Thursday, December 31, 2009

शुभेच्छा...कशाच्या कशाच्या!

यंदा अद्याप तरी नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालेला नाही. एक दोन इमेल आले आहेत मात्र त्यांचे प्रमाण आटोक्यात आहे. त्याबद्दल शुभेच्छा न देणाऱ्यांचा मी आभारी आहे. एखाद्या विशिष्ट वेळेला कोणा माणसाला विशिष्ठ शब्द बोलल्यास त्याचे भलेच होते, हे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना कसे काय वाटू शकते हे माझ्यापुरते गौडबंगाल आहे. विशिष्ट दिवशी एखादा सण पाळणे ही जर अंधश्रद्धा असू शकते, एखाद्या विशिष्ठ दिवशी उपाशी राहणे हे जर अंधश्रद्धा या सदरात मोडू शकते तर कॅलेंडरच्या एका विवक्षित रकान्यात असलेल्या दिवशी तमाम जगाला सगळं कसं 'गुड गुड' वाटू शकते, हीही अंधश्रद्धाच होय. एवढाच कि, पहिल्या तऱ्हेची अंधश्रद्धा जोपासणारे संख्येने जास्त आहेत आणि दुसऱ्या तऱ्हेचे लोक कमी आहेत, एवढाच काय तो फरक. ज्या अंधश्रद्धेचे अनुयायी जास्त ती प्रथा आणि जिचे कमी ती अंधश्रद्धा, असा काहीसा हा प्रकार आहे.

येणारे वर्ष सुखाचे जावो, असे आपल्याला वर्षातून किती वेळेस ऐकायला मिळते, तुम्ही विचार केला आहे का? १ जानेवारी, गुढी पाडवा, दसरा आणि दिवाळी शिवाय तुमचे काही अमराठी मित्र असतील तर त्यांचेही वेगळे...म्हणजे उगादी, पोंगल, विशू, बैसाखी, बिहू  इत्यादी. गम्मत म्हणजे, इतक्या शुभेच्छा मिळूनही आयुष्य आहे तसाच आहे. मागील पानावरून पुढे चालू असा म्हणण्याचीही सोय राहू नये, इतके सपक, एकसुरी आणि अर्थहीन. कदाचित म्हणूनच असावे, वर्षांताचे निमित्त काढूनगळ्याखाली दारू उतरविणारे अलीकडे वाढू लागलेत. मध्यरात्रीनंतर इकडे नवे वर्ष लागते आणि बस लागावी तसे दारू पिलेल्यांना 'सेलिब्रेशन'  लागते! मग पोटात उतरलेली दारू डोक्यात चढते आणि मौज मजेसाठी जमलेले टोळके धिंगाणा घालू लागते. यंदा या धिंगाण्याला मा. न्यायालयानेही हात द्यायचे ठरविले आहे. दारू पिण्याला काल वेळेचे बंधन नसावे असाच जणू काही न्यायालयाचा हेतू असावा. शिवाय दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांना समजून घ्या, असंही सांगितलं आहे.  न्यायालय आणि मद्यालय अशी बेधुंद युती जगात बहुधा पहिल्यांदाच अस्तित्वात आली असावी.

आता नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अशी टकळी चालू केल्याबद्दल मला कोणी दोष देईलही. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती कशी बदलेल? ज्या शुभेच्छा दिल्या-घेतल्या आहेत, त्या तरी खऱ्या कुठे आहेत? यांत्रिक संदेशांची देवाण घेवाण हेच त्याचे खरे स्वरूप आहे. मी तर गेल्या दिवाळीत आलेले शुभेच्छांचे मेल यंदाच्या दिवाळीत पुढे पाठविले. सगळी गुगलची कृपा, दुसरे काय. त्याच्यामुळेच असे जुने मेल सांभाळून ठेवता येतात ना. पूर्वीच्या काळी नाही का, बायका एका लग्नात आलेला आहेर जपून ठेवत आणि दुसऱ्या नातेवाईकाच्या लग्नात तो आहेर म्हणून देत. त्याचीच हि आधुनिक आवृत्ती आहे. येणाऱ्या संदेशांमध्ये जुळ्या, म्हणजे अगदी एकसारख्या एक संदेशांची संख्या पहिली, तर माझे समानधर्मा लोक कमी नाहीत, याची खात्री पटते. खरं म्हणजे इतके हुबेहूब संदेश एकावेळी एकत्र पाहिल्याने त्या संदेशांचे अजीर्णच होते.  त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदाही शुभेच्छा संदेशांना सुट्टी. जे चाललाय ते खूप छान आहे. ते तसंच चालत राहो ही इच्छा. मात्र त्यासाठी जानेवारी किंवा दिवाळी अशा निमित्तांची गरजच काय? एका इंग्रजी लेखकाची प्रतिमा वापरून लिहायचे तर म्हणावे लागेल...आपल्या शुभकामना या ईश्वरासारख्या असाव्यात...सर्वत्र आणि सगळीकडे उपस्थित मात्र कधीही न दिसणाऱ्या!


Saturday, December 5, 2009

माकडाच्या घराची बातमी

एक होते माकड. दिवसभर आपल्या ऑफिसमध्ये बसून असावे आणि संध्याकाळ इकडे तिकडे उंडारत काढावी, या पलिकडे एखाद्याची जीवनशैली असते, असावी यावर त्याचा विश्वास नव्हता. तरीही कधी कधी त्याला स्वतःच्या अशा उनाड आयुष्याचा कंटाळा यायचा. पावसाळ्यात चुकून मुसळधार पाऊस पडायचा. त्यावेळी हा एखाद्या इमारतीच्या आश्रयाला गेला, की तिथल्या लोकांनी कधीही माकड पाहिलेले नसल्याने ते माकडापेक्षा जास्त चाळे करायचे. झाडावर बसावं तर तिथे म्हाडाच्या घरांपेक्षा जास्त पावसाचं पाणी गळत असायचं. अशावेळी माकड मनातल्या मनात संकल्प करायचे, हे काही ठीक नाही गड्या. आपण एवढे कर्तबगार आणि अशा रितीने पावसात भिजत राहावं. साधे चिमण्या-कावळे सुद्धा स्वतःचे घरटे करतात. थांब, हा पाऊस थांबला की आधी एखादे डुप्ले फ्लॅट घ्यायलाच पाहिजे. वर्तमानपत्रांच्या रिअल इस्टेटच्या पुरवण्या वाचून त्याला सगळ्या बिल्डरांची नावे जवळपास तोंडपाठ झाली होती. त्यामुळे कोणाकडे फ्लॅट बुक करायचा, हेही त्याने मनातल्या मनात ठरवून टाकलेले असायचे. पाऊस थांबला, की मात्र माकडाचा मनोरथही जागच्या जागी उभा असायचा, सरकारी योजनांसारखा. परत त्याचा सामान्य जीवनक्रम सुरू राहायचा.

हिवाळ्यात थंडी वाजू लागली, की माकडाला वाटायचे आपलेही एखादे घरकुल असावे जिथे प्रेमाची ऊब मिळेल. दूरचित्रवाणीच्या जाहिराती पाहून त्याला घर-संसार म्हणजे काही गंमतीचीच गोष्ट आहे, असे वाटत होते. एकदा का थंडीचा मोसम उलटला, की आपण वन रूम किचन का होईना, पण स्वतःच्या जागेत जायचेच, असा बेत तो कुडकुडत करत असायचा. थंडीच्या काळात, दोन हात एकमेकांत गुरफटुन तो असा काही बसायचा, की च्यवनप्राश खाण्याचीसुद्धा त्याला इच्छा व्हायची नाही. मात्र हिवाळा संपला, की फुलांवरील दवबिंदू उडून जावे तसा त्याचा इरादाही नाहिसा व्हायचा. नव्हे, आपण कधी असा विचार केला होता, हेही तो विसरून जायचा.

उन्हाळ्यात झाडाच्या फांद्यावरून येणारे कडक ऊन सोसताना माकडाला वाटायचे, आपलेही घर असते तर त्यात एखादा फ्रीज असता. ऊन्हाने काहिली होत असताना फ्रीज उघडून आपण एखादे शीतपेय पीत बसलो असतो. माकडच ते, शीतपेयासाठी पैसे द्यावे लागतात किंवा भारनियमनामुळे फ्रीजसुद्धा थंड होणे बंद झाल्याची त्याला कल्पना असण्याचे कारण नव्हते. अर्थात एकदा का ऊन सरले, की माकडाच्या प्लॅनचेही बाष्पीभवन होऊन जायचे. मग कुठले घर आणि कुठला विसावा.

ही झाली पारंपरिक कथा. मात्र आपले माकड आहे एकविसाव्या शतकातील. त्यामुळे आपल्या वास्तवात न येणाऱ्या योजनांचेही मार्केटिंग कसे करावे, याचं कौशल्य त्याने विकसित केले होते. त्यामुळे काय व्हायचं, पावसाळा आला की बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी येत असे.

येत्या पावसाळ्यात माकडाचे घर होणार

त्याखाली माकडाच्या योजनेची सगळी माहिती दिलेली असायची. इतकेच नव्हे तर माकडाने केलेली घराची आखणी अगदी सांगोपांग त्यात येत असे. लवकरच जनतेला हे घर पाहायला मिळेल, असेही त्या बातमीत म्हटलेले असायचे. जो प्रकार पावसाळ्यात, तोच प्रकार उन्हाळ्यात. उन्हाळा संपला, की माकडाच्या घराचे बांधकाम सुरू होणार या अतिरिक्त बातमीसह माकडाची योजना अगदी सविस्तर स्वरूपात त्या बातमीत येत असे. एका वर्तमानपत्रात आली, की दुसरे वर्तमानपत्रही ती बातमी आतल्या पानात का होईना, पण छापतच असे. उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही

माकडाचे घर आता अंतिम टप्प्यात, लवकरच बांधकामाला सुरवात

अशी बातमी असायची.

अगदी ताज्यातली ताजी बातमी अशी आहे, की माकडाचे घर होईल तेव्हा होईल, मात्र त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पेपरने एक वार्ताहर नेमला आहे. चुकून घराचे बांधकाम सुरू झालेच, तर आता स्लॅब पडणार, आता पायऱ्या बांधणार अशा बातम्या छापण्यासाठी या वार्ताहरांशी संपर्क साधण्याचा तुर्तास माकडाचा विचार आहे.

Sunday, November 29, 2009

तुम्ही म्हातारे होऊ नका!

“आजही मी हातात कप घेतला, की तो थरथरायला लागतो. मात्र हातात ब्रश घेतला तर तो थरथरत नाही. एखादी शक्ती माझ्याकडून हे शक्य करून घेत असावी. मात्र माझ्या हातून चांगलेच काम होत असल्याने त्या शक्तीचा मी आभारी आहे,” मंगेश तेंडुलकर बोलत होते. या वाक्यांनी मला स्वतःला आपण काय गमावले आहे, याची जाणीव करून दिली. तेंडुलकर यांच्या 50 व्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे काल बालगंधर्वमध्ये उदॆघाटन झाले. त्यावेळी त्यांनी वरील उदॆगार काढले. व्यंगचित्रे तसे पाहायले गेले तर माझी पहिली आवड. त्यात तेंडुलकरांची चित्रे म्हणजे वेगळीच खुमारी होती. त्यांच्या या वाक्यासरशी मी एकदम 1983 पर्यंत मागे गेलो.

ज्या वयात रविवारची जत्रा मुलांनी वाचू नये, असा संकेत होता त्यावेळी मी ते साप्ताहिक सर्रास वाचत असे. त्याला कारण तेंडुलकरांची व्यंगचित्रे त्यात येत असत. उरुस का अशाच काहिशा नावाने मलपृष्ठाच्या आतील बाजूस त्यांची व्यंगचित्रे येत असत. त्यात शिवाय नाटकांचा समाचार घेणारे त्यांचे खुमासदार सदरही होतेच. त्या व्यंगचित्रांनी बराच काळ प्रभावित केले होते. त्यानंतर विकास सबनीस आणि राज ठाकरे यांच्या शैलीने भुरळ घातली होती. नंतरही काही काळ या सर्वांची गाठभेट अनेक वर्षे दिवाळी अंक किंवा दैनिक वर्तमानपत्रांतून पडत होती. मग काही काळ व्यंगचित्रकार म्हणून जगण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते सगळे डाव वेगळेच पडले. आता तेंडुलकरांच्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने, त्यांच्या या वाक्याने गमावलेल्या त्या कौशल्याची आठवण झाली.

या कार्यक्रमाचे उदॆघाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मोठे मनोज्ञ भाषण केले. “मुलगा मोठा होताना बापाला खूप आनंद होतो. मात्र आपले वडिल म्हातारे होऊ नयेत, असे मुलाला वाटत असते. वडिलांनी म्हातारे होणे म्हणजे काहीतरी गमावल्यासारखे आहे. त्यामुळे तेंडुलकर, तुम्ही म्हातारे होऊ नका. आहात तसेच राहा,” नाना पाटेकर बोलत होते. त्यांच्या या विनंतीला उत्तर म्हणून बोलतानाच तेंडुलकरांनी वरील वाक्य उच्चारले होते.

या सगळ्या कार्यक्रमात खरंच व्यंगचित्रकार झालो असतो तर…असा विचार येत होता. कार्यक्रम संपला आणि सगळ्या लोकांनी नाना पाटकेरला एकच गराडा घातला. बिचारे तेंडुलकर एका बाजूला पडले. सगळ्यांची घाई नानाची सही घेण्यासाठी. त्यावेळी व्यंगचित्रकार न झाल्याचे आयुष्यात पहिल्यांदाच समाधान वाटले!

Wednesday, November 25, 2009

गोंधळ-धर्माचा आणि राजकारणाचा

देशाच्या राजधानीत राम मंदिर आणि बाबरी मस्जिद यांच्या पाठीराख्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ चालू असताना पुण्यात काल रामकृष्ण मिशनचे स्वामी तत्वज्ञानानन्द यांचे भाषण होते. एमआयटीच्या कार्यक्रमात त्यांचे हे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, "भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे असे म्हणण्यापेक्षा तो अध्यात्मिक देश आहे, असे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे. इंद्रियांमधून मिळणाऱ्या आनंदापेक्षा आत्मिक आनंद महत्वाचा आहे. हा आनंद कसा मिळवायचा हे आपलाल्या केवळ धर्मग्रंथच नाही, तर शास्त्रीय संगीत, कला आणि साहित्य यातूनही ही शिकवण मिळते."

खरे तर अशा प्रकारची वाक्ये चोहोबाजूला अनेकजण बोलत असतात. मात्र रामकृष्ण मिशनसारख्या संस्थांमधील वरिष्ठ आणि सन्माननीय व्यक्ती वरील विचार मांडते तेव्हा त्याला वेगळा अर्थ असतो. अयोध्येतील ज्या वास्तूवरून नवी दिल्लीत गोंधळ सुरु आहे, तो धार्मिक आहे का राजकीय? म्हणजे पहा, धार्मिकता सोडा आणि भौतिकता पकडा, असा उपदेश आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी केला. त्यामुळेच रामापेक्षा रामाच्या मंदिराबाबतच या लोकांना अधिक प्रीती आहे. घ्या, तुम्हाला भौतिक विचारसरणी हवी होती ना? आता बोला, आम्ही अयोध्येतील भौतिक वास्तू आणि भौतिक जमिनीसाठी हातघाईवरच येऊ.

खरं म्हणजे, धर्म, आध्यात्मिकता आणि नैतिकता या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे आपल्या शिक्षणव्यवस्थेने  कधी नीट सांगितलेच नाही. धर्म म्हणजे पूजापाठ, देव-देवस्की आणि मंदिरात जाणे, अशा तद्दन बाह्य उपचारांशी जोडली गेलेली वस्तू. 'आनंदो' नावाच्या एका बंगाली नियतकालिकाचा आरोग्य विशेषांक एकदा माझ्या हातात पडला. त्यात बंगालमधील बहुतेक साऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती होत्या. त्यात जवळजवळ सगळ्यांनी आपण प्राणायाम करतो हे सांगतानाच, याचा कोणत्याही देवाशी संबंध नाही अशी पुस्तीही जोडली होती. कम्युनिस्ट बंगालमधील नामवंतांना आपण धार्मिक गणले जाऊ, याची कोण हि धास्ती! भारत हा आध्यात्मिक देश आहे, हि वस्तुस्थिती देशाच्या मुखंडांना मान्य करता आलेली नाही. त्यामुळे प्रच्छन्न समारंभ आणि कर्मकांड धार्मिक विचारांच्या नावावर खपविले जातात. सत्य साईबाबांना 'वर्षा'वर बोलावणे येतात आणि पुणे जिल्ह्यात तसेच आजूबाजूला डुप्लिकेट धर्मस्थळांची रास उभी राहते. तिरुपती बालाजी, शिर्डी, पंढरपूर यांच्या प्रतिकृती एखाद्या मॉलच्या शाखा निघाव्यात तशा निघत आहेत.

