला कधी कधी अवचित फटका बसतो. एक हिंदी वृत्तवाहिनी एका प्रेमप्रकरणाचा "आँखो देखा हाल' प्रसारीत करत होती. त्यावर प्रथेप्रमाणे प्रतिक्रियांचे एसएमएसही मागविले होते. मीही अशा बाबती मागे राहतो काय? मीही एसएमएस केला. "प्रेमप्रकरण ही काळाची गरज असून, प्रत्येकाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे,' अशा आशयाचा एसएमएस मी केला होता. कसा माहित नाही, तो एसएमएस जायच्या जागी न जाता वाट चुकला आणि वाहिनीऐवजी एका "वहिनी'च्या मोबाईलवर पोचला. त्यानंतर माझे हाल येथे सांगण्यासारखे नाहीत. मात्र जगाच्या सुधारणेचा वसा घेतलेला असल्याने आणि एसएमएस या माध्यमावर माझी नितांत श्रद्धा असल्याने अशा क्षुल्लक प्रकारांनी विचलीत होणाऱ्यांपैकी मी नाही.
या जगात सर्व तऱ्हेचे परिवर्तन मी एसएमएसच्या माध्यमातून करू शकेन, याचा मला विश्‍वास आहे. तुमच्या गल्लीतील रस्त्यावर खड्डा पडला आहे? राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास नकार दिला आहे? केंद्रातील मंत्रिमंडळातून एखाद्या मंत्र्याला काढावे, असे तुम्हाला वाटते? आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळावा, असे तुम्हाला वाटते? जगात सगळीकडे दहशतवाद आणि अशांतता पसरली असून, केवळ भारतीय संस्कृतीच ही परिस्थिती बदलू शकते, असे तुम्हाला वाटते?आधुनिक विज्ञानाचा अध्यात्माशी आणि शिक्षणाचा अज्ञानाशी मेळ घालायला हवा, असे तुम्हाला वाटते? ईश्‍वर हा एखादा करबुडवा सरकारी कर्मचारी असून, त्याला रिटायर करायला हवे, असे तुम्हाला वाटते? तुम्हाला काहीही वाटत नसलं तरी तुमचे नाव सगळीकडे पोचायला पाहिजे, असे तुम्हाला वाटते?
प्रश्‍न अनेक, उत्तर मात्र एक आणि एकच! एसएमएस!!!
सर्व समस्यांवर रामबाण उपाय. हे विश्‍व घडविणाऱ्या ब्रह्मदेवालाही एवढ्या घडामोडींवर मार्ग काढणारा आणि घडामोड करणारा एसएमएस घडविता आला नाही. आधुनिक विज्ञानाने हे साधन शोधून या जगात सर्व विषयांत तज्ज्ञ असलेल्यांची एक नवी जमात निर्माण केली आहे. त्याबद्दल विज्ञानाचे आभार आणि तुम्हाला काय वाटतं, एसएमएस हे खरंच क्रांतीकारी साधन आहे का. तुमची मतं जरूर एसएमएसने कळवा हं.

Friday, July 20, 2007

विक्रमादित्य "शिवाजी द बॉस' हिंदीत बोलणार!

