Wednesday, September 5, 2007

जाको राखे साईयां...!

तीन दशकांच्या आयुष्यात अनेक अपघाताचे प्रसंग...अनेक छोट्या मोठ्या घटना जवळून पाहिल्या. आता वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम करताना तर दररोज अपघाताच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र "अपघात" फेम मुंबई-पुणे "एक्‍स्प्रेस हाय-वे"वर स्वतः अनुभवलेला अपघात आयुष्यातला आतापर्यंतचा सर्वाधिक थरारक अन्‌ भीतीदायक अनुभव ठरला. मृत्यूजवळ येऊन अगदी केसाच्या अं तराने त्यातून बचावणे म्हणजे काय, हे त्यादिवशी कळाले.
लॉजमध्ये असताना नितिन याची ओळख झाली होती. त्यावेळी मला महिना सहा हजार रुपये पगार होता आणि तो नोकरीसाठी वणवण भटकत होता. नंतर सुदैवाने त्याला "एचएसबीसी'त नोकरी लागली. आता तो माझ्यापेक्षा (आताच्या पगारापेक्षाही) तिप्पट कमावतो. गेल्या वर्षी तो लंडनला जाऊन आला. तरीही अजून त्याने आठवण ठेवली आहे. त्याच्या मित्राला लंडनला जाण्यासाठी निरोप देण्यासाठी जायचे होते. त्यामुळे त्याने बोलाविल्यावर मी हो म्हणालो. रात्रीची ड्यूटी आटोपून बाहेर पडलो तेव्हा नितीन त्याच्या मित्रांसह आणि "तवेरा" गाडीसह तयार होता. गाडीत बसल्यावर त्याच्या मित्रांशी ओळख झाली. त्यातील सुरेश हा लंडनला निघाला होता; तर कार्तिक त्याच्यासोबत कंपनीत काम करत होता. कार्तिक समोर ड्रायव्हरशेजारी आणि आम्ही मागे बसलो होतो. सर्वात मागच्या बाजूला सामान होते.
गाडीने पुणे सोडले तेव्हा गाडीचा वेग साठ ते सत्तर किमी होता. एक्‍स्प्रेस वेला लागल्यावर तो वेग 75 वर आला. मात्र ड्रायव्हर चांगली गाडी चालवत असल्याने आमची काही तक्रार नव्हती. मध्ये एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. त्यावेळी चहासाठी दहा रुपये देताना लक्षात आले, की पाकिटात तीसच रुपये होते. बाकीचे पैसे घरी ठेवले होते. मात्र घरी जायला वेळच मिळाला नसल्याने पैसै तिथेच राहिले. चहाचे पैसे दिल्यानंतर केवळ उरले वीस रुपये. गाडी मित्रांनी भाड्याने केलेली असल्याने तो खर्च माझ्यावर न व्हता. तरीही आणखी खर्चाचे काय करायचे, हा विचार चालू होता.