गम्मत पहा, शिरगावला शिर्डीच्या नावाखाली एक राजेशाही दुकान काढले तर अर्धा अर्धा पान छापणारे वर्तमानपत्र आध्यात्मिकता शिकवणाऱ्या पुरुषांना मात्र खड्यासारखे दूर ठेवते. नवरात्रात महालक्ष्मी मंदिराचे,  गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीचे छायाचित्र छापणारे किंवा दाखविणारे, या सगळ्याची गरज नसून केवळ स्वतःकडे पहा असे सांगणाऱ्या लोकांना वगळणारच. त्यात त्यांची भौतिक गरज आहे. तुकारामांच्या देहू येथे त्यांच्या मूळ मंदिरात भाविक श्रद्धेने जातात. तिथेच आता थोड्या अंतरावर गाथा मंदिर नावाचे एक मोठे दुकान उभे राहत आहे. संगमरवराच्या या तीन माजली इमारतीत तुकोबांचे अभंग संगमरवराच्याच फारशीत कोरलेले आहेत. जोडीला तुकोबांचा भव्य पुतळा. आयुष्यभर व्यवहार न जमलेल्या तुकोबांनी जवळच्या डोंगरावर जाऊन साधना केली. अशा उंची प्रसादाची गरज असती तर त्यांनी आपल्याकडे चालून आलेल्या शिवाजीसारख्या राजाला मागितले असते. पण नाही. स्वामी तत्वाज्ञानानन्द म्हणाले, सध्या उपभोगवाद वाढत आहे. मोठ्या धर्मस्थळांच्या  प्रतिकृती काय किंवा या गाथा मंदिरासारख्या नवीन रचना काय, या आध्यात्मिकातेत शिरलेल्या उपभोगवादाचेच परिणाम आहेत. हा उपभोगवाद आहे, तोपर्यंत मंदिर-मशीद पडतच राहणार. राजकारण हे त्याचे केवळ एक रूप आहे.
Sunday, November 22, 2009

…अखेर व्हायचे ते झालेच

अखेर व्हायचे ते झालेच. निखिल वागळे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शिवसैनिकांच्या मारामारी स्वातंत्र्याने अतिक्रमण केले. स्वतःच्या मोठेपणासाठी वागळे यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही चोप कसा असतो ते दाखवून दिले आणि शिवसेना अद्यापही शिवसेनाच आहे, ते पाच पंचवीस कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गात हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे राणा भीमदेवी थाटात आश्वासन दिले. (त्यावेळी खरं तर त्या फ्रेममध्ये आबांच्या जवळ विनायक मेटे दिसतात का, याचा शोध मी घेत होतो.शिवाय  छगन भुजबळही कुठे दिसले नाहीत ते.)

आयबीएन-लोकमतवर हल्ला झाला, त्याच संध्याकाळी योगायोगाने पुण्यात मनसेच्या एका नेत्याकडे पत्रकारांचा स्नेहमेळावा जमला होता. तिथे याच घटनेची चर्चा झाली नसती तर नवल. त्यावेळी बहुतेक पत्रकारांचे मत पडले, की वागळे कधी न कधी मार खाणारच होते. त्यांच्या शैलीमुळे महानगरच्या काळापासून शिवसैनिकांची आणि त्यांची सातत्याने गाठभेट होत असे. नव्हे शिवसैनिकांचा मार खाऊनच त्यांनी जिगरबाज पत्रकार अशी स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्यांच्यावर हात साफ करूनच शिवसैनिकांनी स्वतःची हिंस्र प्रतिमा निर्माण केली.

त्यांच्यावर पहिला हल्ला झाला 1991 मध्ये. त्यावेळी विजय तेंडुलकर यांच्यासहित बरीच मोठी मंडळी निषेधासाठी रस्त्यावर उतरली होती. त्यानंतरच्या पाच वर्षांमध्ये महानगरवर अनेकदा हल्ला झाला. मग पूर्वीचा निषेधाचा जोष उतरला. त्यावेळी लोकमतमध्येच आलेले अग्रलेख मला आठवतात. सातत्याने एकाच वर्तमानपत्रावर हल्ले का होतात, अशा प्रश्न त्यावेळी विचारला जाई. वागळे इलेक्ट्रॉनिक माध्यमात आले आणि त्यांच्या धडाकेबाज व आक्रमक शैलीमुळे आयबीएन-लोकमत वाहिनी यशस्वीही झाली. मात्र आक्रमकता वेगळी आणि अहंमन्यता वेगळी, हे त्यांच्या गावी नव्हती. वागळे चर्चेसाठी नेत्यांना बोलावतात आणि त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना बोलू देत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार आहे. सध्याच्या राजकीय नेते भ्रष्टाचारी आहेत, काहिसे अनघड (रॉ) आहेत ही गोष्ट खरी आहे. मात्र म्हणून त्यांना वाटेल तसे सोलून काढण्याची गरज नाही. दुर्दैवाने राजकारणी म्हणजे पंचिंग डॉल आणि त्यांना हवं तसं बोलण्याचा आपल्याला परवाना आहे, असा बहुतेक पत्रकारांचा समज आहे. राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, करण थापर ही यातलीच मंडळी. त्यामुळेच थापरच्या डेव्हिल्स अ़ॅडव्होकेटमधून नरेंद्र मोदी उठून गेलेले गुजराती जनतेत खपून गेले. समोरची बाजू ऐकायचीच नाही, असे ठरवलेल्या लोकांशी आणखी कसे वागणार. वर उल्लेख केलेल्या मनसेच्या नेत्याच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, चॅनेलवाले एखाद्या माणसाला संपवायलाच निघतात. त्या माणसाने केलेले काम, त्याचीही काही बाजू असते हे ऐकायला ते तयारच नसतात.

राहता राहिल प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. ज्यांची मालकी राजकीय नेत्यांकडे आहे, ज्यांच्या प्रकाशनामध्ये विशिष्ठ राजकीय पक्षांची तरफदारी करण्यात येते, एकतर्फी प्रचार हीच ज्यांची ओळख आहे, त्या वर्तमानपत्रांनी हल्ले झाल्यावर मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र आणि विचार स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढावेत हीच मोठी गंमत आहे. दीड महिन्यांपूर्वी सगळी वर्तमानपत्रे जेव्हा राजकीय पक्षांच्या पैशांवर लोकशाहीवर काळी शाई पुसण्यात दंग होती, त्यावेळी यांची ही चाड कुठे गेली होती, ते कळायला मार्ग नाही. (नाही म्हणायला, ज्यांनी पॅकेजसाठी पैसे पुरविले त्यांचेच लेख पॅकेजच्या विरोधात छापून लोकसत्ताने पापक्षालन करण्याच प्रयत्न केला होता. ) पुण्यात काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी असेच माध्यमांच्या नैतिकतेवर भाषण दिले होते. अशावेळी आपलं गप्प बसण्याचं स्वातंत्र्य वापरण्यापलिकडे आपण काय करू शकतो.

सरते शेवटी बाकी शिवसैनिकांनी हा हल्ला करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे अपयश अधोरेखित केले आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात, असे म्हणतात. त्याप्रमाणे आधीच राजकीय पराभवाने गलितगात्र झालेल्या या पक्षाच्या प्रतिष्ठेला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सुरुंग लावलेला आहे. बाळासाहेबांपेक्षा वेगळ्या मार्गाने राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही मोठी चपराक आहे. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेने अनेक पत्रकारांवर हल्ले करून पचविले कारण ते पाप धुवून काढणारे अनेक चांगली कामे शिवसेना करत होती. आता मात्र एकीकडे राजकीय पदांसाठी चाललेली दुकानदारी आणि दुसरीकडे रस्त्यावरील ही गुंडगिरी अशा कात्रीत पक्ष अडकला आहे. एकतर हे पक्षाचे भान सुटल्याचे लक्ष आहे किंवा नियंत्रण तरी सुटल्याचे लक्षण आहे.

…………..

संबंधित पोस्ट

पत्रकाराची प्रतिज्ञा

Tuesday, November 17, 2009

विक्रम वेताळ आणि सच्छील खेळाडू

राजा विक्रमाने परत आपली जुनी-पुराणी भंगार फटफटी बाहेर काढली आणि तिला कीक मारली. अनेक शतकांच्या शिरस्त्याप्रमाणे तो वेताळाला घेऊन येणार होता. बायपासवरून दहा मिनिटांतच तो शहराजवळच्या जंगलात पोचला. वेताळाची बसण्याची जागा तर त्याला माहितच होती. शिवाय ज्या झाडाजवळून रिअॅलिटी शोचा आवाज ऐकू येतो, तिथे वेताळ असतो हे त्याला माहित होतं. त्यामुळे त्याने तिकडे मोर्चा वळवला आणि वेताळाला उचलून खांद्यावर घेतले. वेताळाचेही आवडते पात्रं शोमधून बाहेर पडल्याने त्यालाही शो बघण्यात रस नव्हता. त्यापेक्षा राजाला जरासे छेडून त्याला ताज्या घडामोडीवर आजचा सवाल विचारावा निघून जावे, असा खासा बेत त्याने रचला होता.

गाडी महामार्गाला लागताच वेताळाने आपले तोंड उघडले. तो म्हणाला, “ए राजा, परिवहन अधिकाऱ्यांनी गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये असा नियम केला आहे. केवळ बोलण्यासाठी तो लागू नाही. तरीही तू असा गप्प गप्प का?  दुचाकी चालकांना अद्याप टोल द्यावा लागत नाही, त्यामुळे तू मला नेण्यासाठी कितीदाही येऊ-जाऊ शकतोस. तरीही सत्ताधारी नेत्यांसारखे न बोलता तुला मुका कावा साधायचा असेलच, तर मी मात्र विरोधी पक्षांसारखा आवाज काढतच राहणार. त्यासाठी कितीदाही निलंबित होण्याची माझी तयारी आहे. कारण मेली कोंबडी आगीला भीत नाही. मग वेताळ कशाला निलंबनाला घाबरेल? मी तुला आता एक फर्मास कथा सांगतो. ती नीट ऐक.  मी त्या कथेवर आधारित एक प्रश्न विचारेन. त्याचे उत्तर कार्यक्रमानंतर एसएमएसद्वारे दे.”

इतके बोलून वाहतूक पोलिस जसे नियम मोडणाऱ्या वाहनांची वाट पाहात रस्त्याच्या कडेला उभे राहतात, तसा एक सहेतूक पॉज वेताळाने घेतला. मग तो महागाईसारखा सुटला, “एक नगरी होती. ती राज्याची राजधानी नव्हती तरी राज्याच्या राजधानीपेक्षा त्या नगरीचा तोरा जास्त होता. कारण राज्याच्या राजाचा, मंत्र्यांचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, झालंच तर सरकारचाही खजिना भरण्याची ताकद त्या नगरीत होती. अशा या नगरीत राज्याच्या सगळ्या भागातून लोक येत होते. त्याबद्दल त्या नगरीच्या लोकांमध्ये नाराजी होती. त्यामुळेच नाराजीचे नाराजकारण करणारे पक्षही तिथे होते. ही नगरी उभी करण्यासाठी नगरीच्या लोकांनी दिलेल्या लढ्याचे उदाहरण पक्ष देत होते. तरीही नगरी आडवी करण्याऱ्यांना अडवण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. नगरीबाहेरचे लोक याच्याविरूद्ध होते. आता पुढे काय झाले ऐक.

“या नगरीतून मोठे झालेले काही लोक होते. त्यांच्यामध्ये एक सच्छील असा खेळाडू होता. तोंडावर नियंत्रण असल्याबद्दल त्याची ख्याती होती आणि त्याची कामगिरीही चोख होती. राज्यात सगळीकडे त्याच्या नावाचा दबदबा होता. या नगरीच्या लोकांना त्याचा खास अभिमानही होता. आपला माणूस म्हणून त्याच्याकडे सगळे अपेक्षेने पाहायचे. एकदा काय झाले, कोणालाही अशक्य अशी प्रदीर्घ खेळी केल्याबद्दल या सच्छील खेळाडूचा सत्कार सगळ्यांनी आयोजित केला. राज्याच्या, नगरीच्या नव्हे हां, मुखंडांनी त्याला एका मंचावर ठेवले. याचवेळी बोलताना कधी नाही ते या सच्छील खेळाडूने जाहीर केले, की ही नगरी केवळ त्या नगरीच्या नव्हे तर सगळ्या राज्याची आहे. त्याच्या या वाक्याचा खूप गाजावाजा करण्यात आला. ज्येष्ठांनी टीका केली तर कनिष्ठांनी दुर्लक्ष केले. तर आता तू मला सांग, काहीही गरज नसताना या सच्छील खेळाडूने असा बाँबगोळा का टाकला?  गेला काही वर्षे त्याने फिरकी गोलंदाजी केलेली नाही म्हणून का असा दुसरा टाकला? माझ्या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब दे, राजा नाहीतर तुझ्या या मतलबी मौनाचा मी कडक शब्दांत निषेध करीन. झालंच तर तुझ्या पुतळ्याचे दहन करीन. फेसबुकवरील तुझ्या सगळ्या मित्रांपर्यंत तुझे हे अपयश पोचवीन…” थेट प्रक्षेपण करताना वृत्तवाहिन्यांचे बातमीदार करतात तशी असंबद्ध बडबड करत वेताळ हातवारे करू लागला. तितक्यात कौटुंबिक मालिकांमधील पुरूष मंडळी करतात तसा मख्ख चेहरा करून राजा बोलला.

 

“वेताळा, अरे रिएलिटी शो आणि दररोजच्या मालिका सोडून हा तमाशा बघितल्यामुळे तुला हा प्रश्न पडला का? अरे, ज्या ठिकाणी, ज्या मंचावर हा प्रसंग घडला तो जरा आठवून पाहा बरे. त्यात मुळचे नगरीचे माणसं किती आणि नगरीबाहेरचे मात्र राज्यातील किती, याचा तू अंदाज घेतला का? या सच्छील खेळाडूला फारसे बोलून कधी माहित नव्हते, असे तूच म्हणतोस. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या मुलाखती घेणाऱ्यांनीही त्याला कधी राजकारणाचे प्रश्न विचारले नाहीत. मात्र त्या दिवशी माध्यमांच्या लोकांनी त्याला तावडीत घेऊन त्याला असे काही प्रश्न विचारले, की त्याला ते वाक्य बोलावेच लागले. वरच्यांना सांभाळण्यासाठी जे खालच्यांना दाबतात, त्यांनाच माध्यम म्हणतात हे तुला ठाऊक नाही का? भौगोलिकदृष्ट्या नगरी ही राज्याचाच भाग आहे, हे कोणीही बोलू शकतो. शिवाय वर्षातले आठ-दहा महिने नगरीबाहेर तेही राज्याबाहेरच काढणाऱ्या त्या खेळाडूला वास्तव परिस्थिती काय आहे, याचं ज्ञान असण्याची शक्यता किती?

“वेताळा, आपल्याला हवं ते कोणाकडून कसं बोलवून घेतलं जातं याचा एक उत्तम नमुना तुला माहित आहे का? सर्वोच्च धर्मगुरु पोप एकदा परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांचे विमान जमिनीला लागताच पत्रकारांनी त्यांना घेरले. पत्रकारांनी त्यांना विचारले, तुम्ही येथील वेश्यांना भेटणार का? त्यावर पोप उत्तरले, येथे वेश्या आहेत का? दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत ठळक मथळा होता, पोप विचारतात येथे वेश्या आहेत का? अशा परिस्थितीत त्या बिचाऱ्या खेळाडूचा दोष काय? त्याच खेळाडूचे दुसरे वाक्य होते, की त्याला या नगरीचा नागरिक असल्याचा अभिमान आहे. त्याला मात्र पत्रकारांनी कशी बगल दिली, हे तू पाहिले नाहीस काय? त्यामुळे वेताळा, या साऱ्या घटनेत त्या खेळाडूचा दोष किंचितही नसून त्याच्या तोंडून आपला अजेंडा राबवून घेणारे नगरीबाहेरचे पत्रकार  आणि अशा लोकांना तोंड देण्याचा खेळाडूला नसलेला अनुभव, या तेवढ्य़ा दोषी आहेत.”

राजाने आपले भाषण संपविले नाही तोच वेताळाने एक गडगडाटी हास्य केले. तो म्हणाला, “राजा, तू राजा असल्याने पत्रकारांना कसे हाताळावे तुला माहित आहे. त्यामुळेच तू काहीही बोलत नाहीस. मात्र वेताळ होण्यापूर्वी मीही पत्रकारच होतो. त्यामुळे गप बसणाऱ्यांना कसे बोलते करावे, हे मलाही माहित आहे. आता तू बोललास आणि मी चाललो. आता पुढल्या इलेक्शनपर्यंत मला असेच झाडावर मालिका पाहत बसू दे.”