मिळ चित्रपट असूनही माध्यमांनी निर्माण केलेली उत्सुकता आणि रजनीकांतची लोकप्रियता, यामुळे "शिवाजी द बॉस'ची सर्वत्र घोडदौड चालू आहे. उत्तर भारत आणि परदेशांत उत्पन्नाचे विक्रम करणारा "शिवाजी द बॉस' आता हिंदीत येणार आहे. हा चित्रपट "डब' करण्याचा निर्णय "एव्हीएम प्रॉडक्‍शन्स' या निर्मिती संस्थेने घेतला आहे. चित्रपटाचा संगीतकार ए. आर. रहमान आणि दिग्दर्शक एस. शंकर परदेशातून आल्यानंतर कंपनीने त्यांच्या संमतीने याबाबतची घोषणा केली आहे.
"शिवाजी द बॉस' गेल्या 15 जूनला प्रदर्शित झाला. त्यानंतर उत्तर भारतातून या चित्रपटाने आतापर्यंत दीड कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. उत्तर भारतात या चित्रपटाच्या तीसहून अधिक "प्रिंट'चे अद्याप खेळ चालू आहेत. त्यामुळे दक्षिण भारत वगळता देशाच्या अन्य भागांतही अधिकाधिक व्यवसाय मिळविता यावा, यासाठी हा चित्रपट हिंदी भाषेत "डब' करण्यात येणार आहे. मुंबईतही या चित्रपटाने सतत "हाऊसफुल शो' करून तमिळ चित्रपटांच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे.
हिंदीत "डब' केल्यानंतर "शिवाजी'च्या 120 प्रिंट काढण्यात येणार असून, तमिळ चित्रपटांच्या बाबतीतील तोही एक विक्रम ठरणार आहे. कोणत्याही "डब' चित्रपटाच्या आतापर्यंत एवढ्या प्रती काढण्यात आल्या नव्हत्या."शिवाजी द बॉस'चा दिग्दर्शक शंकर असून, त्याचे आठपैकी सात चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरले आहेत. त्यातील अनेक चित्रपट हिंदीत "रिमेक' अथवा "डब' करण्यात आले आणि या हिंदी आवृत्त्यांनीही भरपूर यश मिळविले. "जंटलमन' (रिमेकचा दिग्दर्शक महेश भट्ट), "हम से है मुकाबला' (मूळ तमिळ कादलन), "नायक' (मूळ तमिळ मुदलवन), "हिंदुस्थानी' (इंदियन), "जीन्स' व गेल्या वर्षीचा "अपरिचित' (मूळ तमिळ अन्नियन) हे त्यातील काही चित्रपट. त्यामुळे "शिवाजी'च्या हिंदी आवृत्तीलाही मोठे यश मिळेल, अशी खात्री वितरकांना आहे. "शिवाजी' प्रदर्शित झाल्यापासून उत्तर भारतातून वितरकांनी जास्तीत जास्त प्रिंट पाठविण्याचा आग्रह केल्यामुळेही हा निर्णय घेण्यात आल्याचे "एव्हीएम'कडून सांगण्यात आले आहे.
या चित्रपटाचे परदेशातील वितरण हक्क असणाऱ्या "अय्यंगारन इंटरनॅशनल'ने चिनी आणि जपानी भाषेतही हा चित्रपट डब करून प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांनी कितीही नावे ठेवली, तरी रजनीकांतच्या "शिवाजी'ने भारतीय प्रादेशिक चित्रपटांनी जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद होत आहे. आतापर्यंतच्या त्याच्या विक्रमांची ही जंत्रीच पहाः-
n दुबईत "शिवाजी'ने नुकतेच 30 दिवस पूर्ण केले. दुबईत आतापर्यंत केवळ "टायटॅनिक' आणि "चंद्रमुखी' (तोही रजनीकांतचाच) याच चित्रपटांनी तीस दिवस पूर्ण केले.
n "शिवाजी' चित्रपटाचे परदेशातील वितरणाचे हक्क 25 लाख डॉलर्सला विकले होते. आता चार आठवड्यानंतर या चित्रपटाने परदेशात 400 टक्के नफा कमावला आहे.
n मलेशियात या चित्रपटाने 80 लाख मलेशियन रिंगिटची कमाई करून तिकीट खिडकीवरील उत्पन्नाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
n "लॉस एंजेल्स टाईम्स'ने "शिवाजी'च्या यशाची दखल घेऊन "बॉलिवूड ही चित्रपटाबद्दल विशेष लेख प्रकाशित केला. त्यात प्रादेशिक चित्रपटांबद्दल कौतुकाचे लेखन आहे.

