Wednesday, November 21, 2007

सिनेमातील "खेल खेल में'

चित्रपट आणि क्रिकेट दोन्ही आपल्याकडे लोकप्रिय आहेत. तरीही चंदेरी पडद्यावर त्याचे अभावानेच दर्शन घडते. अन्य खेळांची गोष्टच सोडा. आता गेल्या महिन्यात "चक दे इंडिया'ने हॉकीला केंद्रस्थानी ठेवून एक आकर्षक कथा सादर केली. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तर चित्रपटात खेळ आणि खेळाडूंची अनुपस्थिती आणखी तीव्रतेने जाणवू लागली आहे. त्याचवेळेस खेळांवरील अन्य चित्रपट येत असल्यामुळे भारतात खास क्रीडापटांचा उदय होत आहे, हेही जाणवत आहे.

बॉलिवूडने खेळांना कधी पडद्यावर जागाच दिली नाही, असं नाही. "ऑल राउंडर', "बॉक्‍सर', "जो जीता वही सिकंदर' अशा चित्रपटांमधून खेळांचे दर्शन प्रेक्षकांना झाले. मात्र, ते केवळ तोंडी लावण्यापुरते. मुख्य भर बॉलिवूडच्या परंपरेप्रमाणे नाच गाणे, मेलोड्रामा आणि नायकाचे उदात्तीकरण याच चक्रावर होता. त्यामुळे चित्रपट खेळांशी संबंधित असूनही क्रीडा क्षेत्राला ते कधीही आपले वाटले नाहीत. प्रेक्षकांनीही अशा चित्रपटांचे कधी खुल्या मनाने स्वागत केल्याचा इतिहास नाही. त्यामुळेच की काय, या वाटेने जाणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांची संख्या अगदीच अत्यल्प म्हणावी अशी आहे. आपल्याकडे चित्रपटांचे खेळ होतात पण खेळांचे चित्रपट होत नाही, असं का?

खेळांशी संबंधित चित्रपटांचा आढावा घेतल्यास काय दिसते? अगदी तीस वर्षांपूर्वी आलेल्या "सावली प्रेमाची' हा चित्रपट घ्या. त्यात विक्रमवीर सुनील गावसकर नायक होता, हीच या चित्रपटाची ओळख. क्रिकेट खेळाडू संदीप पाटील याला हिरो म्हणून झळकावणाऱ्या "कभी अजनबी थे' या चित्रपटाची कथाही काही वेगळी नाही. त्यापेक्षा कुमार गौरव, विनोद मेहरा आणि रती अग्निहोत्री यांची भूमिका असलेल्या "ऑल राउंडर' या चित्रपटात क्रिकेटचे अधिक जवळून दर्शन झाले.

भारतात आर्थिक उदारीकरणानंतर आणि उपग्रह वाहिन्यांचे प्रमाण वाढल्यानंतर येथील प्रेक्षकांना सगळ्या प्रकारचे चित्रपट आणि मालिका पाहावयास मिळू लागल्या. त्यामुळे आपले हिंदी चित्रपटही बदलले. त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे क्रीडापट अधिक तयार होऊ लागले. "लगान,' "इक्‍बाल', "चक दे इंडिया' आणि आता येऊ घातलेला "धन धना धन गोल' असे महत्त्वाचे क्रीडापट गेल्या पाच वर्षांतच आले आहेत, हे लक्षात घ्या. "स्टम्प्ड' सारखे केवळ क्रिकेटच्या क्रेझचा फायदा घेण्यासाठी आलेले चित्रपट वेगळेच! या ट्रेंडची सुरवात झाली सहा वर्षांपूर्वी आलेल्या "बेंड इट लाइक बेकहम' या चित्रपटाने. खरं तर हा चित्रपट इंग्रजी होता; मात्र त्यातील कथा भारतीय कुटुंबाची आणि फुटबॉलवेड्या युवतीची होती. त्यामुळे त्या चित्रपटाला मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर अनेकांनी क्रीडा विषयावर चित्रपट काढण्याचे धाडस दाखविले आहे.

----------

(सकाळमध्ये १९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या लेखाची ही संक्षिप्त आवृत्ती)