इतके बोलून वेताळाने फटफटीवरून रस्त्यावर उडी मारली. विरूद्ध बाजूने जाणाऱ्या एका सहा आसनी रिक्षाला हात दाखवून त्याने ती थांबविली आणि राजाला कळायच्या आत तो रिक्षात बसलाही. भाज्यांचे वाढणारे भाव बघत राहावेत तसा राजा त्या रिक्षाकडे पाहत राहिला.

Saturday, November 14, 2009

शेतकरी आणि राजाः माध्यमांची अदलाबदल

-अँड्रयू ब्राऊन (गार्डियन)

जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये ७० लाख डॉलरच्या जाहिराती गुगल देणार आहे, हे ऐकून एक पत्रकार म्हणून मला आनंद झाला. जणू काही आता ख्रिसमसच आहे. मात्र कुडकुविणाऱया थंडीचा ख्रिसमस व मी जणू एक शेतकरीच आहे. या शेतकऱयाला उदार राजाने पाहिले स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करताना पाहिले.

हा राजा-गुगलचा अध्यक्ष एरिक श्मिड्ट- आपल्या हुजऱयासोबत येतो आणि त्याच्या मेजवानीतून उरलेले पक्वान्न मला पोचत करायला सांगतो. या पक्वान्नांबाबत माझी काहीच तक्रार नाही. मात्र राजा गेला आणि मी झोपडीत परतलो, की तो राजाच राहणार आणि मी शेतकरीच राहणार. राजा आणि शेतकऱयातील फरक एवढाच नाही, की एकाला पोटभर खायला मिळते आणि दुसऱयाला नाही. हा फरक महत्वाचा आहे, मात्र तो बदलू शकतो खरा महत्वाचा फरक म्हणजे राजा शेतकऱयाचे आहे नाही ते अन्न हिरावून घेऊ शकतो. शेतकऱयाची ती प्राज्ञा नसते. त्याचा तर त्याने स्वतःच्या मेहनतीने कमाविलेल्या संपत्तीवरही हक्क नसतो.

वर्तमानपत्रे ऑनलाईन होत असताना त्यांची गती हीच होणार असल्याची त्यांना भीती आहे. नव्या जगात आपण गुगलचे मजूर असणार आहोत. आतापर्यंत लोक वर्तमानपत्रे विकत घेत. आता, लोक जाहिरातदारांकडून मिळणाऱया सेवांशिवाय इतर कशासाठीही पैसा देण्यास तयार नाहीत. बातमीचे कार्यही आता केवळ जाहिराती मिळविणे, एवढेच राहणार आहे. पत्रकारांना मान्य नसले तरी हे कायमचे सत्य आहे. आता इंटरनेटच्या काळात तर प्रत्येक गोष्टीमागे हेच सूत्र असणार आहे.

वर्तमानपत्रांतून पैसा कसा मिळतो, हे केवळ वर्तमानपत्रे चालविणाऱयांनाच माहित. लॉर्ड बीवरब्रुक यांनी तर त्यांच्या यशाचा एक नियमच तयार केला होताः कोणत्याही पत्रकाराच्या जागी दुसरा एखादा पत्रकार आणता येतो. मात्र वर्तमानपत्रांतून पैसे मिळविणारे लोक आता वर्तमानपत्राचे नव्हे, तर गुगलचे मालक आहेत. ते एक पाऊल पुढे टाकून असंही म्हणू शकतातः कोणत्याही वर्तमानपत्राच्या जागी दुसरे वर्तमानपत्र आणता येते.

गुगल काही दुष्ट नाही. सुरक्षितही आहे. मात्र पन्नास वर्षांनी याच कंपनीचा इंटरनेटच्या बाजारावर कब्जा राहिल, असे म्हणणे मूर्खपणाचे होईल. खरं तर त्यावेळी लोकांना टाईप करताना किंवा कोणाशी बोलताना आपण एखाद्या बाजाराचा हिस्सा आहोत, याची कल्पनाही येणार नाही. त्यांना ती जादूच वाटेल. मात्र त्या जादूतून कोणीतरी पैसे कमाविलच आणि तो कोणीतरी आपण नसू. आता गुगल पुस्तकांच्या जगात प्रवेश करत आहे. वर उल्लेख केलेल्या जाहिराती या जगातील सर्व महत्वाच्या ग्रंथालयांचे डिजिटाईजेशन करून ते मोफत उपलब्ध करून देण्याच्या मोठ्या योजनेचा भाग आहेत. या पुस्तकांचे प्रताधिकार असणाऱयांना, ज्यांच्यासाठी त्या जाहिराती दिल्या आहेत, विशिष्ट रक्कम दिली जाईल. रेडियोवर प्रसारित होणाऱया संगीतासाठी कलाकारांना मानधन मिळते, तसेच आहे हे. अशा व्यवस्थेतून गेल्या वर्षी मी ३७.५० पौंडांची कमाई केली. त्यामुळे मी सांगू शकतो, की या योजनेत खाचखळगे आहेत. पण तो गुगलचा दोष नाही.

पुस्तकांचे प्रकाशन इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच केवळ होणार असेल, तर लेखकांचे आणखी मरण आहे. कारण पुस्तक लिहिणे हे कॉपी प्रोटेक्शनच्या दृष्टीने सर्वमान्य आणि साधे साधन आहे. पुस्तकांचीही डिडिटल संगीतासारखी उचलेगिरी होणार असेल, तर पुस्तक लिहिणाऱयांच्या दृष्टीने ती धोक्याची घंटा ठरेल. एखाद्या बाजाराचेही काही कायदे असतात व त्यांच्या अंमलबजावणीचे मार्गही. शेतकऱयांना राजांची भीती वाटत असे, मात्र त्यांना अराजकाची जास्त भीती वाटत असे. त्याला तशी कारणेही होती. गुगल हा चांगला, समर्थ, समंजस राजा वाटतो. मी तरी या राजाचे स्वागत करतो. 

----------------------

सहा महिन्यांपूर्वी गार्डियन वृत्तपत्रात आलेल्या लेखाचा Andrew Brown यांच्या लेखाचा हा अनुवाद. यात गॉर्डन यांनी गुगलमुळे वृत्तपपत्रांवर
होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे.Friday, November 13, 2009

मनसेला पाठींबा दक्षिणेचा

राज ठाकरे आणि त्यांची मनसे यांच्याबद्दल मराठी माध्यमांत आणि ब्लॉगवर इतकं काही लिहिले जात आहे. मात्र अन्य माध्यमांत, खास करून दक्षिण भारतीय भाषांमध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहेत, याचा कोणीही अदमास घेताना दिसत नाही. काही तेलुगु आणि तमिळ वर्तमानपत्रे व ब्लॉगचा धुंडाळा घेण्याचा प्रयत्न केला. वर्तमानपत्रांची प्रतिक्रिया साधारण आपल्यासारख्या वर्तमानपत्रासारखीच आहे. मात्र ब्लॉगवरील प्रतिक्रिया या अधिक मोकळ्या आणि खऱ्या आहेत.

काही ठिकाणी हिंदी न शिकल्यामुळे तमिळ लोकांचे नुकसान झाले आहे, असा सूर आहे तर काही ठिकाणी पेरियार यांनी एके काळी जे केले तेच राज आणि मनसे आता करत आहेत, अशीही स्पष्टोक्ती आहे. मनसेच्या आमदारांची कृती देशाच्या ऐक्याला घातक आहेत असे काही म्हणतात. एका व्यक्तीने मात्र, या आमदारांची कृती विघातक असल्याचे सांगतानाच, हिंदी हि देशाची राष्ट्रभाषा असल्याचे असत्य पसराव्नियात येऊ नये, अशीही विनंती केली आहे.

आन्ध्रप्रभा हे एक्सप्रेस समुहाचे तेलुगु प्रकाशन. या वर्तमानपत्राने १२ नोवेम्बेरच्या अग्रलेखात मनसेचा समाचार घेतला आहे. "भाषा आणि प्रांताच्या दुराभिमानाचे प्रतिक असलेल्या  शिवसेनेत राज यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्यात आणि शिवसेनेत फारसा फरक नाही. भाषा आणि अन्य कारणावरून लोकांमध्ये फूट पाडणारे अनेक पक्ष, संघटना आणि व्यक्ती या देशात आहेत. केवळ उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक भांडणामुळे राज यांनी हा तमाशा चालविला आहे," असे मत आन्ध्रप्रभाने व्यक्त केले आहे.

सिंगापूर येथील तमिळ अभियंता को वी कन्नन याचा ब्लॉग आहे 'कालम' नावाचा. त्याच्या १० नोवेम्बेरच्या पोस्टाचे शीर्षक आहे 'महाराष्ट्राविल परवुम द्राविड वियादी' (महाराष्ट्रात पसरणारा द्रविड रोग). त्यात त्याने लिहिले आहे, की हिंदी न शिकल्यामुळे दक्षिण भारतीय लोकांना अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचे चित्रपट पाहता येत नाहीत, तमिळ पर्यटकांना देशाच्या इतर प्रांतात गेल्यावर नीट  आस्वाद घेता येत नाही. उत्तर भारतीय उद्योजक तमिळनाडूत व्यवसाय करण्यापूर्वी चार-चारदा विचार करतात. मोठ-मोठे राष्ट्रीय नेते तमिळनाडुत गेल्यावर केवळ भाषेच्या अज्ञानामुळे जनतेशी संवाद स्थापू शकत नाहीत. द्रविड नेत्यांच्या हिंदी विरोधाची आठवण करून देऊन लेखकाने वर, 'म्हणजे द्रविड संस्कृती संपूर्ण भारतात पाय पसरत आहे,' अशी मार्मिक टिप्पणी केली आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या राजा वैस या तमिळ लेखकाने एकप्रकारे मनसेची पाठराखण केली आहे. जेमतेम २५०-३०० शब्दांची ही पोस्ट मुळातूनच वाचण्यासारखी आहे. रजनीकांतच्या एका जुन्या संवादाची आठवण करून राजा म्हणतो, "अबू आझमीला आधी सांगून मारले या घटनेतून राज यांनी आपला शब्द पाळला. ज्याप्रकारे हिंदी वाहिन्या अबूच्या कुटुंबावर फोकस करत होत्या ते पाहून या माणसाला इतके महत्व देण्याची गरज आहे का, असा प्रश्न पडत होता. हिंदी आणि मराठीच्या लिपीत फारसा फरक नसल्याने ज्याला हिंदी येते त्याला मराठीही येते. अशा परिस्थितीत मला मराठी येत नाही हे अबुचे म्हणणे कोणालाच मान्य होण्यासारखे नाही. मारहाण करणे चुकीचे असले तरी त्या मारहाणीमागे  काही योग्य कारण आहे. असा राग ५० वर्षांपूर्वी तमिळ लोकांनी दाखविला म्हणूनच हिंदीच्या विरोधात लढा यशस्वी झाला."

अर्थात याच्या उलटही काही प्रतिक्रिया आहेत. त्यात राज ठाकरे हे दहशतवाडी असल्याचे म्हणणारे जसे ब्लोग आहेत तसे केवळ हिंदी माध्यमांतील बातम्यांचे भाषांतरही आहेत.

Thursday, November 12, 2009

माहिती हवीय तर मोबदला द्या

माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांनी अखेर गुगल विरूद्ध युद्धाचे बिगुल फुंकले आहे. गेली दोन तीन वर्षे पाश्चात्य माध्यमांना, खासकरून मुद्रीत माध्यमांना गुगलने, त्यातही गुगल न्यूजने जेरीस आणले आहे. विविध पातळ्यांवर याबाबत चर्चा चालू असतानाच, आपल्य़ा मालकीच्या न्यूज कॉर्पोरेशन समूहाच्या संकेतस्थळांवर गुगलच्या बॉट्सना (BOTS) प्रवेश न करू देण्याचे सूतोवाच मर्डोक यांनी केले आहे. आपल्याच स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत मर्डोक यांनी म्हटले आहे, की या संकेतस्थळांवर येणारे पाहुणे गुगलच्या शोधपरिणामांतून येतात. त्यांची संकेतस्थळावरील मजकूराशी सलगी नसते. त्यामुळे अशा उचलेगिरी करणाऱ्या लोकांपेक्षा मोजकेच पण पैसे देऊन वारंवार येणारे वाचक या संकेतस्थळांवर यावेत, असा प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी मुदत देण्यात आलेली नाही.

बातम्या पुरविणाऱ्या बहुतेक संकेतस्थळांची कमाई ही त्यावरील जाहिरातींच्या उत्पनातून होत असते. मात्र इंग्रजीसारख्या भाषेत जिथे जगभरातील वर्तमानपत्रे, वाहिन्या आणि ब्लॉग्ज अहोरात्र मजकूर (content) पुरवित आहेत, तिथे जाहिराती येणार किती आणि कुठून? गुगलच्याच अॅडसेन्सने प्रकाशकांना जाहिराती मोठ्या प्रमाणात पुरविल्या मात्र त्यातून उत्पन्न अगदी तटपुंजे मिळते. एखाद्या छोट्या ब्लॉगरला कदाचित त्यातून आपली उपजीविका भागविणे शक्य असेल मात्र मोठ-मोठ्या कंपन्यांनी त्यावर कसे भागवावे? मर्डोक यांनी याच मुद्यावर बोट ठेवले आहे. "गुगलवरील एखादे शीर्षक बघून कोणीतरी या संकेतस्थळांवर येतो आणि जातो. त्यातून फायदा काय होणार? लोकांना मोफतमध्ये काही देऊ नये," असं त्यांचं म्हणणं आहे.

मर्डोक यांच्या म्हणण्यात काहीसं तथ्य आहे. अशा पद्धतीने वाचकांना मोफत काही न देता माहितीसाठी मोबदला घेण्याने उत्पन्न काहीसे वाढेल. शिवाय इंग्रजीत नक्कल करणे खूप सोपे आहे. त्यामुळे एखादी बातमी कोणत्याही संकेतस्थळाने पहिल्यांदा दिली, की तीच Ctrl+c Ctrl+v करून जुजबी फेरफार केले, की दुसऱ्या संकेतस्थळांवर दिसायला लागते. अगदी अल्पावधीत ती इतक्या ठिकाणी पसरते, की मूळ बातमी देणाऱ्याचे संकेतस्थळ पाहण्याची कोणाला गरजही पडत नाही. मायकेल जॅक्सनच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी टीएमझेड या संकेतस्थळाने दिली होती. मात्र भाव खाल्ला लॉस एंजेलिस टाई्म्सच्या संकेतस्थळाने. त्यामुळे मर्डोकसाहेब बोलले ते खरं आहे. मात्र त्यात एक मेख आहे.

बातमी देणाऱ्याने आपले हात आखडते घेतले तरी वाचणाऱ्याला ती वाचायची उत्सुकता हवी. मर्डोक यांच्याकडे वॉल स्ट्रीट जर्नल, फॉक्स न्यूज, स्काय न्यूज अशी यशस्वी ब्रांड्स आहेत. त्यातील डब्लूएसजेने मजकुरासाठी मोबदला घेण्याची पद्धत आधीच राबविली आहे. अन्य संकेतस्थळांवरील मजकुरासाठी तसेच पैसे मोजण्याची वाचकांची इच्छा आहे का, हाच कळीचा प्रश्न आहे. अन् वाचकाने पैसे मोजले तर त्याबदल्यात त्याला त्याच प्रतीचा मजकूर मिळेल, याची काय व्यवस्था आहे. मर्डोक यांच्या मुलाखतीनंतर अनेक ठिकाणी, अनेक फोरमवर चाललेल्या चर्चेचा इत्य़र्थ हाच आहे. इंटरनेटवरील मुक्त आणि मोफत माहितीची सवय झालेला वाचक खिशात हात घालून बातमी वाचणार का, हा मोठा सवाल आहे. या प्रश्नाचे उत्तर खुद्द मर्डोक यांच्याकडेही नाही.

दरम्यान, गुगलने आपली बाजू स्पष्ट करताना म्हटले आहे, की आम्ही वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर दर महिन्याला अब्जावधी वाचक (किंवा प्रेक्षक म्हणा) पाठवत असतो. (त्यातील गोम अशी, की गुगल हजारो वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांची यादी सादर करतो. अब्जावधी वाचक हजारो संकेतस्थळांवर सरासरी दीड मिनिटांसाठी गेल्यानंतर ते कोणत्या जाहिरातींवर क्लिक करणार आणि त्यातून वृत्तपत्रांना काय डोम्बले मिळणार). या वाचकांना खिळवून ठेवण्याची, त्यांना आपल्या व्यवसायाशी बांधून ठेवण्याची संधी प्रकाशकांना (म्हणजे संकेतस्थळ मालकांना) मिळते. प्रकाशकांना वाचक हवे असतात म्हणूनच तर ते मजकूर प्रकाशित करतात. शिवाय आपल्या संकेतस्थळांवर काय असावे-नसावे याचे पूर्ण स्वातंत्र्य संकेतस्थळधारकाला असते.