Wednesday, July 18, 2007

रेडियोचे दिवस

मागील काळाच्या आठवणींचा कड काढत "गेले ते दिन गेले...' असे रडगाणे गाण्यासाठी हा ब्लॉग नाही. मात्र गेला आठवडाभर गावी काय गेलो (मु. पो. नांदेड, मराठवाडा), भारनियमानाच्या कृपेने सात दिवस आपला जुना जाणता, बापुडा रेडियो हा सोबती पुन्हा गवसला. याच सोबत्याच्या सहवासात अगदी जगावेगळे आनंदाचे क्षण काही एक काळ व्यतित केले. त्यामुळे त्या दिवसांबद्दल भावनांचे कृत्रिम लाऊडस्पिकर न लावताही, एक कृतज्ञता म्हणून या विषयावर लिहावेसे वाटले. रेडियो हा तसा माझ्या बालपणीच अस्तंगत होत चाललेले माध्यम होते. त्याची ओढ लागण्याची काही कारण नव्हते. तेरा-चौदा वर्षांपूर्वी तर एफएम वाहिन्या नसल्यामुळे तर तेही आकर्षण नव्हते. त्याचवेळेस शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यलयात जाण्यास सज्ज झालो होतो. त्यावेळी जमाना होता कॅसेटस्‌चा. गुलशन कुमार यांची टी-सीरीज, तोरानी बंधुंची टीप्स आणि जैन बंधूंची व्हीनस या कंपन्या फॉर्मात होत्या. या कंपन्या नव्या नव्या चित्रपटांचे हक्क तर घेत होत्याच, त्या स्वतःही चित्रपट आणि खासगी अल्बम काढत होत्या. त्या नव्या गाण्यांचा "ट्रॅक' ठेवणे ही जिकीरीचीच बाब होती. (नव्या चित्रपटाच्या आकर्षणाच्या नावाखाली दिवस रात्र तेच ते गाणे आणि दृश्‍यांचे दळण घालणाऱ्या वाहिन्या अजून भारतीय अवकाशात यायच्या होत्या.) या गाण्यांची माहिती घेण्यासाठी आधार होता त्यावेळी विविध भारतीवर सकाळी लागणाऱ्या "चित्रलोक' कार्यक्रमाचा. यातूनच रेडियोशी पहिला संबंध आला. अगदी लहानपणी कधीतरी "बिनाका गीतमाला' ऐकली होती. त्या आठवणी होत्याच. त्यामुळे सर्वात आधी रेडियो सिलोन (आता ते श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) झाले होते. त्यावर सकाळी गाणे ऐकणे सुरू झाले. हळूहळू आमची "वेव्हलेंग्थ' जुळली आणि या संबंधांचे रुपांतर हलकेच नात्यात झाले.सीमा ओलांडलेल्या लहरीत्यानंतर "शॉर्ट वेव्ह'च्या सर्व थांब्यांवर विविध भारती आणि आकाशवाणीच्या शोधात रेडियोचा काटा फिरवू लागलो. अचानक '92च्या एका पावसाळी रात्री रेडियोचा काटा एका स्टेशनवर थांबला. अत्यंत स्वच्छ स्वरांमध्ये हिंदीतून चालू असलेल्या त्या मुलाखतीने त्याच स्टेशनवर काही काळ थांबण्यास प्रवृत्त केले. सुमारे दहा मिनिटांच्या कार्यक्रमानंतर उद्‌घोषिकेने सांगितले, "यह रेडियो जापान है,' अन्‌ मी जागीच उडालो. म्हणजे...हे कार्यक्रम जपानचे आहेत? अजून बुचकळ्यातून बाहेर पडलोही नव्हतो, अन्‌ तितक्‍यात त्याच जागी जपानी भाषा शिकविणारा कार्यक्रम सुरू झाला. जपानी, अन्‌ त्या अर्थाने कोणत्याही परदेशी भाषेशी ही पहिली ओळख! त्या स्टेशनची जागा नीट पाहून घेतली आणि दररोज "रेडियो जापान'च्या हिंदी कार्यक्रमांच्या वाऱ्या सुरू झाल्या. त्यातूनच विविध परदेशी रेडियो संस्थांच्या कार्यक्रमांची ओळख होऊ लागली. जपानपाठोपाठ जर्मनी (डॉइटशे वेले-इंग्रजीहिंदी), बीबीसी (इंग्रजी आणि हिंदी), वॉईस ऑफ अमेरिका (इंग्रजीहिंदी), रेडियो फ्रान्स इंटरनॅशनल, रेडियो ऑस्ट्रेलिया, रेडियो नेदरलॅंडस्‌, रेडियो ऑस्ट्रिया इंटरनॅशनल, रेडियो चायना इंटरनॅशनल ( इंग्रजीहिंदी) अशा एकाहून एक देशांच्या केंद्रांचे कार्यक्रम ऐकण्यात येऊ लागले.