Monday, November 19, 2007

फटाक्‍यांचे बार आणि स्मृतींच्या पणत्या

स्मृतींचे हे भांडार दिवाळीच्या अन्य बाबींमध्ये जेवढे समृद्ध आहे, त्याहून जास्त समृद्ध ते फटाक्‍यांच्या बाबतीत आहे. अगदीच खरं सांगायचं म्हणजे फटाक्‍यांच्या बाबतीत माझ्या आठवणी खूप स्फोटक आहेत.न उडालेल्या बॉम्बमधील दारू वेगळी काढून घेऊन, ती पुन्हा पेटवावी तशी या आठवणी मी अनेकवेळेस अनेकांना पुन्हा पुन्हा सांगितल्या आहेत. तरीही त्यातली गंमत अजून जशास तशी आहे. या आठवणींबाबत काय सांगू? फटाक्‍यांच्या आतषबाजीची सुरवात दसऱ्याच्या दोन-चार दिवसांनंतर सुरू व्हायची. गल्लीत येता जाता बॉम्ब, टिकल्या आणि नागाच्या गोळ्या विकायला बसलेले छोटे छोटे स्टॉल दिसू लागले, की ठिणगी पडायची. त्यानंतर फटाक्‍यांसाठी वडिलांकडे हट्ट करावा लागे. तोही कितीसा? तर आठ आणे किंवा चार आण्याचा! अन्‌ तरीही वडिलांनी कधीही चर्चेच्या पहिल्या फेरीत मागणीला दाद दिल्याचे आठवत नाही. निवेदने, मोर्चे अशा शांततावादी मार्गांनी पदरात काहीही पडणार नाही, याची खात्री पटल्यानंतर एखाद्या वेळी निषेधाचा मार्ग अवलंबावा लागे. त्यानंतर मात्र वडील कानाखाली असा काही जाळ काढत, की ज्याचं नाव ते! त्यानंतर मग यथावकाश खरेदीचा पूर्वनियोजित कार्यक्रम पार पडे आणि घरात दारूगोळा येऊन पडे.

त्यानंतर प्राधान्य असायचं ते फटाक्‍यांच्या वाटपाचं. कारण पुढच्या सगळ्या गमतीचा आधार तोच असायचा. आपलाच दारूगोळा आपणच उडवून दिवाळी साजरी केली, तर त्या दिवाळीत काहीही अर्थ नाही असं मला अगदी मनापासून वाटतं. त्यामुळे स्वतःच्या वाट्याचे फटाके मागे ठेवून इतरांचे फटाके आधी उडविण्याची लज्जत मी खूपदा अनुभवली. मराठी व्यक्ती असल्याने बहीण-भावंडांवरच या गनिमी काव्याचा वापर करण्याचीही दक्षता मी अनेकदा घेतली. मात्र गल्लीतील अनेक मुले आणि शाळेतील मित्र यांनाही या प्रकारच्या लढाईचा मी अनेकदा प्रसाद दिला. अगदी बंदुकीच्या टिकल्यांपासून सुतळी बॉम्बपर्यंत अनेक प्रकारचे स्फोटके मी अशीच कमावली. त्यानंतर इतरांची रसद संपल्यावर आपल्या भात्यातले अस्त्र काढायचे आणि त्यांना वाकुल्या दाखवत ते उडवायचे...हा हा काय ते रम्य बालपण! आता तर काय, दिवसरात्र मी चॅनेलवर कुठेतरी गोळीबार, बॉंबस्फोट आणि हाणामाऱ्या पाहायचो...पण बालपणीच्या त्या स्वकर्तृत्वाच्या आतषबाजीची मजाच काही और!
दिवाळी म्हटलं, की नवे-नवे कपडे, काही चीजवस्तूंची खरेदी अशा अनेक गोष्टी असायच्या. माझ्या बालपणी तर दिवाळीची खरेदी म्हणजे एक जंगी कार्यक्रमच असे. "तुला नवे कपडे घ्यायचेत,' असं सांगून आई-वडील मला बाहेर घेऊन जायचे. त्यानंतर दुकानात गेल्यावर वडिलांचे कपडे घेऊन झाल्यावर माझ्या कपड्यांचा विषय अजेंड्यावर यायचा. आता जनरेशन गॅप म्हणा, का आणखी काही, पण आई-वडिलांची पसंती आणि माझी पसंती यात गुढी पाडवा आणि दिवाळीच्या पाडव्याएवढे अंतर पडे. या प्रामाणिक मतभेदांच्या फुलबाज्या मग कपड्यांच्या दुकानातच पडू लागत आणि वडिलांच्या रागाचा सुतळी बॉम्ब फुटल्यानंतर ते अग्निदिव्य पार पडे. अशारीतीने कोणाच्यातरी पसंतीने माझ्या कपड्यांची खरेदी होई, त्यावर भावंडे आणि शाळासोबती कॉमेंट्‌स करून मनोरंजन करून घेत आणि दिवाळी साजरी झाल्याचं समाधान मी करून घेई.
असो. गेले ते दिन गेले. एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है...असं गाणं गात सध्या फिरत आहे. तूर्तास सांगायचं म्हणजे, माझी यंदाची दिवाळी खूप छान गेली आहे. या दिवाळीच्याही काही आठवणी तयार झाल्या आहेत. पण त्या आता म्हातारपणीच प्रकाशित कराव्या लागणार...त्याशिवाय "तरुणपणीच्या दिवाळीची म्हातारपणात मजा नाही,' अशा वाक्‍याला धार येणार नाही!