आता सामना सुरू झाला आहे आणि तो अनेक वळणे घेत जाणार आहे. पाहूया पुढे काय होते ते.


Monday, November 9, 2009

आज खरी विधानसभा जनसभा झाली

महाराष्ट्राच्या विधानसभेत चार आमदारांनी गोंधळ काय घातला, त्या आमदारांना चार वर्षांसाठी निलंबित करण्याचे मोठे पाऊल सरकारने उचलले. ज्या त्वरेने हर्षवर्धन पाटील यांनी प्रस्ताव मांडला आणि तो मंजूरही झाला, त्याच तडफेने सरकारने येत्या काळात काम केले तर पुढील चार-पाच सरकारांना राज्यात करण्यासारखे काहीही काम उरणार नाही. मात्र सरकारला चाळीस वर्षांपासून यशस्वी ठरलेली रोजगार हमी योजनाच आणखी यशस्वी करायची असल्याने, भावी सरकारांचा रोजगार हिसकावून घेण्याची आगळीक ते करणार नाही.

विधानसभेत अबू आझमी यांना थोबाडीत मारून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा घालविली, यामुळे पुरोगामी आणि वैचारिक महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, राडा संस्कृतीची ही पुढची पायरी आणि राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच एवढी अधोगती गाठल्या जाणे हा दैवदुर्विलास आहे….इ. इ. मला या चार ओळी लिहिताना धाप लागली. मात्र अशा चार-चार स्तंभी (पाचवा स्तंभही भरू शकतो मात्र त्याला पंचमस्तंभी म्हणायचे नाही) लेख येत्या काही दिवसांत अगदी धो-धो येणार. नाहीतरी अद्याप जाहिरातींचा रतीब पूर्वासारखा सुरू न झाल्याने जागा कशी भरायची, हा प्रश्नच आहे. मराठी आणि इंग्रजीतील स्वतःला शहाणे समजणाऱ्या पत्रकारांच्या लेखणीला धार येईल.

मात्र कधी न कधी विधानसभेत हे व्हायचेच होते. ज्या विधानसभेत एक सदस्य दुसऱ्यावर पेपरवेट फेकतो, ज्या विधानसभेत माईक आणि राजदंडाची पळवापळव करण्याचे सामाईक वरदान विरोधी पक्षांना मिळाले आहे त्या विधानसभेत सदस्यांनी पडेल चेहऱ्याने चर्चा करावी, ही अपेक्षाच नाही. पाण्याच्या प्रश्नावर मोर्चे काढल्यानंतर बंदुकीतील गोळ्यांना बळी पडणाऱ्या, पुतळ्यांना कोणी हात लावला म्हणून जीवंत माणसांना माणसातून उठविणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई केल्यास पोलिसांवर डाफरणाऱ्या आणि गंमत म्हणून लोकल गाड्यांवर दगड फेकणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी एकमेकांशी मुद्याला धरून बोलताहेत, हे चित्रच अनैसर्गिक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली पन्नास वर्षे अपवाद वगळता हे चित्र अगदी रंगवून-रंगवून प्रदर्शित करण्यात आले. मात्र त्याचे प्रदर्शनीय मूल्य आता संपले असून वास्तविक होण्याचे दिवस आले आहेत, या राज्यस्थापनेला पन्नास वर्षे होत असतानाच दाखवून दिल्याबद्दल खरे तर मनसे आमदारांचे आपण आभारी असायला हवे.

राज ठाकरे याच्या 13 नवनिर्माण सैनिकांपैकी चारांची गच्छंती झाल्याने आता त्यांच्या आमदारांची संख्या 9 वर आली आहे. त्यांना ही संख्या लाभदायक आहे म्हणे.  सभागृहाने या सदस्यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्याऐवजी डायरेक्ट बडतर्फ का केले नाही, हे गौड'बंगाल’ कोण उलगडील बरे. या चार जागांवर कदाचित निवडणूक झाली आणि जादा मतांनी हे चौघे निवडून आले तर कोण उगाच विषाची परीक्षा घ्या.  त्यापेक्षा हे बरे आहे. प्रत्येक प्रसंगात बरेपणा पाहण्याच्या या गुणाला कधीकधी चाभरेपणा असंही म्हणतात. आपल्या विधानसभेच्या सदस्यांना त्यांच्या अंगावर कोणी हात टाकलेले आवडत नाही. त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा अंगिकार करण्याचे त्यांना वावडे नाही. सात-आठ वर्षांपूर्वी मराठवाड्यातील विना-अनुदानित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सभागृहातच आमदारांच्या अंगावर उड्या मारल्या होत्या. त्यावेळी सभागृहात चर्चाच चालू होती आणि पोरं प्रेक्षक गॅलरीत बसली होती. उड्या मारल्यानंतर सर्व आमदारांनी त्या पोरांना तर चोप दिलाच नंतर त्यांना पोलिसांनीही ताब्यात घेतले. आता मारणारे आणि मार खाणारेही सभागृहाचेच सदस्य असल्याने अॅक्शनपट अधिक रंगणार आहे.

त्यामुळे मनसेचे सदस्यहो, तुम्ही बिल्कुल मनाला लावून नका घेऊ. महाराष्ट्राच्या सध्याच्या मानसिकतेला साजेसेच कृत्य तुम्ही केले आहे. रिझल्ट ओरिएंटेड अशा या मार्गाची कास धरल्याशिवाय, विकासाची सुतराम शक्यता नाही, हे लक्षात घ्या. पारंपरिक मार्गाने जाल तर फार फार तर राळेगण सिद्धीपर्यंत पोचाल. त्यापेक्षा सर्व सिद्धीला कारण ठरणाऱ्या या मार्गावरून तुम्ही जसजसे जाल, तसतसे अधिकाधिक लोकप्रिय व्हाल. कारण, सध्याच्या काळात कोणालाही प्रिय व्हायचे असेल तर अन्य कोणाल तुडविणे, बडविणे, वाजविणे (देशकालपरिस्थिती पाहून)  आवश्यक आहे. आम्हाला कोणाही आजमावून पाहू शकत नाही, हे तुम्ही दाखवूनच दिले. पूर्वी वेडात सात वीर दौडत जायचे, आता वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्यांना चार जणही ठणकावू शकतात, हा या घटनेचा मथितार्थ.

……………….

वि. सू. अबू आझमी या माणसाबद्दल काहीही लिहिलेले नाही. तो उल्लेख अनवधानाने राहून गेलेला नसून, मुद्दाम केलेला नाही.

Friday, November 6, 2009

कस्त्वं कोऽहं कुत आयातः

मी कोण हा मानवाला पडलेला पहिला प्रश्न आणि त्याचे उत्तर आजतागायत तो शोधतोच आहे. मी कोण हा प्रश्न जसा माणसाला पडतो, तसाच माझा कोण किंवा आपला कोण हाही प्रश्न त्याला फार चटकन पडतो. जे माणसाचे तेच देशाचे. तेच राज्याचे. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठी माणसाच्या नावाने आंदोलने सुरू झाली, की मराठी कोण आणि उपरा कोण असा वाद सुरू होतो. भारतातही राष्ट्रियतेचा वाद असाच माजलेला आहे. त्यातही काही समूह, काही देश स्वतःची वेगळी अशी ओळख जपतात. मात्र आपण कोण याचा धुंडाळा एक राष्ट्र म्हणून घेणारे देश विरळेच. सध्यातरी हा देश आहे फ्रांस. गेल्याच आठवड्यात मी फ्रांसमधील राजकीय घडामोडींवर लिहून, त्याचा आपल्या देशाशी संबंध जोडला होता. त्यातच याही आठवड्यात तशीच एक घटना घडली, जी आपल्या दृष्टीने रिलिवंट किंवा संबंधित आहे म्हणा.

फ्रांसचे गृह मंत्री एरिक बेसाँ यांनी फ्रासंच्या राष्ट्रीयतेवर, फ्रेंच म्हणून असलेल्या ओळखीबाबत चर्चा सुरू केली आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत देशातील आणि फ्रांसबाहेर असलेल्या फ्रेंच वसाहतीतील नागरिकांना या चर्चेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र संकेतस्थळही सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मूळ फ्रेंच नागरिक आणि परकीय नागरिक यांच्यात तणावाचे अनेक प्रसंग आले. 2005 साली तर या तणावाने दंगलींचे स्वरूप घेतले. शिवाय धार्मिक चिन्हांवर बंदी घालण्याचा विषय तर फ्रांसमध्ये अनेक वर्षे वादाचा विषय आहे. बेसाँ यांनीच गेल्या आठवड्यात बुरख्यावर बंदी घालण्याचे सूतोवाच केले होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाहीच्या तत्वांची देणगी फ्रांसने जगाला दिली आहे. मात्र तेवढे पुरेसे नाही. आताच्या काळाला सुसंगत अशी ओळख आपण निर्माण केली पाहिजे. त्यामुळेच नागरिकांनी या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन बेसाँ यांनी केले आहे.

हे झाले फ्रांसचे. आपण मारे विविधतेत एकता, गंगा जमना संस्कृती वगैरेंच्या गप्पा करतो. मात्र भारतीय म्हणजे काय याचा आपण कधी विचार केलेलाच नाही. भारतीय सोडून द्या, अगदी महाराष्ट्रीय म्हणजे कोण, याचीही आपण चर्चा केलेली नाही. कोणीतरी येतं आणि मराठी माणसावर अन्याय होतो म्हणतं. पण मराठी माणूस म्हणजे नक्की कोणता, हे कोणीच सांगत नाही. मागे एकदा मॅक्स मुल्लर भवनने जर्मन भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतली होती. त्यावेळी कॅनडात राहणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याने छान निंबध लिहिला होता. कॅनडात असताना मी भारतीय असतो, भारतात आल्यावर अनिवासी भारतीय असतो, काहीजण मला दक्षिण भारतीयच म्हणून ओळखतात, माझ्या राज्यात गेल्यावर मी चेन्नईवाला असतो, चेन्नईला गेल्यावर मी हिंदू असतो, हिंदूंमध्ये मी ब्राह्मण असतो आणि ब्राह्मणांमध्येही मी अमुक शाखेचा असतो…इत्यादी.

खऱोखरच आपल्यालाही ही समस्या जाणवत असते. मी कोण म्हणून कसं सांगायचं. आता माझ्याबद्दलच सांगायचे तर पुण्यात मी मराठवाड्यातला त्यातही नांदेडचा असतो. नांदेडला गेल्यावर इतक्या वर्षांच्या पुण्यातील वास्तव्यामुळे सगळे मला पुणेकरच म्हणतात. पुण्यात आल्यानंतर अनेक दिवस विचित्र उच्चारांमुळे माझ्याशी कोणी मराठी बोलायचेच नाही. दक्षिण भारतीय गाण्यांच्या आवडीमुळे मला अनेक लोकं दाक्षिण्यात्यच समजायचे. दाक्षिणात्य लोकांच्या दृष्टीने मी नेहमीच मराठी माणूस होतो. आज का आनंदमध्ये असताना तर सगळे हिंदी भाषक मला माझ्या मराठीपणाची जाणीव करून देत असत. तो त्यांच्या व्यावसायिक अस्तित्वासाठीच्या संघर्षाचा भाग होता, ही गोष्ट वेगळी.

‘अपनी खुदी को जो समझा, उसने खुदा को पहचाना ,’ अशी ओळ एका जुन्या गाण्यात मी ऐकली होती. मग भारतात एवढ्या प्राचीन काळापासून ऋषीमुनी काय सांगत होते? स्वतःला ओळखा म्हणजे तुम्हाला भगवंत मिळतील, अशीच त्यांची शिकवण होती. तरीही भारतात, महाराष्ट्रात आजपर्यंत या विषयावर कोणीच काही बोलले नाही. भारतीय असणे म्हणजे काय, मराठी माणसाचे लक्षण कोणते, भारतीय माणसाचे गुणधर्म काय, भारतीय नागरिकाचा ठळक अंगभूत गुणविशेष काय याबाबत आजवर आपण चर्चाच केली नाही. त्यामुळेच जगातील दृढतम वर्णव्यवस्था असूनही आपण स्वतःला वर्णविद्वेषविरोधातील लढ्याचे नेते समजतो. मूळ लढवय्या असलेला समाज स्वतःला शांततेचा अग्रदूत म्हणवून घेतो आणि आपसातच लाथाळ्या करून एकमेकांची डोकी फोडतो. अशी चर्चा आपल्याकडे व्हायलाच हवी, होऊ दे थोडी वादावादी आणि आरोप-प्रत्यारोप…पण काहीतरी चांगले हाती लागेल. ते एक वाक्य आहे ना…तुम्ही तारे वेचण्यासाठी जाता तेव्हा अयशस्वी होता. मात्र परत येताना तुमचे हात चिखलाने भरलेले असतील, असंही नाही ना.

Wednesday, November 4, 2009

चार एक्क्यांचा डाव

हाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे कवित्व अद्याप सुरू आहे. मनसे फॅक्टर आणि शिवसेनेची हार ही या निवडणूक निकालांची वैशिष्ठ्ये असल्याचे सांगण्यात येते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झालेले पुनरागमन अनेकांना रुचलेले नाही. मलाही. मात्र शेवटी हा राजकीय व्यवस्थेचा अटळ परिणाम आहे. तो नाकारून कसा चालेल. मात्र राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने या निकालांमुळे मोठा फायदा झालेला आहे. पुढील काळात राज्याला दिशा देऊ शकतील, असे चार नेते या निवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या समोर आले आहेत. म्हणजे ते आदी होतेच, मात्र त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या धोरणीपणाची चुणूक याच वेळेस दाखविली.

राज ठाकरे


हा यंदाच्या निवडणुकीतील हुकुमाचा एक्का. राज ठाकरे आणि त्यांची मनसे गेल्या वर्षभरापासून चर्चेत होती. राज्याबाहेरच्या माध्यमांमध्ये आणि लोकांमध्येही मनसेच्या प्रदर्शनाबाबत खूप उत्सुकता होती. ती वावगी नव्हती हे निकालांनी सिद्ध केले. 2008च्या जानेवारीत राज ठाकरेंनी मराठीपणाचा मुद्दा उचलला आणि जणू एखाद्या मधमाशाच्या पोळ्यात हात घातला. या दीड वर्षात त्यांनी जेवढ्या शिव्या खाल्ल्या असतील, जेवढा अपप्रचार झेलला असेल तेवढा देशात कोणीही झेलला नसेल. न्यायाधीशांच्या निकालपत्रातही त्यांचे दाखले देण्यात येतात, म्हणजे बघा.


मनसेच्या यशामागे राज ठाकरे यांच्याकडे असलेली शिवसेनाप्रमुखांची शैली, त्यांची ढब आहे, हे खरेच. मात्र त्यांनी केलेले इम्प्रोव्हायजेशन, कालसुसंगत बदल फारसे कोणी नोंदले नाहीत. बाळासाहेब हा शिवसेना नावाच्या भव्य व्यासपीठावरचा एकपात्री खेळ होता. त्यांच्या ओघवत्या शैलीत आणि संवादात्मक भाषेत त्यांनी टीका करावी, शिव्याशाप द्यावेत यात कोणाला काही खटकत नसे. राज ठाकरे टीका करतात, नकला करतात मात्र राजकीय व्यासपीठावरून ऐतिहासिक दस्तावेजांचे दाखले देणारा सध्याच्या काळात ते एकमेव नेते आहेत. ही त्यांनी खास कमावलेली शैली आहे. शिवसेनेत असताना ते कधी असे करताना दिसत नव्हते. याकामी त्यांना त्यांच्या अनेक साथीदारांची मदत मिळते, हे खरे असले तरी पी. एचडीच्या प्रबंधात शोभेल अशा संदर्भाच्या टीपण्या जोडत राजकीय भाषण करायला जाण लागते ती खास ठाकरे यांची देणगी.


सगळं जग टीका करत असताना, वेड्यात काढत असताना राज यांनी स्वतःचा पक्ष वाढविला. त्याला मुख्य प्रवाहात आणलं. त्यांच्या या आत्मविश्वासाला दादच द्यावी लागेल. पुण्यात जर्मन शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा व्हावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या. अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर खटले भरल्या गेले. त्यातले सगळेच जसे राजकीय सुडबुद्धीने भरलेले नाहीत तसे सगळेच जेन्युइनही नाहीत. काही लोकं पक्ष सोडून गेले आणि जाताना नाना आरोप करून गेले. मात्र अशा परिस्थितीतही मनसेचे इंजिन ट्रॅकवर ठेवण्यात राजना यश आलं. मनसे म्हणजे गुंडगिरी असं म्हणणाऱ्यांना ही एक चपराक आहे.


