Sunday, March 22, 2009

सगळे साहित्यिक लाचार आहेत

हाबळेश्वर येथे साहित्य संमेलनात संतसूर्य तुकारामचे प्रकाशक सुनिल मेहता यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी त्यांची मी आणि माझा सहकारी तानाजी खोत यांनी भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत मेहता यांनी साहित्यिक आणि साहित्यिकांच्या मिंधेपणावर बोट ठेवलेच. शिवाय यादव यांना राजीनामा भाग पाडण्यामागे राजकारण असल्याचेही सूचित केले. त्यांच्याशी झालेली ही चर्चा...

काल महाबळेश्वरला जो प्रकार घडला....
याबाबत मला एवढेच म्हणायचे आहे, की सगळे साहित्यिक आणि साहित्य संस्था, त्यात महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठवाडा व विदर्भाच्या संस्थाही आल्या या सगळ्या लाचार झाल्या आहेत. एका व्यक्तीच्या मिंधे झाल्या आहेत.

ही व्यक्ती म्हणजे कौतिकराव ठाले पाटील. त्यांनी काय जादू केली...
ते समजत नाही. परंतु एवढ्या वर्षांची परंपरा असलेले हे संमेलन त्यांनी हायजॅक केले. काल आधी त्यांनी मला विचारले, तुम्ही कोण? मी प्रतिनिधी शुल्काची पावती दाखविल्यानंतर त्यांनी संयोजकावर भाषण न देण्याचे खापर फोडले. त्यावेळी डॉ. वि. भा. देशपांडे, रंगनाथ कुलकर्णी ही मंडळी तेथेच बसली होती. त्यांनी कोणी चकार शब्दी काढला नाही. आज ठाले पाटील यांचे विधान छापून आले आहे, की भाषण मिळणार नाही. मग दोन दिवस ते खोटं का सांगत होते. त्यांनी स्वतःलाच अध्यक्ष म्हणून मिरवून घेतले.
या सगळ्या प्रकरणात संमेलनाची जी शोभा झाली तशी कधीही झाली नाही. उदघाटन समारंभाला मावळते अध्यक्ष नव्हते, नवनियुक्त अध्यक्षही नव्हते. शिवाय जी काही गर्दी जमली होती ती आशा भोसले यांना पाहण्यासाठी जमली होती. संमेलनाशी त्यांना काहीह देणं घेणं नव्हतं. आशाताईंचे भाषण संपताच मंडप सगळा रिकामा झाला. आजपर्यंत असं कधीही घडलं नव्हतं.

या सगळ्या प्रकरणावर प्रकाशक परिषदेचे काय म्हणणे आहे?
त्यांचा मला पाठिंबाच आहे. येत्या पंधरा दिवसांत आमची बैठक होणार आहे. त्यात पुढील वर्षीपासून वेगळे संमेलन घेण्यावरही विचार होऊ शकतो.

मुळात महाबळेश्वरला संमेलन घेण्याची योजनाच चुकीची होती. आता परीक्षेचे दिवस आहेत. शिवाय तेथे पर्यटकांशिवाय कोणी येत नाही. त्यांना पुस्तके घेण्यात काडीचाही रस नाही. प्रतिनिधींची सोय करण्याचीही या लोकांनी तसदी घेतली नाही. अध्यक्षांनी राजीनामा दिला तेव्हा या मंडळींनी संमेलन स्थगित का केलं नाही. शिवाय अध्यक्षांचे छापील भाषणही द्यायचे नाही, ही कोणती पद्धत आहे?

वाईट म्हणजे या गोष्टींवर कोणी बोलतही नाही
तेच म्हणतोय मी. सगळेच लाचार झाले आहेत. एक माणूस काहीही निर्णय घेतो आणि बाकी सगळे त्याच्या मागे फरफटत जात आहेत.
(इतक्यात मेहता यांना फोन येतो. पलिकडचे बोलणे ऐकल्यावर उसळून म्हणतात, अहो पत्रक काय काढायचं आणि निषेध काय करायचा? जे घडलं ते वृत्तपत्रांनी अगदी स्पष्ट छापलं तरीही या लोकांना फरक पडत नाही. आपण नुसती पत्रकबाजी काय करायची...आदी)

बरं, ही कादंबरी मागे घेण्याने तुमचे जे नुकसान झाले...
ते नुकसान फारसं आम्ही मनावर घेत नाही. तेवढं एक अंडरस्टँडिंग लेखक आणि प्रकाशका दरम्यान असतंच. व्यक्तिशः मला असं वाटतं, की यादव सरांनी माफी मागायला नको होती. कादंबरी परत घेतली याचाच अर्थ माफी मागितली असा होतो. पण त्यांना कदाचित फोन आले असतील, काही झाले असतील. त्यांनी निर्णय घेतला आणि आम्ही ठामपणे त्यांच्या मागे आहोत.