एव्हाना गाडीतले चालक वगळता सर्वजण झोपले होते. आता मी "बॅटमन' असल्याने (म्हणजे वटवाघूळ वर्गीय मनुष्य) मी झोपण्याचा प्रश्‍नच नव्हता. केवळ अधूनमधून डोळे झाकत होतो. मध्यंतरी एकदा डोळे उघडले तेव्हा आमची जीप एका ट्रकच्या दिशेने जाताना दिसली. पापणी मिटली आणि ती उघडायच्या आत, किंवा ड्रायव्हरला सावध करण्यासाठी ओरडण्याच्या आत "थाऽऽऽऽड' असा आवाज झाला. पुढच्या क्षणी डोळे उघडले तेव्हा मी समोरच्या सीटवर पडलो होतो...शेजारील नितीन समोरच्या दोन सीटमधील पोकळीत पडलेला...पलिकडचा सुरेश त्याच्या समोरच्या सीटवर आदळलेला...
सर्वात आधी जाणवले बाजूचा दरवाजा उघडून ड्रायव्हर बाहेर गेला...सहा-सात पावले मागच्या दिशेने गेल्यानंतर तो रस्त्यातच कोसळला. मीही दरवाजा उघडून बाहेर पडलो. सर्वांना बाहेर काढले. कार्तिकचा सर्व चेहरा रक्‍ताने माखला होता. तो बेशुद्धच होता. त्यामुळे बाहेर काढताच तो खाली पडला. नितीनचा ओठ पूर्ण फाटला होता. सुरेशच्या नाकातून रक्त येत होते. त्यांचे रक्ताळलेले चेहरे पाहून मी स्वतःच्या चेहऱ्यावरून दोन-तीनदा हात फिरवून पाहिला. पण मला काहीही झालेले नव्हते. केवळ पायाला थोडेसे खरचटले होते आणि समोरच्या सीटवर पडल्याने मुका मार लागला. त्यावेळी नशीब बलवत्तर असल्याची जाणीव झाली.
चांगले नशीब एवढ्यावरच थांबले नाही. त्यामुळे हा प्रकार घडला नाही तोच पॅट्रोलवर असलेले हायवे पोलिस तिथे दाखल झाले. त्यांनी लगेच ऍम्ब्युलन्सला कॉल लावला. दहा मिनिटांत ती दाखल झाली. त्यापूर्वी पोलिसांनी सर्वांचे नाव-गाव लिहून घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "तवेरा' ट्रकला धडकल्‌ यानंतर ट्‌कच्या मागच्या बाजूला अडकली व पुढे घासत गेली. काही असो, गाडीतल पाच जणांपैकी केवळ मीच सहीसलामत राहिल्याने सगळी माहिती, जबाब देण्याची जबाबदारी पडली. ते होईपर्यंत सर्वां ना ऍम्बुलन्समध्ये बसविले. आता ऍम्बुलन्सच्या चालकाशेजारी बसण्याची जबाबदारी माझी होती. पनवेलच्या "लाईफ लाईन' हॉस्पिटलच्या दिशेने ऍम्बुलन्स निघाली. ते तीस किलमीटर आता मला प्रकाशवर्षांसारखी भासू लागली. एक नजर रस्तावर आणि एक नजर ऍम्बुलन्सच्या स्पीडमीटर वर होती. त्याचा काटा 80च्या पुढे गेल्यावर अंगावरही "काटा' उभा रहायचा. हॉस्पिटलला गेल्यावर घड्याळात पा हिले...चार वाजून दहा मिनिटे. म्हणजे अपघात साधारण साडेतीन वाजता झाला होता.
रात्री हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. ड्रायव्हर आणि कार्तिक दिसतानाच गंभीर दिसत असल्याने त्यांना तडक "आयसीयू'मध्ये पाठविण्यात आले. सुरेशच्या नाकातील रक्तवाहिनी फुटल्याने आणि डोळ्या ंखाली मार लागल्याने चेहरा सुजला होता. त्याला व नितीनला "रिकव्हरी रूम'मध्ये ठेवण्यात आले. मला सामान आणि काही गरज पडल्यास थांबावे लागले. खिशात वीसच रुपये असल्याने काय करावे, हा प्रश्‍नच होता. पुण्यातील मित्राला फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्याने स्वतः न येता कंपनीतील साहेबांकरवी पैसे मिळण्याची व्यवस्था केली. त्यामुळे तेवढी तरी सोय झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी "एचएसबीसी'तील लोकं येण्यास सुरवात झाली. सुरेशला जाता येणार नव्हते. त्‌ याने तिकिटच रद्द केले. डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार, या सर्वांना चोवीस तास ठेवावे लागणार होते. त्यात जो येईल त्याला सर्व घटनेची हकीगत सांगावी लागत असल्याने कंटाळा आला होता. अन्‌ येणारा प्रत्येक जण विचारत होता, ""तुम्हाला कसं काय लागलं नाही?''
त्यांना काय सांगणार, देव तारी त्याला "तवेरा' काय मारी?

ड्रायव्हर वगळता सर्वांचे मित्र आणि नातेवाईक आल्यानंतर पुण्याकडे निघण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे सकाळी साडे सहाला स्टॅंडवर जाऊन बस पकडली. खूप समोर नाही, खूप मागे नाही...अशी बेताची मध्यवर्ती सीट पकडून पुण्यात आलो "वन पीस.' पुन्हा खासगी गाडीतून रात्रीच्या वेळी प्रवास न करण्याचा निश्‍चय करूनच.

