Wednesday, March 18, 2009

वारकऱयांना धन्यवाद

समस्त महाराष्ट्रीय समाजाने आता वारकऱयांना धन्यवाद दिले पाहिजेत. कारण त्यांनी एका जगन्मान्य संताची निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. त्यासाठी त्याच संताच्या विचारसरणीला त्यांना फाटा द्यावा लागला आहे, हा किरकोळ भाग आहे. संत तुकाराम यांच्या मनात जगाच्या सामान्य समजल्या जाणाऱया परंतु हिन पातळीवरच्या कार्यकलापाबाबत जो वितराग निर्माण झाला, तो त्यांची बदनामी करणारा आहे, हे वारकऱयांशिवाय आपल्याला कोण सांगू शकला असता? दारू पिणाऱया आपल्या मित्रांची संगत सोडायला पाहिजे, वाईट धंदे करणाऱया लोकांमध्ये वावरणे टाळायला पाहिजे आहे, असे विचार तुकाराम महाराजांच्या मनात येणं हा केवढा भयानक अपराध आहे, हे आनंद यादव यांना कोणी समजावयाला नको का?

मराठी साहित्यिक संमेलानाला खरोखर कशासाठी जातात, हे वारकऱयांच्या या यशाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातून जवळपास हद्दपार झालेली ब्राह्मणशाही पुन्हा स्थापन करण्याच्या दिशेनेही पाऊल यानिमित्ताने पडले, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. वेदांचा अर्थ आम्हालाच कळतो आणि तुकोबासारख्या तुच्छ माणसाने त्यात लक्ष घालू नये, हीच तर त्यावेळच्या ब्राह्मणांची भूमिका नव्हती काय? मग आता तुकोबांच्या चरित्रावर आमचाच हक्क आहे आणि इतर कोणालाही त्यासंबंधी लक्ष घालू नये, ही वारकऱयांची भूमिका तशीच आहे ना. तेव्हाच्या मंबाजीने तुकोबांना छळले त्यांची परंपरा कोणीतरी चालवायला नको का? असहिष्णुता आणि हटवादीपणाची गादी अशी रिकामी कशी राहू द्यायची? संप्रदायांच्या सुरवातीच्या संतांनी केवळ भक्ती आणि सहिष्णुतेची शिकवण दिली. ती आतापर्यंत पुरली. आता या पिढीने येणाऱया पिढ्यांसाठी काही ठेवा ठेवायला नको? ‘नाठाळांच्या माथी हाणू काठी,’ असे तुकोबांनी सांगितले. आता नाठाळ कोणाला म्हणायचे याचे सर्वाधिकार वारकरी समाजाने आपल्या हाती घेतले आहेत, याबद्दल त्यांचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे.

अध्यात्माची गंगा कितीही मोठी असली तरी माणसाची संकुचितता तिचा एखादा नाला करण्याचाच प्रयत्न करते, हे वारकऱयांनी दाखवून दिले आहे. शेवटी काय, आपला धर्माचा धंदा चालला पाहिजे, ईश्वराची प्राप्ति नाही झाली तरी चालेल, असे कोणीतरी दाखवून द्यायलाच पाहिजे ना? सोने आणि माती मृत्तिकेसमान मानणाऱया तुकोबांच्या देहूत त्यांच्या गाथेचे एक मंदिर उभे राहतय-अख्खं संगमरवरी. या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर गाथेतील अभंग कोरून ठेवलेत. तुकोबांच्या विचाराचा, तत्वज्ञानाचा चुराडा करायचाच आहे, त्यासाठी त्याचे पार्थिव अवशेष जपणे आवश्यक आहे. याचा प्रत्यय दिल्याबद्दल खरोखर हे जग वारकऱयांचे ऋणी राहिल.