मनसेतला मोठा दोष म्हणजे एका नेत्यावर अवलंबून असला तरी त्या नेत्याच्या आदेशावर चालणारा तो पक्ष नाही. कार्यकर्ते स्वतःच्या विचारानुसार काहीतरी करतात आणि नेते त्याचे समर्थन करतात, असं चाललं आहे. राजचा राज्याभिषेक झाला आहे मात्र त्यांचे अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात यायचं आहे. बाळासाहेब स्वतः जेवढे मोठे झाले तेवढेच त्यांनी मनोहर जोशी, सुधार जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे यांना मोठे केले. मनसेत राज वगळता कोणाचीही सार्वत्रिक ओळख नाही. मनसेचे आमदार तर निवडून आले, आता त्यांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजेत, काम करायला पाहिजे यावर माझा विश्वास नाही. तसं असतं तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन्ही निवडणुकांत विजय मिळाला नसता. त्या साधूने सापाला दिलेला सल्ला आजही तितकाच खरा आहे, “डसू नको पण फणा काढायला काय हरकत आहे?”


अजित पवार


एका पुतण्याने स्वतःचा पक्ष काढून तो यशस्वी करावा आणि दुसऱ्या पुतण्याने काकांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा, हा अगदीच योगायोग आहे. यंदाची निवडणूक ही अजितदादांनी अगदी अस्तित्वाची लढाई बनविली होती. त्यामुळेच कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला 20 जागा कमी मिळाल्या आणि अजितदादांचे 15 ते 20 समर्थक अपक्ष आमदार बनले, या योग जुळून आला. खुद्ध पुणे परिसरात तीन आमदार अजित पवार यांना मानणारे आहेत आणि तिघेही बंडखोर असावे, याची संगती त्याशिवाय लागणारी नाही. शिवाय पक्षातर्फे निवडून आलेल्यांमध्ये दादांना विरोध करण्याचा प्राज्ञा कुठे आहे.


आपण केंद्रात पंतप्रधान व्हावे आणि सुप्रिया सुळे यांना वारसदार नेमावे, ही शरद पवार यांची मूळ योजना. लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत ती कागदावर भक्कम वाटायची. मात्र त्या निवडणुकीच्या निकालानंतर योजनेचाही निक्काल लागला आणि अजितदादांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यदाकदाचित राष्ट्रवादीचे अधिक आमदार निवडून आले असते, तर सुप्रियांना मुख्यमंत्री करण्याची चाल साहेब खेळणे शक्य होते. त्यातूनच अजितदादांच्या माणसांना तिकिटवाटपात झुकते माप देण्यात आले नव्हते. केवळ मुख्यमंत्रिपद घ्यायचे यासाठी दोनदा उपमुख्यमंत्रिपद नाकारणाऱ्या अजितदादांच्या हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता. निव़डणुकीपूर्वी पुण्यात मनसेचीही सरकार स्थापनेसाठी मदत घेता येऊ शकते, ही त्यांची सूचना हा केवळ बोलभांडपणा नव्हता. तो एक गर्भित इशारा होता. आताही उपमुख्यमंत्र्याच्या निवडीवरून जो गोंधळ त्यांनी घातला, तो फुकाफुकी केलेला तमाशा नव्हता. शरद पवार यांच्या अगदी ऐन भराच्या काळात त्यांना स्वतःचे जास्तीत जास्त 60 आमदार निवडून आणता आले. आता पक्षातले 10 ते 15 आणि बंडखोर 15 असे 30आमदार आपण निवडून आणू शकतो, हे अजितदादांनी दाखवून दिले आहे.


राजकारण हा रमीच्या डावासारखा असतो. त्यात केवळ एक्का हातात असून चालत नाही. राजा, राणी असा सिक्वेंसही जुळावा लागतो. शिवाय जोकरचाही जोर पाहावा लागतो. दादांना कदाचित हे यावेळी जमले नसेल. ज्यावेळी त्यांच्या हातात सिक्वेंसचे पत्ते येतील, त्यावेळी राज्यात पुलोदच काय, वसंतदादांचीही पुनरावृत्ती होऊ शकते, हे या निवडणुकीचे इंगित.


अशोक चव्हाण


अशोक शंकरराव चव्हाण महाराष्ट्राला नवी दिशा देऊ शकतील, हे विधान प्रचंड वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. अकरा महिन्यांपूर्वी त्यांना मुख्यमंत्री केले तेव्हा कॉंग्रेसला पराजयाचे डोहाळे लागले आहेत, असा सूर काढला गेला. त्यांच्या कर्तृत्वावर विरोधकांचा सोडा, त्यांच्या स्वपक्षीयांचाही विश्वास नव्हता. मात्र नांदेड जिल्ह्यात स्वतःच्या राजकारणाची शैली बदलण्याऱ्या चव्हाण यांनी वडिलांच्या राजकारणापासून फारकत घेऊन, नाना क्लृप्त्या लढवून आपल्या पक्षाला विजयी केलं. तोंडाची वाफ फारशी न दवडता प्रतिस्पर्ध्यांची हवा काढण्याचं तंत्र चव्हाण यांनी राबवलं. त्यामुळेच बाळासाहेब शिवरकर, प्रताप पाटील चिखलीकर असे विलासराव समर्थक घरी बसले. राणेंच्या स्वतःच्या जिल्ह्यात पडझड पाहावी लागली.


खुर्चीत बसताच पहिल्याच महिऩ्यात चव्हाण यांनी नांदेडला स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करून वादाला तोंड फोडलं. पण त्यात स्वतः एका शब्दाचीही भर घातली नाही. लातूरकर देशमुख समर्थक आणि अन्य नेत्यांची ती झुंज दोन महिने चालली. त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी स्मारकाच्या समितीवर बाबासाहेब पुरंदरे यांना घेऊन, मराठा संघटनांना उचकवलं. त्या वादात मराठा-मराठेतर असं ध्रुवीकरण झाल्याचं राष्ट्रवादीला निवडणुकीच्या निकालानंतर समजलं. गेल्या खेपेस शिवाजी महाराजांच्या नावावर नौका पार करणारी राष्ट्वादी यावेळेस त्याच शिवाजीमुळे रसातळाला गेली. आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना बेडूक म्हणून चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना भडकाविण्याचे काम केले. त्यांनी ते केळीचे साल एवढे बेमालूम फेकले, की खरोखरच राज मोठा झाल्याचा भ्रम करून घेऊन उद्धवनी सरकारऐवजी त्यांच्यावरच तोफा रोखल्या. त्या सालीवरून घसरल्याचे दादूंनाही उशिराच समजलं. सत्तेच्या रेसमध्ये कॉंग्रेसचा शंभर वर्ष जुना गाडा विनमध्य़े आणायचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.


माणसं जोडण्याचे राजकारण शंकररावांनी कधीच केले नाही. हेडमास्तर या नावानेच त्यांना ओळखले जाई. आताआतापर्यंत अशोकरावही माणसं जोडण्याच्या फंदात पडले नव्हते. मात्र गेल्या पाच एक वर्षांपासून त्यांनी स्वतःच्या शैलीत प्रचंड बदल केले आहेत. आपल्या मुख्य आधारवर्गातील प्रत्येकाला समाधानी ठेवण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले आहे. एखाद्याला तोडून बोलणे, कोणाचा अपमान करणे अशा प्रकारांपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारवर चप्पल फेकणारे चिखलीकर समर्थक किंवा हेलिकॉप्टरवर शिवनेरी येथे दगडफेक करणारे मराठा ब्रिगेडचे कार्यकर्ते, यांच्याविरोधात चव्हाण कठोरपणे बोलल्याचे वाचले किंवा ऐकले आहे तुम्ही? पक्षश्रेष्ठी या चार अक्षरी मंत्रावर चव्हाण यांची श्रद्धा आहे. ते त्यांचे बळ आहे आणि दुबळी जागाही. त्यांच्या सगळ्या चालींमध्ये ते भान बाळगलेले असते. त्यामुळेच विलासरावांप्रमाणे काही अवचित घडलं नाही तर ते आपली कारकीर्द पूर्णही करू शकतात. कारण चव्हाणांना सत्य साई बाबा जसे प्रसन्न आहेत तसे सत्तेचे बाबा कोण हेही माहित आहे.


उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे हे नायकच मात्र ग्रीक शोकांतिकेतील नायकाप्रमाणे झाले आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या विजयापेक्षा आपल्या पराभवाची चर्चा जास्त व्हावी, याचं शल्य त्यांना असणारच. खरं तर त्यांनी खूप मेहनत घेतली होती मात्र नाटकातील केवळ मुख्य पात्राने चांगलं काम करून भागत नाही, त्याला इतरांची तशीच जोड मिळावी लागते. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना पात्रं नाही, मेषपात्रं मिळाली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी रान उठविलं असेल, मात्र त्यांनीच नेमलेल्या रामदास कदमांना मराठवाडा किंवा विदर्भात कोणती पिकं केव्हा घेतात, हे तरी माहित आहे का. बाळासाहेबांच्या सान्निध्यात अनेक कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला बहर आला. दिवाकर रावते, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे अशी अनेक नावे आहेत. उद्धव यांच्याकडे स्वतःची अशी कुठलीच नावे नाहीत. या चपलाच आपली संपत्ती आहे, असं प्रबोधनकार सांगत असल्याचं शिवसेनाप्रमुख नेहमी आठवण सांगतात. उद्धव यांची माणसं कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोचूच देणार नसतील, तर चपला अन्यत्रच वळतील. मीनाताई ठाकरे गेल्या तेव्हा मी मुंबईत होतो. त्यांच्या अस्थी राज्यभर फिरविण्यात आल्या होत्या. मुंबईच्या आमदार निवासात शिवसेना कार्यकर्ते त्या अस्थी नांदेडला नेण्यासाठी थांबले होते. त्या अस्थी मी डोक्यावर घेईन, या कारणासाठी तेव्हा भांडणारे कार्यकर्ते आज भाजपमध्ये आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत.


मी थकलेलो नाही, पराभूत नाही, हे सांगण्यासाठी उद्धव दोन दिवस न घेते तर त्यांच्या संघर्षाला उदात्ततेची किनार लाभली असती. मनसेसारखे आव्हान, भाजपसारखा आपमतलबी सहकारी, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सारखे निर्ढावलेले सत्ताधारी आणि शिवसेनाप्रमुखांचा वारसा चालविण्याचे आव्हान, तेही त्यांच्यापेक्षा सर्वस्वी वेगळ्या अशा शैलीत, ही सामान्य गोष्ट नाही. उद्धव यांचा एकट्याचा खांदा त्यासाठी पुरेसा नव्हता, ही गोष्ट त्यांच्याशिवाय इतर सगळ्यांना कळत होती. मी चुकलो, असं म्हणायची पद्धत ठाकरे घराण्यात नाही. त्यामुळेच आपले धोरण चुकले, हे त्यांनी मान्य केलं नाही. उलट दोन वर्षांत मनसे फॅक्टर नाहीसा होईल, असा स्वप्नाळू आशावाद त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे बाहेर पडले तेव्हा भुजबळ 1992 मध्ये बाहेर पडले आणि 1995 मध्ये आम्ही सत्तेत आलो, असा फसवा युक्तिवाद त्यांनी केला. शिवसेनेची राडा संस्कृती त्यांनी नष्ट केली हे खरे, पण त्यामुळे संघटनेची परिणामकारकता गेली त्याचे काय? असाच फसवा युक्तिवाद त्यांनी मुंबई महापालिकेतील विजयानंतरही केला होता.


उद्धव यांच्या नेतृत्वाला भवितव्य आहे का, या प्रश्नाला मी उत्तर देईल, हो आहे. निवडणुकीत जे पानिपत झालंय ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं नव्हे तर त्यांच्या माणसांचं झालंय. काही झालं तरी 44 आमदार त्यांनी स्वबळावर निवडून आणलेत. रणांगणात स्वतः उतरून दिशा देण्याची ताकद त्यांच्यात आहे, प्रश्न आहे तो त्यांच्या माणसांची पारख करण्याचा आणि माणसांवर विश्वास टाकण्याचा. आनंद दिघे यांनी स्वतःचे साम्राज्य स्थापन केले तरी बाळासाहेबांनी कधी ठाण्यात लुडबुड केली नाही. कारण त्यांनी काही केलं तरी फायदा संघटनेचा होतो, हे तत्व बाळासाहेबांनी बाळगलं. बाकी काही नाही तरी उद्धवनी तो कित्ता बाळगावा.

Monday, November 2, 2009

दहा मिनिटांत पत्रकार व्हा!

पत्रकार. हा एक सन्मानाचा शब्द आहे. आपल्याला माहिती देणाऱ्यांची जडणघडण करण्याऱ्या शाळा अस्तित्वात आहेत. कारण आपणा सर्वांना सातत्याने माहिती हवी आहे. बातम्या नसलेले जीवन म्हणजे प्रेम नसलेल्या जीवनासारखेच आहे...अगदी निराशाजनक प्रवासासारखेच. आपल्याला रिकामपणाचीही भीती वाटते आणि पत्रकाराचेही. तो आपल्यामधेच राहतो, अगदी आपल्या अवतीभवतीच असतो आणि आपण त्याने दिलेली माहिती वाचत असतो. कारण माहिती मिळविणे हा आपला हक्क आहे..

चांगला पत्रकार होण्यासाठी काही बाबी आवश्यक आहेत. काही सवयी अंगी बाळगाव्या लागतात. हे एक तंत्र आहे, परिणाम करण्याचे, भय निर्माण करण्याची कला आहे. हे तंत्र फार सोपे आहे. त्याचं म्हणजे, पहिली गोष्ट, कधीही, अगदी कधीही दुर्लक्ष करायचे नाही. कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे नाही. पत्रकाराला कोणत्याही बाबीकडे दुर्लक्ष करून चालत नाही, तो त्याच्या व्यवसायाचा अपमान आहे. त्यानंतर त्याने धक्कादायक, भावना उत्तेजित करण्याची कला अंगी बाळगली पाहिजे. प्रत्येक घडनेतून भय, सनसनाटी, असुरक्षिततेची भावना, सूड अशा भावनांना उठाव दिला पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे, त्याने आकड्यांची कसरत केली पाहिजे, त्यांना उठाव दिला पाहिजे. खऱ्या आकड्यांची पडताळणी करायला कोण येतंय? समजा आलाच एखादा तावातावाने, तर त्याला सांगायचं, की जिथून आकडेवारी घेतली ते सोर्स गोंधळलेले आहेत आणि ही आकडेवारी अंदाजाने दिलेली आहे. एवीतेवी, वर्तमानपत्रात आजचा विषय उद्या पहिल्या पानावर नसतो आणि आदल्या दिवशीची पहिल्या पानाची बातमी आज आतल्या पानात असते. त्यामुळे कोणाच्याही फारसे लक्षात राहते नाही. कारण शेवटी ती माहिती आहे आणि सतत बदलत असते. नेहमी प्राथमिक क्लृप्ती करावी. म्हणजे 50,000 जणांना फटका बसला असे न म्हणता अर्धा लाख लोकांना फटका असे म्हणावे. ते स्पष्टच जास्त भयावह वाटते. मी वर ते सांगितले आहे. हा कौशल्याचा प्रश्न नाही, हा तंत्राचा प्रश्न आहे. केवळ एक विमान पडले असे म्हणू नका... ते अगदीच निरस, सपाट विधान आहे. असं म्हणा, विमानाचा स्फोट झाला, ते विखरुन पडले किंवा ते कोसळले. माणसे मरत नाहीत, ते ठार होतात, मारले जातात, ........या पद्धतीने पाहिले तर पत्रकार आणि खाटिक यांचे काम एकसारखेच असते. ते विकायचे काम करतात आणि त्यातूनच जनतेचे पोषणही करतात. मात्र पत्रकार असण्याचे काही फायदे आहेत. तुम्ही योग्य त्या माणसांचे संरक्षण करता आणि दुसरे बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू अशा कसोटीच्या प्रसंगी तुम्हाला अधिक काम असते. लोकही तुमच्याकडे सल्ला किंवा माहिती मागण्यासाठी येतात. (त्यांनी ती नाही मागितली तरी तुम्ही ती देता हा भाग वेगळा.)

तिसरं, नेहमी बातमीत आकडेवीरी, सर्वेक्षणे किंवा टक्केवारी देत जा. कारण त्याचा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक प्रभाव पडतो. आपल्या अगदी लहान वयापासून आपण आकडेवारीवर जगत असतो. केवल वर्णनापेक्षा आकडेवारी केव्हाही उत्तम कारण लोकांना हवा तो अर्थ ते त्यातून काढू शकतात. बाकी काही सांगायची गरज राहत नाही. मात्र आकडे हे अगदीच गुळगुळीत, अगदीच अनघड असतात. आपल्याला हवे ते त्यांच्यामार्फत आपल्याला सांगावे लागते.