हा छंद जीवाला लावी पिसे
माझ्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांना रेडियो हा फक्त गाण्यांसाठी ऐकायचा असतो, हे माहित होते. मात्र गाण्यांसाठी रेडियोकडे वळलेला मी, या केंद्रांच्या कार्यक्रमांतच जास्त वेळ घालवू लागलो. या कार्यक्रमांत काय असायचे? तर बातम्या, त्या त्या देशाच्या धोरणांची माहिती, काही सांस्कृतिक कार्यक्रम, गाणे, त्या त्या देशांतील भाषा शिकविणारे कार्यक्रम (जर्मन, फ्रेंच, जपानी वगैरे) आणि श्रोत्यांचा पत्रव्यवहार...त्यांपैकी शेवटच्या भागाववर माझे जास्त लक्ष होते. साधारण सहा महिने अशा रितीने विविध लोकांचा पत्रव्यवहार ऐकल्यानंतर आपणही पत्र पाठवावे, असे वाटू लागले. मात्र त्यासाठी लागणाऱ्या "एअर-मेल'चा खर्च कोण करणार? अन्‌ करायचा ठरविला तरी एवढ्या केंद्रांशी किती पत्रे लिहावी लागणार, हा प्रश्‍न होताच. त्यावर एक पर्याय याच केंद्रांनी दिला होता. तो कामी आला. सर्व परदेशी केंद्रांना पाठविलेली पत्रे पंधरा पैशांच्या (त्यावेळी) पोस्ट कार्डावर दिल्लीतील दूतावासाला पाठविण्याची सोय होती. तिथून ती त्या केंद्राकडे पोटत असत. मग काय, एका शुभदिनी उचलली पेन, लावली कार्डाला आणि दिली दिल्लीला जपानी दूतावासाकडे पाठवून. त्यानंतर दोन महिने उलटल्यानंतरही काही उत्तर आले नाही म्हणून पत्र पाठविलेला दिवस शुभ होता का नाही, याबद्दलच शंका वाटू लागली. एके दिवशी कॉलेजमधून घरी आलो, तेव्हा एक मध्यम आकाराचा पिवळा लिफाफा माझी वाट पाहत असलेला दिसला. त्यावरील शिक्काच सांगत होता तो जपानहून आला आहे म्हणून. त्यातील कार्यक्रमांचे वेळापत्रक, माहितीपत्रक इ. इ. बघितल्यानंतर पत्र लिहिलेला दिवस शुभच असल्याची खात्री पटली. याच पाकिटात केंद्राच्या प्रसारणाबाबत एक फॉर्म होता (रिसेप्शन रिपोर्ट). तो भरून पाठविला आणि आणखी दोन महिन्यांनी आणखी एक पाकिट होते. त्यात एक सुंदर कार्ड होते. फॉर्मही होता. मीही फॉर्मात होतो. त्यानंतर जपानच्या केंद्रांसोबतच मी अन्यही केंद्रांना पत्रे पाठविली. सगळीकडून काही ना काही येतच होतं. ही "विदग्ध शारदा' ठेवायला घरात जागा पडू लागली. आलेली कॅलेंडर्स वर्षभरातच कालबाह्य होऊ लागली. त्यांच्यावरची चित्रे अप्रतिम असल्याने ती फेकून देण्याचाही प्रश्‍न नव्हता. बरं, याचसोबत सर्व केंद्रांवरील भाषा शिकण्याच्या कार्यक्रमांच्याही छापील प्रती (अर्थात मागणीवरूनच) येऊ लागल्या. त्याचसोबत न मागितलेल्या प्रतीही येऊ लागल्या. त्यामुळे हिंदीतून जर्मन शिकतानाच जर्मनमधून बंगाली शिकण्याचीही प्रेमळ कसरत करता येऊ लागली.मात्र त्याचवेळीस डॉयशे वेलेच्या एका कार्यक्रमात स्वतःचे नाव ऐकल्यानंतर अचानक झालेला आनंद, रेडियो चीनच्या उद्‌घोषकांचे जोरदार अनुनासिक हिंदी व गमतीशीर तमिळ...या मजेशीर आठवणी अन्य कुठे मिळाल्या असत्या.