या सगळ्या प्रकरणात यादव यांच्या पाठिमागे कोणीही उभे राहिले नाही.
तीच तर शोकांतिका आहे. आता सगळं झाल्यावर प्रत्येकजण प्रतिक्रिया देत आहे. वाहिन्यांवरून बोलत आहेत. मात्र गेले दोन महिने हे सर्व लोकं कुठे होते. माध्यमांनीही त्याला काही प्रसिद्धी दिली नाही.

यादव सरांना अध्यक्ष बनू द्यायचं नाही, असे राजकारण यामागे असू शकते का?
निश्चितच आहे. हे सगळं प्रकरण घडवून आणलेलं आहे. त्यामागे राजकारण आहे. मात्र साहित्य क्षेत्रात हे जे काय चालू आहे, ते अत्यंत वाईट आहे. हे संमेलन कदाचित अखेरचे असू शकेल, अशीही एक शक्यता आहे.

4 comments:

 1. कौतुकरावाचं कौतुक .. तुम्हा पत्रकारांनाच जास्तं! विनाकारण अगदी साहित्याशी काडीचाही संबंध नसलेला हा माणुस सगळं साहित्य सम्मेलन हायजॅक करतो. सामान्य माणसाला ह्या अशा उरुसा मधे काडीचाही रस राहिलेला नाही. साहित्यिकांनी स्वतःचीच पाठ थोपटुन घ्यावी अन पुढच्या जागतिक ( हा हा हा !!!) सम्मेलनामधे फुकट तिकिट इत्यादी मधे वर्णी कशी लाउन घेता येइल तिकडे लक्ष द्यायला म्हणुन हा सम्मेलनाचा फार्स आहे.
  माझं एक मराठी साहित्य प्रेमी म्हणुन असं म्हणणं आहे, की सरळ हे सम्मेलनच बंद करुन टाका. न रहेगा बांस न बजेगी बांसुरी.. माझ्या ब्लॉग वर पण काहितरी खरडलंय़.. साहित्य सम्मेलनाचा टॅग आहे त्यावर क्लिक करा.. कवतिकरावाचे फोटू हायती.....

  ReplyDelete
 2. मौन हे सुरक्षीत व सोयिस्कर असते. झुंडशाही पुढे यादव नमले कि त्यांना खरोखरीच माफी मागाविशि वाट्ली? जनक्षोभापुढे तात्विक व तार्किक गणिते चालत नाहीत.

  ReplyDelete
 3. महेंद्र, कौतुकरावांचं अति कौतुक झालं हे मान्यच केलं पाहिजे. मात्र संमेलनात कोणाला रस नाही, हे तितकेसे खरं नाही. विविध पाककृतींची पुस्तके आणि साहित्यवर्तुळातील गॉसिपिंग करण्यासाठी ती हक्काची जागा आहे. संमेलने बंद करायला पाहिजेत, ही गोष्ट खरी आहे. पण हा तमाशा दुसऱया स्वरूपात चालणार नाही कशावरून? माझ्या मते संपूर्ण मराठी साहित्यिक आणि साहित्यविश्वाच्याच पुनर्मूल्यांकनाची वेळ आली आहे.
  प्रकाशजी, होय, आनंद यादव झुंडशाहीपुढे झुकले हे खरं आहे. मौन हे नैराश्यातूनही येऊ शकते. एखाद्या माणसाला टारगेट केल्याचे जाणवत आहे आणि तो काहीच करू शकत नाही, हीच मुळात वाईट गोष्ट नाही का?

  ReplyDelete
 4. आनंद यादव हे परिवारातले. तरिही त्यांचं ते लिखाण मला आवडलं नव्हतं . मला वाटतं समरसता मंचाचं काम पहायचे ते.तरिही, मी त्यांच्या लिखाणाच्या विरोधातच आहे. मला एकच वाटतं , की जरी ती कादंबरी असली तरिही , एका थोर पुरुषाच्या जिवनावरची आहे , तेंव्हा थोडं सांभाळूनच लिहायला हवे होते. उद्या जर कोणी शिवाजी महाराजांवर कादंबरी लिहिली अन त्यात एक कादंबरीचा फिल देण्यासाठी अशा लुझ कॉमेंट्स केल्या तर चालेल कां??
  जेंव्हा हे पुस्तक मागे घेतलं होतं तेंव्हाच, त्यांनी मान्य केलं की जे काही लिहिलंय ते बरोबर नाही , म्हणुन पुस्तक मागे घेतोय..

  आणि हो, कुसुमाग्रज पण म्हणाले होते, की २१ व्या शतकात साहित्य सम्मेलन ही संकल्पना काल बाह्य होणार .....!! मला तर वाटतं ते अगदी १००टक्के खरं आहे...झालेलिच आहे..

  ReplyDelete