चौथी गोष्ट, माणसांना पकडा आणि रस काढण्यासाठी फळांना पिळावे तसे त्यांना पिळून काढा...दुःख, निराशा, आनंद या त्यांच्या भावना कोणताही अपराधभाव, कोणतीही खंत न बाळगता त्यांच्याकडून वदवून घ्या. त्याबद्दल उद्या नका बोलू. सगळे विषय एकात एक गुंफवा. त्यासाठी काही तर्क असलाच पाहिजे असे नाही. एखादा विनोद, एखादा किस्सा, खेळ किंवा युद्ध...मनात कोणतीही भावना बाळगू नका. एखाद्या डॉक्टरप्रमाणेच ती व्यावसायिकवृत्तीची एक सर्वमान्य खूण आहे. काही करू नका...कोणावर आरोप करू नका. ते सगळं इतरांवर सोडा आणि ते असलेच पाहिजेत असे नाही.

थोडक्यात सांगायचे म्हणजेः चांगला पत्रकार होण्यासाठी तुम्ही 1) लोकांना जाणवू न देता त्यांना धक्का द्यायला पाहिजे, 2) गोष्ट फुगवून सांगा, 3) खूप आकडेवारी द्या, ती तपासलेली नसली तरी चालेल, 4) पत्रकार असणे म्हणजे काहीतरी उपयोगी काम करत आहे, याव्यतिरिक्त मनात कोणतीही भावना ठेवू नका. तेव्हा मग तुम्ही सगळ्या जनतेसाठी एक सत्यशोधनाचे यंत्र, एक अपरिहार्य अशी वस्तू बनता.

---------------

Devenez journaliste en 10 minutes  या फ्रेंच ब्लॉगपोस्टचा लेखक दिस्मास यांच्या परवानगीने केलेला हा अनुवाद. सध्याच्या बहुतांश पत्रकारांची, त्यात मीही आहेच, वृत्ती आणि मजबूरी दिस्मास यांनी छान मांडली आहे. मला ते भावले.

Sunday, November 1, 2009

फोलपटराव, निर्माते-दिग्दर्शक

मुलाखतकारः नमस्कार, आज आपणblog भेटणार आहोत प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक फोलपटराव यांना. खरं तर प्रेक्षक आणि वाचक यांना फोलपटरावांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता भासू नये. झपाट्याने अस्तंगत होणारे टांगाचालक, पाठ्यपुस्तके विक्रेत्यांच्या हृदयद्रावक समस्या अशा विविध विषयांवर त्यांनी चित्रपट काढले आहेत. तर आज आपण त्यांना पहिला प्रश्न हाच विचारू या, की अशा वेगळ्या वाटांनी जाणारे चित्रपट काढण्यामागची त्यांची प्रेरणा काय आहे.

फोलपटरावः मी मुळात चित्रपट व्यवसायाकडे वळलो अपघाताने. बारावी झाल्यानंतर योगायोगाने मला खूप गुण मिळाले. त्यामुळे वैद्यकीय शाखेत प्रवेशही मिळाला. मात्र ते शिक्षण घेत असतानाच, डॉक्टर झालेल्या माणसाने कलेच्या प्रांतात जावे अशी एक साथच असल्याचे माझ्या लक्षात आले. मग वैद्यकीय अभ्यासापेक्षा याच विषयाचा मी अभ्यास करायला लागलो. त्याच तंद्रीत असताना एकदा माझ्या दुचाकीचा अपघात झाला. त्यावेळी दवाखान्यात दाखल असताना रात्रपाळीतील नर्सेसच्या हालअपेष्टा मी दिवसरात्र जागून पाहत होतो. त्याचा परिणाम म्हणून मला दवाखान्यातून पंधरा दिवसांऐवजी एका आठवड्यातच डिस्चार्ज देण्यात आला. याच अनुभवातून माझा पहिला चित्रपट सलाईन आणि ऑक्सिजनचा जन्म झाला.

प्रश्नः या चित्रपटाच्या अनुभवाचा मग पुढील कलाकृतीच्या वेळी तुम्हाला कसा फायदा झाला.

फोलपटरावः खूपच. म्हणजे हा माझा पहिला चित्रपट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने बनविण्यात आला होता. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक चित्रपटासाठी कोणाला कसे बनवायचे, यात मी एक्स्पर्ट झालो. शिवाय ओसाड फेस्टिव्हल, रान फेस्टिव्हल अशा महोत्सवांमध्ये त्याचे प्रदर्शन झाले. त्यामुळे करपरती आणि राज्य सरकारच्या अनुदानातून काहीही तयार केले तरी ते खपविता येते, हे मला कळाले. हा चित्रपट जेव्हा आपल्याकडे प्रदर्शित झाला तेव्हा मात्र मला काहीसा वेगळा अनुभव आला. काही प्रेक्षकांनी मला पत्र पाठवून या चित्रपटामुळे खूपच मनोरंजन होते, अशी तक्रार केली. त्यामुळे पुढील सगळ्या चित्रपटांमध्ये 10 टक्के मनोरंजन आणि 90 टक्के चर्चासत्र असायलाच हवा, यावर माझा कटाक्ष आहे. त्यामुळे लोकंही त्यांना प्रतिसाद देतात.

प्रश्नः तुमचा नवा जो चित्रपट आहे, काळा कोळसा सर्वकाळ, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे

फोलपटरावः आता हा जो चित्रपट आहे तो आहे कोळशाच्या नामशेष होत चाललेल्या वखारींच्या संदर्भात. सुमारे दीड दोन शतके अनेक घरांत ज्यांनी चूल पेटविली, त्या कोळशांच्या वखारींना एक सांस्कृतिक महत्व आहे. कोळशाच्या काळ्या रंगातून अनेक जीवनांमध्ये रंग भरले. कित्येक मोठ्या व्यक्ती पूर्वी स्वतः जाऊन कोळसे विकत घेत. मात्र आज गॅस आणि ओव्हनच्या काळात ही संस्था काळाच्या पडद्याआड जात आहे. त्यामुळे त्यावर एक चित्रपट तयार करावा, असे मी ठरविले. सुदैवाने केंद्र सरकारच्या ऊर्जा बचत ब्युरोच्या अधिकाऱ्यांनाही ही कल्पना पटली. त्यामुळे त्यांनीही लगेच चित्रपटासाठी अनुदान मंजूर केले. कोळशाची वखार चालविणाऱ्या एका घराण्यातील तीन पिढ्यांची ही कथा आहे.

प्रश्नः ही कल्पना तुम्हाला कशी सुचली

फोलपटरावः काय झालं, की माझ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिग्नलमन या चित्रपटाच्या एका शोला मी गेलो होतो. आता माझ्या बहुतेक चित्रपटांमध्ये सिल्हौट पद्धतीने चित्रीकरण केलेले असल्याने अंधाराला मुख्य स्थान असते, हे तुम्हाला माहित आहे. तर त्या शोला पडद्यावर बराच वेळ अंधार असल्याने एका प्रेक्षकाने, कदाचित खेड्यातला असावा तो, अस्वस्थ होऊन काडी पेटविली. त्यावेळी मला वाटले, की या काडीमुळे मल्टिप्लेक्सच्या खुर्च्यांनी पेट घेतला तर...अन् यातूनच काळा कोळसा सर्वकाळचा जन्म झाला. अर्थात् नेहमीच्या पद्धतीने यात मी मुख्य कथेऐवजी पात्रांचे रडके चेहरे, भक्क अंधार आणि दीनवाणे संगीत यांनाच जास्त महत्व दिले आहे.

प्रश्नः चित्रपटसृष्टीत एक दशक घालविल्यानंतर आणि एवढे चित्रपट काढल्यानंतरही तुम्हाला एकही पारितोषिक मिळालेले नाही, याची खंत वाटते का

फोलपटरावः बिल्कुल नाही. पारितोषिकांच्या स्पर्धेवर माझा कधीही विश्वास नव्हता आणि आजही नाही. कारण मला पारितोषिक मिळणार नाही, याची मला खात्री आहे. माझ्या दृष्टीने थिएटर किंवा मल्टिप्लेक्सला चांगल्या मूडमध्ये आलेला प्रेक्षक अस्वस्थ होऊन गेला पाहिजे, हीच मोठी गोष्ट आहे. नांगरलेली नांगी या चित्रपटाच्या वेळची गोष्ट आहे. चित्रपटाचा मुख्य नायक, एक पाप्याचे पितर असलेला शेतकरी, अत्यंत दयनीय, केविलवाण्या परिस्थितीत शेतात माजलेले तण उपटून काढत असतो, असे एक दृश्य त्या चित्रपटात आहे. ते दृश्य पाहून अनेक प्रेक्षक स्वतःचे केस उपटायला सुरवात करत असत, हे मी माझे सर्वात मोठे पारितोषिक समजतो.

प्रश्नः फोलपटरावजी, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगू इच्छिता

फोलपटरावः माझे एकच सांगणे आहे. लक्षात ठेवा, आपण समाजाचे काही देणं लागतो. त्यामुळे काहीही समस्याग्रस्त दिसलं की ते समाजाला देऊन टाका. आपण समस्येची उत्तरं द्यावीच, असं नाही. त्यामुळे जी काही मिळेल ती समस्या शोधा आणि त्या सगळ्यांना. सुदैवाने सध्या मराठी चित्रपटांत अनेक वेगळे प्रयोग होत आहेत. त्यात नजरबंदीचा हाही प्रयोग सर्वांनी करावा, असे मला वाटते.

Sunday, October 18, 2009

अभ्यासक्रमः त्यांचा आणि आपले

Untitledनास्तिक मताचे आधुनिक अध्वर्यू असलेल्या करुणानिधी, रामस्वामी पेरियार आदींच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम चेन्नई विद्यापीठ तयार करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात तेथे एम. ए. (करुणानिधी) असे  द्वीपदवीधर होऊ घालतील. नास्तिक मतांचाच अभ्यासक्रम त्याला कोणाही पुरोगाम्याचा विरोध होणार नाही, ही काळ्या फळ्यावरची रेघ आहे. बाकी, ईश्वरावर श्रद्धा नसलेल्याला नास्तिक म्हणून त्याची शिकवण इतरांना देणार. पण ज्याची शिक्षणावर श्रद्धा नाही, अशा माझ्यासारख्या नतद्रष्टांचे काय करणार, हे आजपर्यंत ही शिक्षणव्यवस्था ठरवू शकलेली नाही. कांचीच्या शंकराचार्यांच्या मठापुढे एक मशीद आधी होतीच. तिच्याही पुढे पेरियारचा पुतळा उभारून अपशकुन करणाऱ्या करुणानिधींना त्यांची ती प्रसिद्ध हिरवी शाल लाभाची आहे म्हणे. शिवाय प्रत्येक निवडणुकीच्या आधी ज्योतिषाचा सल्ला आहेच. आता अशा व्यक्तिंच्या जीवनचरित्रातून एखाद्याला तत्वज्ञानाचा कोळ काढता येईलही.  त्यातून कोणाच्या पोटापाण्याचा प्रश्न निकालात निघत असेल, तर आपण त्यात खोडे घालणे चांगले नाही, असे मला वाटते. उलट माझं तर म्हणणं आहे, की मद्रास विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यापीठांनीही अशी, हयात असलेल्या आणि अविचारात हयात घालविलेल्या नेत्यांवर अभ्यासक्रमाची गिरणी काढावी. त्यामुळे राजकारणात येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांना रसप्रद वाटेल, असं काहीतरी शिकता येईल. शिवाय राजकारणाचा दांडगा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकांनाही तो शिकविताना फारशी अडचण येणार नाही. समजा, महाराष्ट्रात असे अभ्यासक्रम आणले, तर ते कसे रचता येतील,  याची ही चुणूक.

एम. ए. (शरद पवार)

यात साखर कारखाने, शेती, उद्योग, नातेवाईकबाजी यात स्पेशलायझेशन असेल. साखर कारखाने हा विषय घेणाऱ्यांना केवळ साखर हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळे कसे आणायचे, याचीही उजळणी करावी लागेल. प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर रोखठोक, सरळ आणि मुद्देसूद दिल्यास शून्य गुण मिळतील. प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा असला तरी त्यात काही ना काही आकडेवारी असायलाच हवी. काहीच नाही मिळाली, तर ‘सध्या देशात दीड लाख विद्यार्थी एम. ए. करत असून त्यांपैकी केवळ 9 टक्के शरद पवार या विषयात एम. ए. करत आहेत,’ असं वाक्य टाकलं तरी हरकत नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए साठी थेट प्रवेश मिळण्याची संधी द्यायला हरकत नाही. त्यातही जमिनींचे संपादन आणि व्यवस्थापन या विषयात स्पेशलायझेशन करायला वाव (आणि वावरही) आहे. शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास राज्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये ‘शेतकऱ्यांसाठी शेतीव्यतिरिक्त उपजीविकेचे पर्याय’ या विषयावर अतिथी  प्राध्यापक म्हणून रोजगाराचीही संधी मिळेल. एक आहे, की या विद्यार्थ्यांना एम ए मिळविण्यापेक्षा एमएलए मिळविण्यात अधिक रस असण्याचा संभव आहे.

मात्र एम ए शरद पवार करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 मार्कांची प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागेल. यात माध्यमे आणि पत्रकारांना हाताळायचे प्रात्यक्षिक असणार आहे. विविध जातींचे म्होरके सोबत बाळगूनही पुरोगामी नेते कसे म्हणवून घ्यावे, आपल्याला हवी तशी चर्चा इतरांकडून कशी करवून घ्यावी या बाबींचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवावे लागेल. याशिवाय, वेळवखत पाहून अचानक एखाद दिवशी या विद्यार्थ्यांना अन्य शाखेत सामावून घेतले जाणारच नाही, असे नाही. त्यामुळे प्रवेश घेतला एका कोर्सला आणि प्रमाणपत्र मिळाले दुसरेच, अशी शक्यता या विद्यार्थ्यांना फार.

एम. ए. (शिवसेनाप्रमुख)

ही परिक्षा लेखी कमी आणि तोंडी जास्त आहे. लेखी परीक्षा या अभ्यासक्रमात केवळ तोंडी लावण्यापुरतीच आहे. एकच वाक्य अनेकदा सांगायचे, इतरांना किरकोळीत काढायचे ही या अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये आहेत. या अभ्यासक्रमात प्रवेश घेताना दिलेले विषय आणि अभ्यासक्रम पूर्ण करताना असणारे विषय एकच असतील याचा काही नेम नाही. इतकेच काय, त्यांचा परस्परांशी संबंध असेलच, असेही नाही. मात्र परीक्षकांना आणि प्राध्यापकांनाही भुरळ घालण्याएवढी तुमची वक्तृत्वकला चांगली असलीच पाहिजे, नसता या वाटेला जाण्याचा विचारही करू नका. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगला रोजगार मिळेलच, याची काही खात्री नाही. काहीजणांना खूप रोजगार मिळेलही, मात्र तो कधी हिरावून घेण्यात येईल, याची त्यांना हमी नसते. या अभ्यासक्रमाचा सर्वात मोठा धोका म्हणजे हा अभ्यासक्रम केल्यानंतर याच शाखेत करिअर करावे लागते. नसता त्या माणसाचे प्रमाणपत्र परत घेण्यात येते. त्यामुळे हा अभ्यासक्रम केलेला माणूस एकतर ‘सर्टिफाईड’ असतो नाहीतर ‘सटरफटरफाईड’ असतो.

एक विशेष सांगायला हवा, की या अभ्यासक्रमात शिकविले एक आणि परीक्षेत आले भलतेच, फीस सांगितली एक आणि वसुली केली काहीच्या काही असं कदापि शक्य नाही. अभ्यासक्रमात जे घटक नेमून दिलेत, त्याबाहेरचा शब्द सुद्धा उच्चारण्याची कोणाची काय बिशाद…अगदी सरांचीही नाही. शिवाय सगळ्या अभ्यासक्रमाची अशी एक सॉलिड शब्दावली आहे. भल्या-भल्यांना ती शब्दावली पाठ करावीच लागते.

हा अभ्यासक्रम केलेला माणूस वडा-पावचा तज्ज्ञ मानण्यात येतो. त्यामुळे काही कालावधीत त्याने अंगातील प्रतिभेची चुणूक दाखविली, की त्याची वडा-ताण सुरू होते. अन्य कंपन्यांमध्ये त्याला सन्मानाने बोलाविण्यात येते . या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याला काही ठराविक कालावधी नाही. केवळ निष्ठेने अभ्यास करत राहायचा. अचानक एखादे दिवशी तुम्ही पास झाल्याचे कळविण्यात येते. शिवाय तुम्ही पास झालात तर अचानक पी. एचडी.च्या मानकऱ्यासारखे वागविले जाता आणि तुमचा योग नाही आला, तर झिलकऱ्यांच्या बरोबर तुम्हाला वागविण्यात येते. दरबारी राजकारण ज्यांना जमते त्यांच्यासाठी हा अगदी रामबाण अभ्यासक्रम आहे. अलिकडे त्यात दर आणि बारी, दोन्हींचे प्रस्थ जास्त झाल्याच्या तक्रारी असल्या, तरी या अभ्यासक्रमाने गेली अनेक वर्षे राजदरबारी आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे.