एक भीती...फुकटची

रेडियोवरून जे पुकटात मिळेल ते मागवत रहायचं, ही माझी सहजवृत्ती झाली होती. कोणतातरी अज्ञात हात आपल्याला फुकट काही देतोय ही भावना सुखद होतीच. मात्र त्या अज्ञात हाताने एकदा चांगलाच हात दाखवला. "वॉईस ऑफ रशिया'च्या केंद्रावरून जपानमधील "ओम शिनरीक्‍यो' या पंथाचा एक कार्यक्रम सकाळी दहा ते साडे दहा चालत असे. मी तो ऐकत असे. त्यांचे साहित्य मागविण्यासाठी तेही पत्ता देत असत. मला कार्यक्रमाशी काही देणे घेणे नसे. मात्र कशाला फुकट सोडायचे, म्हणून पाठविले त्यांना एक पत्र. काही दिवसांनी आले त्यांचे उत्तर. पंथाचे प्रमुख .....यांच्या छायाचित्रासह त्यांचे तत्वज्ञान सांगणाऱ्या पत्रकांचे एक पाकिट. मी ते पाहिले आणि ठेवून दिले. काही दिवसांनी जपानमध्ये भूमिगत रेल्वेच्या मार्गात विषारी वायू सोडून माणसांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात चौदा जणांचा प्रयत्न केला. या घटनेच्या चौकशीत आपले वरील "ओम शिनरीक्‍यो' साहेबच प्रमुख आरोपी निघाले. त्यांची धरपकड करण्यात आली. त्यांच्या पंथाच्या अनुयायांचीही चौकशी करण्यात येऊ लागली. त्यामुळे इकडे भारतात मी मात्र घाबरलो. सुदैवाने चौकशीचे लोण इथपर्यंत आले नाही. त्यानंतर मात्र मी सरकारी केंद्रांवरच भिस्त ठेवण्याचा निर्णय मी घेतला.


आली लहर केला लहर

रेडियोच्या लहरींनी हा नाद लावला आणि त्याची परिणती अर्थातच अभ्यासावरही झाली. पण त्यामुळे डगमगून जाण्याचं ते वय नव्हतं. इंटरनेट अद्याप आलं नव्हतं आणि दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांचा सुळसुळाट होण्याला नुकतीच सुरवात होऊ लागली होती. त्यामुळे माझ्या वेडाला स्पर्धा किंवा आव्हान असे नव्हतेच. रात्री जागण्याची सवय तेव्हाही होतीच. त्यातून रात्री बेरात्री रेडियोवर कळणारे, न कळणारे असे कोणतेही कार्यक्रम किंवा गाणे ऐकण्यास काही प्रतिबंध नव्हताच. एकदा रात्री दोन वाजता मी रेडियोवर अरबी गाणे ऐकत होतो. (गाण्यांचा अर्थ काय, शब्द काय असे क्षुद्र प्रश्‍न मी कधी पडू दिले नाहीत.) शेजारच्या इमारतीतील काही लोक त्यावेळी कुठल्याशा गावाहून आले होते. घरापुढे आल्यानंतर माझ्या खोलीतून आलेल्या गाण्यांचे स्वर ऐकून त्यांचे घामाघूम झालेले चेहरे हा माझ्या चिरंतन आठवणींचा ठेवा आहे. (ज्यांनी कधी अरबी गाणे ऐकले नाहीत, त्यांना त्यातील चित्तथरारक लज्जत कळणार नाही.) रेडियोने मला खूप दिले. सुमारे नऊपैकी किमान चार भाषा तरी मी रेडियोमुळेच शिकलो. केवळ फ्रेंच वगळता. ती भाषा शिकण्याचे श्रेय इंटरनेट या नव्या मित्राला. रेडियोने मला जसे दिले, तसे मीही रेडियोला बरेच काही दिले. (घरात पडलेले किमान पाच निष्प्राण संच याची साक्ष देतील.) परदेशी रेडियोच्या सोबतीमुळे सामान्य ज्ञान जसे वाढले, तसेच संवादाचा आत्मविश्‍वासही वाढला. पुढे इंटरनेट आले आणि माझ्या या परदेशाच्या कौतुकाचा सोहळा संपुष्टात आला. आता इंटरनेटवर ऑडियो ऑन डिमांडचीही सोय आहे. मात्र त्यात अनिश्‍चिततेतून उद्‌भवणारा आनंद नाही. त्यामुळे "शॉर्ट वेव्ह'च्या माझ्या आठवणी नेहमीच "लॉंग लॉंग' राहतील.