एका बाबतीत मात्र वारकऱयांना अपेक्षेपेक्षा अधिक यश आलं. तत्कालिन ब्रह्मवृंद तुकारामांचा छळ करत असताना सर्वसामान्य जनता तुकोबांच्या बाजूने उभा होती. आता मात्र छळ होणाऱया व्यक्तीला पाठिंबा देण्याची कोणाची टाप नाही. अरे, चार शतकांमध्ये समाजाने एवढी तरी प्रगती करावयास नको का? सातशे वर्षांच्या वारकरी संप्रदायाला आणि शहाण्या सुरत्या साहित्यिकांना आपण जातीच्या आधारावर श्रेष्ठत्व ठरविण्याचा सार्वकालिक आणि हमखास फार्म्युला मान्य करायला लावला का नाही? शेवटी मुस्कटदाबी कोणाची होते हे महत्वाचे नाही, त्याची जात कोणती, तो कोणत्या संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये जातो हे महत्वाचे. यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावली म्हणून त्यांनी बहुजन चळवळींशी गद्दारी केली. त्यामुळे त्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी आपली नाही, हे नेहमी घायाळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अँम्बुलन्स सेवा पुरविणाऱया मुखंडांची विचारधारा यानिमित्ताने पुढे आली, हे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि पुरोगामी परंपरेवर केवढे थोर उपकार आहेत? आता येते दोन महिने अनेक वर्तमानपत्रांत आणि वर्षाच्या शेवटी दिवाळी अंकांमध्ये मराठी साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा विषयांवर लेख लिहिण्याचे काम किती हातांना पुरणार आहे, हे विठ्ठलच जाणो. हे काम पुरविण्याबद्दलही वारकऱ्यांना धन्यवाद. अनेकानेक धन्यवाद.

4 comments:

 1. that's right. i agree with you

  ReplyDelete
 2. पण मग निनावी कशासाठी. नाव सांगून सहमत व्हायचे.

  ReplyDelete
 3. अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा तुम्ही मांडलेला मुद्दा बरोबर आहे. पण या प्रकरणात यादव सर त्यासाठी फारसे आग्रही असल्याचे दिसले नाहीत . त्याना अभिव्यक्ति स्वातंत्र्य आबाधित ठेवण्यापेक्षा अध्यक्षपद आबाधित ठेवण्यातच जास्त इंटरेस्ट होता. त्यानी ठाम भूमिका घेतली असती तर त्याना हेवेदावे विसरून तुम्ही म्हणता त्या अमबुलंस वाल्यानी आपली सेवा पुरवलिहि असती कदाचित. यादवांच्या या स्थितीला तेच जबाबदार आहेत असे वाटते. त्याना वाटले की माफ़ी मागितली की वाद संपेल. पण वाद पुस्तकासाठी नव्हता तर अध्यक्षपद काढून घेण्यासाठीच होता पुस्तक केवल निमित्त होते. हे त्याना समजले नाही. तुमच्या विवेचनावारून असे वाटते की यादव हे तुकाराम आहेत आणि वारकरी म्हणजे मंबाजी या सगळ्यात त्यांची काहीच चुक नाही. पण माला ते तितके योग्य वाटत नाही. अध्यक्ष्यपद नसते तर कदाचित यादव वेगले वागले असते. आणि त्यानी अभिव्यक्ति स्वातंत्र्यासाठी वार करी आन्दोलन अंगावर घ्यायचे ठरवले असते तर यादव हीरो झाले असते. पण इथे तेल ही गेले तुपही गेले आणि हाती धुपटने आले अशी त्यांची अवस्था झाली आहे.

  आणि हे जे कुणी वारकरी होते ते खरे वारकरी नव्हतेच मुळी...... सुपारी घेउन राजकीय काम करणारे कुठेही असू शकतात.

  ReplyDelete
 4. I challange Deshpande & Yadav to write & publish there thoughts on Moh. Paigambar or Qouran.I am 100% sure he will not!

  A Sahishnu & Bhale tari devu.... VARKARI.

  ReplyDelete