एम. ए. (कॉंग्रेस)

या अभ्यासक्रमाला कोणाही विशिष्ठ व्यक्तीचे नाव नाही. कारण आधी त्याला गांधी हे नाव द्यायचे घाटत होते मात्र  नंतर या नावामुळे लोकांची दिशाभूल होईल, त्यांच्या मनात फारसे आकर्षण राहणार नाही या कारणामुळे ते रद्द करण्यात आले. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे याला स्थळ, काळ आणि परिस्थिती, या कशाचेही बंधन नाही. या अभ्यासक्रमासाठी तुम्ही नावही दाखल करण्याची गरज नाही. साखर कारखाना, सहकारी बँक, शिक्षण संस्था, पोलिस स्टेशन, कारागृह…अशी कोणत्याही ठिकाणी हा अभ्यासक्रम पुरा करता येतो. एक विद्यापीठ बदलून दुसऱ्या विद्यापीठात जाऊनही तो पुरा करता येतो. मात्र या अभ्यासक्रमात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी केंद्रीय परीक्षकांच्या मर्जीस उतरावेच लागले. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या जीवन-मरणाचा निर्णय केंद्रीय परीक्षकांच्या भुवयांच्या हलचालींवर अवलंबून असतो. ते जर खुश झाले तर मात्र या विद्यार्थ्यांचे आकाशातला बापही वाकडे करू शकत नाही. मात्र खुशामदीच्या या प्रॅक्टिकलमुळे या विद्यार्थ्यांना कधी आयचा तर कधी पोराचा आधार घ्यावा लागतो.

या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे येते क्लासमेटस्, म्हणजे वर्गमित्र नावाचा प्रकार नसतो. एखादा मित्र मिळाला तरी तो मित्रच राहिल, याचीही खात्री नसते. त्यामुळे हा अभ्यासक्रम शक्यतोवर वंशपरंपरागत पद्धतीनेच घेतला जाईल. नाही म्हणायला, अन्य अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीवाचून मागास राहिलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे सामावून घेण्याची एक उदात्त परंपरा या अभ्यासक्रमात आहे. या शाखेचा विद्यार्थी कधीही उपाशी मरणार नाही, कारण आपण जे शिकलो ते प्राचीन काळापासून कसं चालत आलेलं आहे, हे पटवून देण्यात त्यांच्या हातखंडा असतो. शिवाय आपण जे करत आहोत, ते जगात पहिल्यांदाच करत आहोत, असाही ते दावा करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला वश करून घेण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. अगदीच काही अडलं तर गांधींचा वापर ते करतात. गांधी हे सर्वात सशक्त चलन आहे हे त्यांना माहित असते गांधीजी असलेले चलनच कोणतेही संकट दूर करू शकते, हे साधं बहुमत या विद्यार्थ्यांना अवगत असते. दहा पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत हा अभ्यासक्रम आला असता, तर विद्यार्थ्यांना गणवेश घालावा लागला असता. मात्र आता ती गरज राहिलेली नाही.

एम. ए. (मुंढे-गडकरी)

हा नावावरून जोड अभ्यासक्रम वाटू शकतो. मात्र तो तसा नसून दोनपैकी एक या प्रकारचा आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडण्याऐवजी एक निवडला की तो दुसऱ्यातून तो बाद असा हा प्रकार आहे. जुन्या पद्धतीच्या वार लावून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केल्याप्रमाणे त्याची रचना आहे. फरक एवढाच की हा अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना खरोखरच वार लावून शिकावे लागते. त्यापेक्षाही त्यांना वार झेलणे आणि ते चुकविणे, याचीही तालीम घ्यावी लागते. शिकलेले घटक आणि परीक्षेतील प्रश्न यांच्यात काही ताळमेळ असेलच असे नाही, त्यामुळे हा सर्वात कठीण अभ्यासक्रम आहे. शिवाय परीक्षा पास झाली तरी रोजगार मुख्यत्वे उत्तर भारतात मिळणार. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना स्पर्धा आहे ती चाटे कोचिंग क्लासेससारख्या वर्गांची. त्यामुळे आजपर्यंत तरी या विद्यार्थ्यांना राज्यात मिळालेले यश हे चिंतनाजनकच आहे. त्याहून अधिक नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत महाजन नावाचा घटक या वि्द्यार्थ्यांसाठी फायदेशीर होता. त्यातून त्यांच्या मार्कांची बेगमी व्हायची. मात्र आता तो घटकच नाहीसा झाला असल्याने यांची स्थिती गमगीन झाली आहे.

या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चाळीस मार्कांचे प्रात्यक्षिक आहे आव्हान द्यायचे. सतत कोणाला न कोणाला, कशावरून तरी, काही का कारणाने आव्हाने द्यायची. हातात काही कागदपत्रे आणि आवाजात धार, ही या प्रात्यक्षिकांत दिसलीच पाहिजेत. जीटी मारली तरी चालेल. पण पाहिजे म्हणजे पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याने प्रात्यक्षिकांच्या वेळी थेट प्राध्यापकांनाच आव्हान दिले, तर ती अतिरिक्त योग्यता मानली जाईल. शिवाय अभ्यासक्रमाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना एम ए असले तरी ‘कमल, कमळ बघ’ इथूनच सुरवात करावी लागते. त्यासाठी प्रबोधिनीची आगळीवेगळी व्यवस्था आहे.

तर हे झाले मुख्य अभ्यासक्रम. सुरवातीस एवढे पुरे. तमिळनाडूत एक तर महाराष्ट्रात चार. आहे का नाही आपण पुढे. या अभ्यासक्रमांचे यशापयश पाहून नंतर मग रिपब्लिकन, राजू शेट्टी असे क्रॅश कोर्सही काढू. हाय काय अन् नाय काय!

Thursday, October 15, 2009

तर मग त्यांना दत्तक घ्यायला सांगा...

"राणेशाहीचे प्रमाण असं कुठे जास्त होते. अगदी दीडशेपैकी शंभर जागा नेत्यांच्या वारसांनी लढविल्या आहेत, असे झाले आहे का? मग या मुद्द्याचा एवढा का बाऊ करण्यात येत आहे," हा प्रश्न नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी विचारला. घराणेशाहीचा आरोप या नेत्यांनी त्या पद्धतीने उडवून लावला, ते पाहून जुनी सरंजामदारी व्यवस्था काय वाईट होती, असे वाटून गेल्यास नवल नाही.

या नेत्यांना आपल्याकडे धडा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र त्या तिकडे फ्रांसमध्ये असेच एक नाटक चालू आहे. ते आपल्याकडच्या राजकीय लोकांसाठी उद्बोधक ठरू शकते. या नाटकातील प्रमुख पत्रे आहेत, निकोला आणि जॉन सार्कोझी ही पिता पुत्राची जोडी. जॉन या केवळ २७ वर्षांच्या तरुणाला 'एपाद' या संस्थेच्या प्रमुखपदी नेमण्यावरून नाटकाचा पहिला अंक सुरू झाला. त्याचा तिसरा अंक आता सुरू झाला आहे तो आता विरोधी सोशलिस्ट पार्टीच्या आन्दोलनाने. या पक्ष्याच्या युवा आघाडीचे चार कार्यकर्ते अध्यक्ष्यांच्या प्रासादावर पोचले आणि आपल्याला दत्तक घ्यावे अशी मागणी केली. ही मागणी अर्थातच मान्य होण्यासारखी नव्हती आणि अधिकाऱ्यांनी या तरुणांना हाकलून दिले. पण हे प्रकरण इथेच थांबणारे नाही. सोशालीस्त पक्षाने तरुणांना आवाहन केले आहे, की अध्यक्षांनी आपल्याला दत्तक घ्यावे अशी तरुणांनी मागणी करावी. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळावर दत्तकाचा फोर्मही उपलब्ध करून दिला आहे. तरुणांचे भले व्हायचे असेल तर त्यांनी अध्यक्षाचे मुले व्हायला हवे, हा त्यातला संदेश!

ही बातमी मला का महत्वाची वाटली? एक, त्यात विरोधी पक्ष आणि जनतेची सक्रियता, एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याची तयारी दिसून येते. आपल्याकडे पायलीला पन्नास गोतावाळेखोर उभे टाकले तरी मीठ मसाला लावून त्याची चर्चाच करणारेच जास्त! त्याविरोधात आवाज काढणारे कमीच. सुनील देशमुखांचा काय तो अपवाद. त्यांच्या एका बंडखोरीमुळे त्यांची आधीची पापे धुतली जातील.

दुसरे महत्वाचे, ही बातमी दिली आहे फ्रांस रेडीओ इंटरनेशनल या सरकारी माध्यमाने. तुम्हाला काय वाटते, आपल्याकडे असे घडण्यासाठी आणखी किती दशके लागतील?

Wednesday, October 7, 2009

फोलपटरावांच्या मुलाखती

फोलपटराव राजकारणी भाग 2

प्रश्नः सध्याच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात
फोलपटरावः याबाबत मी अजून काही ठरविले नाही. ठरवू या. कसे आहे, काही झाले तरी आम्ही निवडणुकीच्या वेळेस प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबतच असतो. प्रॉब्लेम निवडणुकीनंतर येतो. आम्ही मुंबईत अडकून अडतो आणि कार्यकर्त्यांना वाटते, की साहेब आपल्याकडे लक्षच देत नाही. आता लोकं आम्हाला लक्षानुलक्ष देत असताना गावाकडे कसे जाणार?

प्रश्नः नाही, आम्ही पक्षाच्या बाजूने या अर्थाने विचारतोय.
फोलपटरावः तसे नाही. आता एवढे पक्ष बदलल्यानंतर मला कुठल्या पक्षाचे कौतुक वाटणार. आताच नवीन निघालेल्या एका तिसऱ्या अडगळीतील चौथ्या आघाडीत मी सामिल झालो. त्याची एक वेगळीच गंमत आहे. त्यांच्या नेत्याने मला विचारले, "फोलपटराव, या पक्षात किती दिवस राहणार" मी उत्तर दिले,"पक्ष पंधरवडा" (परत तेच हासणे.)त्यामुळे सध्यातरी कुंपणावर बसायचे आणि निवडणुकीनंतर शेत खायचे, म्हणजे कोणाला पाठिंबा द्यायचे ते ठरविणार असा विचार आहे.

प्रश्नः या निवडणुकीसाठी तुमचा काही अजेंडा, धोरण आहे का?
फोलपटरावः आमच्यासारखे जे ग्रासरुटचे कार्यकर्ते असतेत, त्यांच्याकडे धोरण नसतं. असतो तो बेत. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने निवडणुका जिंकायच्या, कोणता घोडा विनच्या जवळ आहे तो निवडायचा आणि त्याच्या नावाने तिकिट घेऊन जॅकपॉटची सोय करायची, हा आमचा बेत आहे.

प्रश्नः म्हणजे तुम्ही घोडेबाजाराचे बोलताय...
फोलपटरावः अहो, कसले घोडे आणि कसले काय. हा सगळा शिरगणतीचा प्रताप आहे. निवडणुकांमध्ये लोकांनी गाढवं निवडून द्यायची आणि तुम्हा पत्रकारांनी त्याला घोडेबाजार म्हणायचं, कशाला ही प्रथा पाडता. लोकांच्या फायद्यासाठी आली चार डोकी एकत्र आणि केलं पाच वर्षे तुमचं मनोरंजन, त्याला तुम्ही काय टॅक्स लावणार का. त्यामुळं आम्ही घोडेबाजाराचं बोलत नाही, आम्ही बोलतो प्रॅक्टिकलचं. आता तुम्ही घोडेबाजाराचं बोलताय. घोडं मेलं ओझ्याने शिंगरु मेलं येरझाऱ्यानं तुम्ही ऐकलं असंलच. तर आमचं घोडं न मरता निवडणुकीचं ओझं वाहतंय आणि राजकीय पक्षांचं शिंगरू बंडखोरीच्या, आचारसंहितेच्या येरझाऱ्यानं मरतंय. आता त्यातून या पक्षांचा निकाल लागलाच वाईट, तर आमच्यासारख्या घोड्यांनीच खांदा द्यायला पाहिजेय ना.

प्रश्नः फोलपटरावजी, तुमच्या या यशाचे रहस्य काय?
फोलपटरावजीः सक्रियता. मी नेहमी कार्यरत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तयार असतो. काही वेळेस, समस्या कमी पडू लागल्या तर केवळ सोडविण्यासाठी म्हणून मी नव्या समस्या निर्माण करतो. अखेरचा श्वास असेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आतासुद्धा तुमच्याशी मी बोलत असताना, यातले कोणते वाक्य मी बोललोच नाही असा खुलासा उद्या करायचा, याचा विचार मी करत आहे. मुलाखत संपली की त्याची तयारी झालीच म्हणून समजा.

प्रश्नः सध्या राज्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे असं तुम्हाला वाटतं?
फोलपटरावः कायदा आणि सुव्यवस्था. अहो, या राज्यात कोणाला काही धरबंदच राहिलेला नाही. कोणीही येतं आमच्या फॅक्टरीला आग लावतं, अमुक येतो गाडीवर दगडफेक करतो. अरे, कायदा हातात कशाला घेता. तो जागच्या जागी राहू द्या ना. कशाला वापरायला लावता. परवा आमच्या गावात आमच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार झाला. सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी कार्यकर्त्यांना गोळ्या घातल्या, सरकारच्या आदेशाची पोलिसांनी योग्य अंमलबजावणी केली, हे कदाचित खरे असेल. मात्र त्यावेळी ते कशाच्या अंमलाखाली होते, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. परिस्थिती इतकी वाईट आहे, का परवा मी एका सभेत म्हणालो, सरकारने आता आठवड्यातील सातही वारांना जोडून एक गोळीवारही जाहीर करावा. यादिवशी राज्यात सगळीकडे गोळीबार करता येईल. बाकीच सहा दिवसतरी बरे जातील ना लोकांचे.

प्रश्नः फोलपटरावजी, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगू इच्छिता?
फोलपटरावः राजकारणाचे क्षेत्र वाईट असं कोणी कितीही बोललं तरी लक्ष देऊ नका. कोटी गमावून बसताल. राजकारणात तरुण रक्ताला खूप वाव आहे. मी तर म्हणेन, तरूणांच्या रक्तावरच राजकारण चालतंय. शक्य असेल तोवर एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातल्या माणसाच्या वळचणीला जा. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर जनतेवर छाप पडायला हवी. त्यासाठी खूप पिक्चर पाहा. पिक्चरमधल्या अॅक्टरपेक्षा असा भारी अभिनय करा, की नाटकी अभिनय शिकण्यासाठी त्याने तुमच्या सभांना आलं पाहिजे. शक्यतोवर अभिनेत्रीशी चांगले (आणि नैतिकही) संबंध ठेवा. ज्या काय चळवळी, आंदोलने करायची असतील ती कोणतेही पद किंवा सत्ता मिळविण्यापूर्वीच करा. कारण कोणताही राजकारणी फक्त खुर्ची मिळेपर्यंत जंगम मालमत्ता असतो. त्यानंतर तो स्थावर मालमत्ता होतो. तुमच्या मागे असलेले लोक तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेत का तुमचा पाठलाग करायला आलेत, त्याची एकदा खात्री करा. एक लक्षात घ्या, सगळ्या नेत्य़ांना राज्यापुढच्या, मागच्यापुढच्या सगळ्याच, समस्यांची जाणीव असते. त्याची उत्तरे मात्र कोणाकडेच नसतात.