तुमची होते "आग'...आमची होते होरपळ

"राम गोपाल वर्मा की आग' अशी नावापासूनच धग जाणवणाऱ्या चित्रपटाला जाण्याचं काही कारण नव्हतं..तसंच न जाण्याचंही! आपला "लालेट्टा' म्हणजे मोहनलाल याच्यासाठी त्यातल्या त्यात स्वस्त चित्रपटगृहामध्ये अगदी मोजक्‍या "निमंत्रितां'च्या उपस्थितीत मी हा चित्रपट पाहिला. पाहिला, असं केवळ म्हणायचं. एरवी खरे तर असा चित्रपट पाहून माझ्यासारख्याच्या डोळ्याचे पारणे फिटायला हरकत नव्हती. एकूण चित्रपट पाहून झाल्यानंतर माझं असं मत झालं, की एक विनोदी चित्रपट म्हणून उपरोक्त चित्रपट पहायला हरकत नाही. सात वर्षांपूर्वी "हेराफेरी' या चित्रपटाच्या यशानंतर हिंदीमध्ये अचानक विनोदपटांची लाट आली. त्यात आताशा बहुतेक विनोदपटांचा ठरीव साचा झाला आहे. त्यादृष्टीने राम गोपाल वर्मा यांनी अथक प्रयत्न करून आणि तब्बल 32 वर्षांच्या अभ्यासानंतर हा एक वेगळा चित्रपट रूजू केला आहे.

बत्तीस वर्षांपूर्वी "कितने आदमी थे...' करत पडद्यावर धुमाकूळ घालणारा एक विकृत खलनायक भारतात अवतरला. ती भूमिका साकारणारा अभिनेता समर्थ असल्याने खलनायक देशभरात लोकप्रिय झाला. त्यानंतर पडद्यावरील खलनायकाने, म्हणजेच गब्बरसिंगने ठाकूरला पीडले नसेल तेवढे गब्बरसिंगच्या नावावर अनेकांनी आम्हा चित्रपटरसिकांना पीडले आहे. वेष बदलून गब्बर अनेक चित्रपटांत येत राहिला. त्यानंतर टेपरेकॉर्डरच्या जमान्यात कॅसेटच्या रूपाने त्याचा आवाज घुमत राहिला. त्यानतंर टीव्हीच्या जमान्यात जाहिरातींत आणि विनोदाचं सोंग करणारे हास्यास्पद कार्यक्रमांचा क्रमांक आला. आता कुठे "रेडियो मिर्ची'च्या एकसुरी जाहिरीतीत गब्बरचे विडंबन केलेले संवाद ऐकू येण्याचे बंद झाले होते. मात्र त्यात रामगोपाल वर्मा नावाच्या चित्रपटक्षेत्रातील एका "डॉन'चा उदय झाला.
रामूने नंतर चित्रपटांचे असे हप्ते सुरू केले, की हिंदी चित्रपट पाहणे हाच प्रेक्षकांचा गुन्हा वाटावा. बाय द वे, रामूने त्याच्या चित्रपटनिर्मिती कंपनीचे नाव "फॅक्‍टरी' ऐवजी "गॅंग' ठेवायला हवे होते. दुर्दैवाने, रामूच्या अंधारलेल्या, इंग्रजी चित्रपटातील फ्रेम्स वापरून केलेल्या "पिक्‍चर्स'ना अनेकांचा तिकिटाश्रय लाभला. त्यामुळे बापाने कौतुकाने आणलेली खेळणी पोरगं ज्या हौसेनं तोडून त्याचा सत्यानाश करतं, त्याच उत्साहाने रामूने जुन्या चित्रपटांचे विचित्रपट काढण्याचा सपाटा लावला. रामूची ही टोळधाड इतरांच्या जीवावर तर उठलीच, त्याचे स्वतःचेही अपत्य या आपत्तीतून सुटले नाहीत.

रामूला चित्रपटाच्या तंत्राची फारशी माहिती नव्हती, तेव्हा त्याने "शिवा' आणि "रात' सारखे काही सिनेमे काढले होते. त्यातून चुकून आपलं मनोरंजन होत होतं. मात्र त्याची यत्ता वाढली. मग "शिवा'चीच एक फर्मास हिडीस आवृत्ती साहेबांनी काढली. एखाद्या चित्रपटाचं एवढं सॉलिड भजं इव्हन डेव्हिड धवनही करत नाही. (अगदी रजनीकांतच्या तमिळ "वीरा'चं त्यानं हिंदीत केलेलं "साजन चले ससुराल'सुद्धा त्यामानाने कौतुकास्पद होतं.)एका "रात'च्या विषयावर तर रामूने "भयं'कर चित्रपट काढले. मग त्याच्या चित्रपटांनी घाबरण्याऐवजी तो चित्रपट काढणार म्हटल्यावरच घाबरायला होऊ लागलं. गुन्हेगारी चित्रपटांचा खापरआजोबा "गॉडफादर'ची "फ्रेम बाय फ्रेम' कॉपी करून गेल्या वर्षी रामूजींनी "सरकार' नावाचा चित्रपट दिला. हुबेहूब काढल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षणीय झाला. तरीही मार्केटिंगचे हुकुमी हत्यार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्याचे कसब त्यांनी तेव्हा दाखविलेच.