Tuesday, October 6, 2009

फोलपटांच्या मुलाखती

फोलपटराव, राजकीय नेते
भाग १
मुलाखतकारः नमस्कार, आज आपण भेटणार आहोत आपले लाडावलेले, माफ करा लाडके नेते फोलपटराव यांना. विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून फोलपटराव यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यामुळेच दर निवडणुकीच्या वेळी जनताही निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भरीस घालते. यंदाच्याही विवडणुकीत ते मतदारांच्या नशिबाची परीक्षा पाहणार असल्याने आपले नशिब आजमावून पाहणार आहेत. तर या आपण त्यांच्याशी संवाद साधू या.तर फोलपटरावजी, आतापर्यंतच्या वीस वर्षांच्या काळात आपण अठरा पक्ष बदलले आणि स्वतःचे दोन पक्ष काढून विसर्जितही केले. यामागचे इंगित काय?
फोलपटरावः त्याचं असं आहे...जनतेचं कल्याण व्हायचे असेल तर राज्यात स्थिर सरकार पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे दहा पक्ष तर आम्ही स्थिर सरकार याच मुद्द्यासाठी बदलले. गेल्या दहा वर्षांत तर आमची ख्यातीच अशी झाली आहे, की ज्याला आपले गव्हर्नमेंट टिकवायचे असेल, त्याला आमची मदतच घ्यावी लागते. आमची इस्त्री बसल्याशिवाय राज्याची घडीच बसत नाही म्हणा ना. दोन पक्ष आम्ही धर्मनिरपेक्षतेसाठी बदलले. जातीय शक्तींना आमच्यामुळे मदत होऊ नये, यासाठी सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी जुळवून घेण्याचे आमचे आधीपासून धोरण आहे. आता त्यात गफलत काय होते, का आम्ही एखाद्या पक्षात गेल्यानंतर तिथे जातीयवाद सुरू झाल्याचे आमच्या लक्षात येते. एक उदाहरण देतो. आम्ही सत्ताधारी पक्षात असताना आमच्या मतदारसंघात दंगल झाली. त्यावेळी आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो, की दंगल लवकर आटोक्यात आणा. दोषी कोण आहे, याची तपासणी करायची गरज नाही. तर गृहमंत्र्यांचे उत्तर होते, आम्हाला माहित आहे या दंगलीत कोण जातीने लक्ष घालत आहे. मग मी सत्ताधारी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. शिवाय माझ्या पक्ष बदलण्याने जनतेला किती फायदा होतो,पहा ना. दरवेळी त्यांना कोरी पाटी असलेला प्रतिनिधी मिळतो. पाट्या टाकणाऱ्या प्रतिनिधीपेक्षा कोरी पाटी असणारा प्रतिनिधी केव्हाही चांगलाच ना (आपल्या विनोदावर स्वतःच हसतात.)
आणखी एक कारण आहे। आपल्या नागरिकांनी, आमच्या अनुयायांनी सर्व प्रकारच्या अनुभवांना, नवीन विचारांना सामोरे जावे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठीही मला असे राजकारणातले आडवळणं घ्यावे लागले.

प्रश्नः परंतु हे सर्व पक्षांतर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी केले, असे लोक म्हणतात...
फोलपटरावः लोक म्हणजे कोण हो? विरोधक! त्यांच्या म्हणण्याला कोण भीक घालतो. समोरच्या उमेदवाराच्या पाठीमागे असं काही बाही बोलण्याची रीतच असते राजकारणात. आता आम्ही काय आमच्या विरोधकांवर कमी आरोप केले. काय झालं त्याचं। तसंच असते ते. राहता राहिला प्रश्न आमच्या फायद्याचा॥ आता असं बघा, आमचा फायदा हा समाजाचा फायदा असतो. दिल्लीतून निघालेला एक रुपया गल्लीपर्यंत पोचेपर्यंत तेरा पैसे होतो, असं राजीव गांधी म्हणायचे. आता आमच्यापर्यंत रुपयाच नाही आला तर खालच्यांना तेरा पैसे तरी मिळतील का तुम्हीच विचार करा. शेवटी आम्हाला थोडेच पैसे खावेसे वाटतात. पण लोकांचे पोट भरण्यासाठी आम्हाला तेही करावे लागते. पापी पेट का सवाल है ना!

प्रश्नः मात्र अलिकडे राज्यातील जमीनींच्या विक्रीत तसेच प्रकल्पांसाठी जमिनी घेण्याच्या बाबतीत तुमचे नाव अनेक वादांमध्ये सापडले...
फोलपटरावः थांबा थांबा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. परवा दिल्लीत मला बिहारचे एक खासदार भेटले. त्यांना मी विचारले, तुम्ही आमच्या राज्यात एवढ्या जमिनी का विकत घेत आहात. त्यांनी मला सांगितले, तुमच्याच राज्यात नाही तर मी सगळ्या भारतात जमिनी घेत आहे. कारण मला राष्ट्रीय नेता व्हायचे आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती सत्ता हे शिवाजी राजांच्या काळी ठीक होतं हो. आता सत्तेच्या किल्ल्या जमिनी ज्याच्याकडे असतात त्यांच्या हाती असते. काय आहे, विकास करायचे म्हणजे सोयीसुविधा, जागा पाहिजे. त्या ताबडतोब मिळायच्या झाल्या तर आपल्या हाती काही तरी पाहिजे ना. यासंबंधात काही वाद व्हावे, असे मला वाटत नाही. शिवाय आपला वेव्हार एकदम स्वच्छ आहे. सगळ्या जमिनी सरकारी भावाने घेतल्या आहेत, तर लोकं काय म्हणणार का सगळ्या जमिनी माझ्या भावाने घेतल्या आहेत. सगळा शब्दांचा खेळ आहे हो सारा.

Tuesday, September 29, 2009


Friday, September 18, 2009


आपले मोदक त्यांचे झिआओ लोंग बाओ

णेशोत्सव नुकताच झालेला आहे. आपल्या सर्वांनी मोदक खाल्लेलाच असेल/असतील. या मोदकांमध्ये मांस, तेही डुकराचे मामांस घालण्याची कल्पना किती किळसवाणी वाटते नाही? मात्र ही कल्पना चीन मध्ये प्रत्यक्षात आली आहे. (आणखी दुसरे कोण असणार?)
आता सहज चायना रेडीओ इंटर नेशनल चालत होतो. तिथे मला हा पदार्थ 'गावला'. शांघाय स्नाक्स या नावाजवळ चित्र दिसले तर मनात विचार आला, अरे हा तर आपला मोदक. थोडी माहिती घेतली तर उडालोच. या मोदकात, ज्याचे नाव या संकेतस्थळावर वरील प्रमाणे दिले आहे त्यात हैम, डुकराचे मांस वगैरे जिन्नस घालतात अशी माहिती तिथे दिली आहे. शिवाय इथेच असेही म्हटले आहे, की नानझीआंग या प्रांतात हा पदार्थ १०० वर्षांपासून बनविला जात आहे. याचा अर्थ हा पदार्थ भारतातूनच तिकडे गेला. शिवाय वरचे आवरणही पिठापासून बनवितात. म्हणजे तर शंकेला जागाच नको. मी चीनला गेलेलो नाही किंवा हा पदार्थही खाल्लेला नाही. मात्र मी मोदक भरपूर खाल्लेले आहेत आणि त्यावरून हा मोदकाचाच प्रकार आहे हे ठामपणे सांगू शकतो. त्यात मांस कोंबण्याची कल्पकता दाखविणाऱ्या चीनी लोकांबद्दल काय बोलावे? त्यामुळेच असावे, इंडोनेशिया किंवा थायलंडमध्ये गणपतीच्या मूर्ती आढळत असल्यातरी चीनमध्ये आढळत नाहीत.

Tuesday, June 16, 2009

भ्रष्टराज 'गुरू'!

बरोबर वीस वर्षांपूर्वी मी राजगुरूनगरला (ज्याला स्थानिक लोकं अजूनही आवर्जून खेड म्हणतात) गेलो होतो. त्यावेळी मी एक साधा विद्यार्थी होतो आणि एनसीसीच्या शिबिरासाठी तिथे पोचलेल्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांपैकी एक होतो. नोव्हेंबर 2 ते 12, 1989 या दहा दिवसांमध्ये एके दिवशी आम्हाला हुतात्मा राजगुरू यांचा वाडा बघण्यास नेले होते. त्यावेळी येथेच या वाड्याच्या नावावर स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांची बातमी द्यावी लागेल, हे मला कुठे माहित होते. पण तसे झाले खरे. शिवराम हरी राजगुरू यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या घरातील वस्तू लोकांनी कशा पळविल्या हे 1989 साली ऐकायला मिळाले. तर राजगुरु स्मारकाच्या नावावर 70 लाख रुपये पळविण्याचा कसा डाव रचण्यात आला, हे 2009 साली ऐकायला मिळाले.

Rajguru Wada
हुतात्मा सिवराम हरी यांची गेल्या वर्षी जन्मशताब्दी साजरी झाली. त्याआधी सुमारे 12 वर्षांच्या खटपटीनंतर राज्य सरकारने राजगुरू यांचा जुना वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. या वाड्याच्या दुरुस्ती आणि नवीनीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निदी मंजूर झाला होता. त्याअंतर्गत शिवराम हरी यांची जन्मखोली, देवघर आणि नदीकाठची भिंत यांचे बांधकाम करण्याची मूळ योजना होती. हे काम 24 ऑगस्ट 2008 (शिवराम हरींच्या जन्मशताब्दी समापनापर्यंत) पूर्ण व्हायचे होते. प्रत्यक्षात पुरातत्व खाते आणि त्यांच्या ठेकेदारांनी धडाधड जुन्या इमारती पाडून टाकल्या. त्याजागी नव्या इमारती मनमानी पद्धतीने उभारण्यास सुरवात झाली. स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर ते निकृष्ट बांधकाम पाडण्यात आले. नंतर जन्मशताब्दीच्या निमित्ताने घाईघाईने जन्मखोली बांधण्यात आली. एवढे सगळे घडल्यानंतर तिथे सगळे काम अर्धवट टाकण्यात आले. गेले वर्षभर हा वाडा ओबडधोबड अवस्थेत उभा आहे.
Rajguru Wada
विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्याचे मी वाचले म्हणून काल मी राजगुरूनगरला गेलो। राजगुरुंच्या वाड्याला भेट दिलेली असली तरी वीस वर्षांमध्ये आठवणींच्या कपाटातील अनेक वस्तू बदलल्या होत्या. फक्त आठवत होती ती त्यांच्या जन्मखोलीतील एका छोट्याशा खिडकीतून दिसणारी भीमा नदी-चमचम करणारे पाणी आणि मंद प्रवाह. ते दृश्य अद्यापही मला लख्ख आठवते. काल गेलो तेव्हा हा वाडा आणखी भकास झाल्याचे पाहताक्षणी जाणवले. कालही मी आत खोलीत गेलो आणि परत ते दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला.
Birthplace of Rajguru
ज्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरले त्यांच्यांपैकी एक सुशील मांजरे यांची भेट झाली। मांजरे यांनी एकेका गैरप्रकाराचा पाढा वाचावयास सुरवात केली. जन्मखोलीचे मूळचे स्वरूप बदलून टाकले आहे, नदीकाठच्या भिंतीत वाड्याचे जुने दगड वापरून नव्या दगडाचे पैसे लावले आहेत, शिवाय संपूर्ण दगडाची असलेली भिंत वीटांनी बांधायचा प्रयत्न...एक ना दोन. शिवराम हरींच्या जन्मखोलीचेच सध्याचेच काम अगदी एखाद्या चाळीच्या खोलीसारखे केले आहे. मात्र आधी याहूनही वाईट बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ती खोली पाडायला लावली. नदीकाठच्या भिंतीचे कामही असेच पाडायला लावले. त्यानंतर ते आजतागायत सुरू झालेले नाही.
Rajguru Wada
या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आनंद गावडे आणि हरिदास गोकुळे या दोघांनी 7 जूनपासून उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी 10 जून रोजी राजगुरूनगर बद पाळण्यात आला. दोषींवर सात दिवसाच्या आत कारवाई करू, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार दोघा कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले. या प्रकरणाबाबत बोलताना गावडे यांना थांबविणे अशक्य होत होते. वाड्याचे बांधकाम बंद का पडले म्हणून या कार्यकर्त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना कळाले, की ठेकेदारांना बिल देण्यासाठी जिल्हा कोषागारातून 70 लाख रुपये उचलण्यात आले आहेत. खरी गंमत पुढेच आहे. हे 70 लाख रूपये घेतल्याबद्दल कार्यकर्त्यांनी पुरातत्व खात्याचे सहसंचालक डॉ. चेतन साळी यांच्यावर संशय घेतला. लगेच दोन दिवसांत पुरातत्व खात्याच्या बँक खात्यात 58 लाख रुपये भरण्यात आले. एवढे करूनही प्रशासन मात्र या भ्रष्टाचाराची जबाबदारी कोणावर टाकण्यास तयार नाही.
rajguru wada
गावडे आणि गोकुळे यांच्या उपोषणानंतर 'ज्वलज्जहाल' वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी एंट्री मारली। दहा जूनला त्यांनी त्यांच्या शैलीत भाषण करून वाहतूक रोखून धरली. (डॉ. साळीला राजगुरूंच्या पुतळ्यासमोर जीवंत जाळू हे बंडातात्यांच्या त्या दिवशीच्या भाषणातील एक वाक्य.) त्यानंतर मात्र प्रशासनाने दखल घेतली. अगदी दोन दिवसांपूर्वी पुरातत्व खात्याचे एक पथक वाड्याला भेट देऊन गेले.
दरम्यान, विधानसभेत हा प्रश्न चर्चेला आला तेव्हा तब्बल तीन सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या!

इन्किलाब जिन्दाबाद!

Friday, May 29, 2009

नेमेची येतात निवडणुका...अन जातीयवाद

निवडणुकीच्या तोंडावर कोंग्रेस सरकारने काढलेल्या वटहुकुमाने आपले काम नेमके केले आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना जातीच्या वादात अडकावायचे आणि इकडे आपला कार्यभाग साधुन घ्यायचा, अशी बिनतोड़ योजना कोंग्रेसने आखलेली आहे. त्याचा पहिला टप्पातरी यशस्वीपणे पार पडला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ३०० कोटी रुपये उधळण्याची पूर्वपीठीका ही आहे।


एरवी बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला मराठा संघटनांचा असलेला विरोध मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना माहीत नसावा, हे शक्य आहे का? बाबासाहेबांच्या नावाला विरोध होणार आणि तो मराठा सन्घटनान्कडूनच होणार ही खूनगाठ बांधूनच हा खेळ खेळण्यात आला. त्यानुसार विनायक मेटे आणि पुरुषोत्तम खेडेकर या महामानवांनी बाबासाहेबांवर दुगाण्या झाडल्या. संसदेच्या निवडणुकीतील यशाने भरात आलेल्या आणि शिवाशाहीरांशी निष्टा बाळगून असलेल्या राज ठाकरे यांनी अगदी साहजिकपणे बाबासाहेबांची बाजू घेतली. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडने उद्या (शनिवारी) पत्रकार परिषद बोलाविली आहे. त्यासाठी कादालेल्या पत्रकातील भाषा पाहून मला आपले वाटले, की त्या मजकुराचा पहिला कागद जागच्या जागीच जाळून गेला असावा.

राज यांनी सांगितले नसते, तरी अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, की मराठा संघटनांच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पाठबळ आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तर अंगातील सगळे बळ याच संघटनांचे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा घाव राष्ट्रवादीच्या वर्मावर बसला असल्यास नवल नाही. काँग्रेस नेते by default आपली संघटना सर्वसमावेशक असल्याचे सांगू शकतात. राष्ट्रवादीला ती सोय नाही. राष्ट्रवादीच्या या प्रतिमेमुळे आताच्या निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भात अन्य सर्व जाती एकवटून मतदान विरोधात गेले, हां इतिहास किमान पवारांना तरी माहित आहे.शिवाय एकदम कोलांटउडी मारून ओबीसी किंवा अन्य समाजाला एकत्र घेण्याचे प्रयत्नही राष्ट्रवादी करू शकत नाही, कारण तसं केलं तर आहे तो मराठा मतदारही नाराज होऊन दूर होऊ शकतो. त्यामुळे बाबासाहेबांना पुढे करून मराठा विरोधी ब्राम्हण असे भांडण तयार करायचे, त्यात मराठा समाजाला एकाकी पाडायचे म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादीचा मतदारवर्ग संख्येने कमी होऊ शकतो, हा साधा हिशोब कॉंग्रेसच्या नेतृत्वाने मांडला आहे.
या सगळ्या गदारोळात शिवसेना वा भारतीय जनता पक्षाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यांना भूमिका घेण्याची सोयही सरकारने ठेवलेली नाही. आज राज ठाकरे यांच्या विधानानंतर विनोद तावडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा 'जाणता राजा' शरद पवार यांनीही मराठा नेत्यांना राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाचा उल्लेख नाही. सगळ्या गदारोळानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, की या समितीच्या अध्यक्षपदी तेच आहेत. गेले तीन दिवस चालू असलेल्या या वादात आता त्यांनी आपले तोंड उघडले आहे.


गमतीचा भाग बघा, गेल्या वेळेस २००४ सालीच्या निवडणुकीत याच बाबासाहेबांची बदनामी करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. आज त्याच बाबासाहेबांच्या नथीतून कॉंग्रेस राष्ट्रवादीची शिकार करू इच्छित आहे. याला म्हणतात काळाचा न्याय!