अशात रामूने जेव्हा "शोले'चं रिमेक करण्याची घोषणा केली, त्यावेळी ठाकूर, गब्बर आणि रामपूरची ग्रामस्थ मंडळींची राखरांगोळी होणार यात शंका उरली नाही. सांगायला आनंद होतो, की राम गोपाल वर्मा यांनी मायबाप प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. मूळ "शोले'तील जी अजरामर (आमच्या जमान्यापुरती) पात्रे आहेत, त्यांची व्यवस्थित कत्तल करण्यात रामूजींनी आपली संपूर्ण प्रतिभा पणास लावली आहे. अगदी "शोले'च्या कलावंतांचे डुप्लिकेट घेऊन तयार केलेला (केवळ अमजद खान उर्फ गब्बरसिंग यांचा अपवाद वगळून) "रामगढ के शोले' हा चित्रपटही "शोले'च्या विडंबनात "आग'च्या पासंगालाही पुरत नाही.

बब्बन हे रामूजींच्या 'आग'चे मुख्य इंधन. राम गोपाल वर्मांनी स्वतःचे छायाचित्र काढावे, अशी विकृती त्याच्यात कुटून कुटून भरली आहे. कुठून कुठून सुचतं हो या माणसाला असं? अमिताभ बच्चन या अभिनयाच्या "शहेनशहा'ला अगदी अलगदपणे रामूजींनी राहुल देव किंवा मुकेश ऋषी यांच्या पंगतीत आणून बसविले आहे. यासाठी त्यांचे खास अभिनंदन! "परवाना'मध्ये अत्यंत संयमित खलनायक साकारणारा, "अक्‍स'मध्ये जगावेगळी भुमिका करणारा हाच का तो "मिलेनियम स्टार'...रजनीकांतला लोकं इतके दिवस दक्षिणेतला अमिताभ म्हणायचे..."आग'मधली अमिताभचे चाळे पाहून आता अमिताभला उत्तरेतला मिथुन म्हणू लागतील. अमिताभचे काही संवाद कानावरून जातात...म्हणजे हे संवाद ऐकण्यासाठी का होईना प्रेक्षकांनी परत थियेटरात यावे...काय आजकाल बॉलिवूडची मार्केटिंग कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम नाही...

कथा, पटकथा, चित्रण, संगीत...अशा विविध घटकांची जबाबदारी रामूजींनी स्वतःवर न ठेवता इतरांनाही त्यात सहभागी करून घेतले आहे, हे त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखविते. विशेषतः संवादाच्या बाबतीत त्यांनी "बॉलिवूड'ला "कंटेंपररी' करण्याची मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे "हमें वो गलती नहीं करनी है, जो अमेरिका ने इराक में की,' असे ज्ञानवर्धक आणि वास्तववादी संवाद इथे ऐकायला मिळतात. हीच प्रतिभा मूळच्या "शोले' चित्रपटात असती, तर गब्बरसिंगही म्हणाला नसता का..."रामगढ अफगाणिस्तान नहीं है, जहां रूस की सेना घुस जाय...इ. इ.' विशेष म्हणजे प्रेक्षकांना झोप येऊ नये म्हणून रामूजींनी अधूनमधून वाद्यकल्लोळाची सोयही केली आहे.

असो...मोहनलालची काही प्रेक्षणीय दृश्‍ये या चित्रपटांत आहेत. अमिताभ आणि रजनीकांत यांचे चाहते त्यांनी केलेल्या कोणत्याही कृतीला उचित ठरविण्यास सज्ज असतात. पहिल्या वर्गातील लोकांनी मला बहुमताने दुसऱ्या वर्गात ढकलले असल्याने त्यांच्यावर सूड घेण्याचा एक वेगळाच आनंद "बब्बन' पाहताना आला..."शोले' ही एक कायमस्वरूपी "सूड'कथा आहे ती या अर्थाने! इन्स्पेक्टर नरसिम्हा आणि बब्बन यांच्यातील वैमनस्यापासून सुरू झालेली ही आग ‘अमेरिका हो या कालिगंज...मरता आम आदमी ही है,’ असा मोलाचा संदेश देऊन संपते...ही त्यातल्या त्यात गांभीर्याने घ्यायची गोष्ट.
-----------