Tuesday, June 16, 2009

भ्रष्टराज 'गुरू'!

बरोबर वीस वर्षांपूर्वी मी राजगुरूनगरला (ज्याला स्थानिक लोकं अजूनही आवर्जून खेड म्हणतात) गेलो होतो. त्यावेळी मी एक साधा विद्यार्थी होतो आणि एनसीसीच्या शिबिरासाठी तिथे पोचलेल्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांपैकी एक होतो. नोव्हेंबर 2 ते 12, 1989 या दहा दिवसांमध्ये एके दिवशी आम्हाला हुतात्मा राजगुरू यांचा वाडा बघण्यास नेले होते. त्यावेळी येथेच या वाड्याच्या नावावर स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांची बातमी द्यावी लागेल, हे मला कुठे माहित होते. पण तसे झाले खरे. शिवराम हरी राजगुरू यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या घरातील वस्तू लोकांनी कशा पळविल्या हे 1989 साली ऐकायला मिळाले. तर राजगुरु स्मारकाच्या नावावर 70 लाख रुपये पळविण्याचा कसा डाव रचण्यात आला, हे 2009 साली ऐकायला मिळाले.

Rajguru Wada
हुतात्मा सिवराम हरी यांची गेल्या वर्षी जन्मशताब्दी साजरी झाली. त्याआधी सुमारे 12 वर्षांच्या खटपटीनंतर राज्य सरकारने राजगुरू यांचा जुना वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. या वाड्याच्या दुरुस्ती आणि नवीनीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निदी मंजूर झाला होता. त्याअंतर्गत शिवराम हरी यांची जन्मखोली, देवघर आणि नदीकाठची भिंत यांचे बांधकाम करण्याची मूळ योजना होती. हे काम 24 ऑगस्ट 2008 (शिवराम हरींच्या जन्मशताब्दी समापनापर्यंत) पूर्ण व्हायचे होते. प्रत्यक्षात पुरातत्व खाते आणि त्यांच्या ठेकेदारांनी धडाधड जुन्या इमारती पाडून टाकल्या. त्याजागी नव्या इमारती मनमानी पद्धतीने उभारण्यास सुरवात झाली. स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर ते निकृष्ट बांधकाम पाडण्यात आले. नंतर जन्मशताब्दीच्या निमित्ताने घाईघाईने जन्मखोली बांधण्यात आली. एवढे सगळे घडल्यानंतर तिथे सगळे काम अर्धवट टाकण्यात आले. गेले वर्षभर हा वाडा ओबडधोबड अवस्थेत उभा आहे.
Rajguru Wada
विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्याचे मी वाचले म्हणून काल मी राजगुरूनगरला गेलो। राजगुरुंच्या वाड्याला भेट दिलेली असली तरी वीस वर्षांमध्ये आठवणींच्या कपाटातील अनेक वस्तू बदलल्या होत्या. फक्त आठवत होती ती त्यांच्या जन्मखोलीतील एका छोट्याशा खिडकीतून दिसणारी भीमा नदी-चमचम करणारे पाणी आणि मंद प्रवाह. ते दृश्य अद्यापही मला लख्ख आठवते. काल गेलो तेव्हा हा वाडा आणखी भकास झाल्याचे पाहताक्षणी जाणवले. कालही मी आत खोलीत गेलो आणि परत ते दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला.
Birthplace of Rajguru
ज्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरले त्यांच्यांपैकी एक सुशील मांजरे यांची भेट झाली। मांजरे यांनी एकेका गैरप्रकाराचा पाढा वाचावयास सुरवात केली. जन्मखोलीचे मूळचे स्वरूप बदलून टाकले आहे, नदीकाठच्या भिंतीत वाड्याचे जुने दगड वापरून नव्या दगडाचे पैसे लावले आहेत, शिवाय संपूर्ण दगडाची असलेली भिंत वीटांनी बांधायचा प्रयत्न...एक ना दोन. शिवराम हरींच्या जन्मखोलीचेच सध्याचेच काम अगदी एखाद्या चाळीच्या खोलीसारखे केले आहे. मात्र आधी याहूनही वाईट बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ती खोली पाडायला लावली. नदीकाठच्या भिंतीचे कामही असेच पाडायला लावले. त्यानंतर ते आजतागायत सुरू झालेले नाही.
Rajguru Wada
या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आनंद गावडे आणि हरिदास गोकुळे या दोघांनी 7 जूनपासून उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी 10 जून रोजी राजगुरूनगर बद पाळण्यात आला. दोषींवर सात दिवसाच्या आत कारवाई करू, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार दोघा कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले. या प्रकरणाबाबत बोलताना गावडे यांना थांबविणे अशक्य होत होते. वाड्याचे बांधकाम बंद का पडले म्हणून या कार्यकर्त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना कळाले, की ठेकेदारांना बिल देण्यासाठी जिल्हा कोषागारातून 70 लाख रुपये उचलण्यात आले आहेत. खरी गंमत पुढेच आहे. हे 70 लाख रूपये घेतल्याबद्दल कार्यकर्त्यांनी पुरातत्व खात्याचे सहसंचालक डॉ. चेतन साळी यांच्यावर संशय घेतला. लगेच दोन दिवसांत पुरातत्व खात्याच्या बँक खात्यात 58 लाख रुपये भरण्यात आले. एवढे करूनही प्रशासन मात्र या भ्रष्टाचाराची जबाबदारी कोणावर टाकण्यास तयार नाही.
rajguru wada
गावडे आणि गोकुळे यांच्या उपोषणानंतर 'ज्वलज्जहाल' वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी एंट्री मारली। दहा जूनला त्यांनी त्यांच्या शैलीत भाषण करून वाहतूक रोखून धरली. (डॉ. साळीला राजगुरूंच्या पुतळ्यासमोर जीवंत जाळू हे बंडातात्यांच्या त्या दिवशीच्या भाषणातील एक वाक्य.) त्यानंतर मात्र प्रशासनाने दखल घेतली. अगदी दोन दिवसांपूर्वी पुरातत्व खात्याचे एक पथक वाड्याला भेट देऊन गेले.
दरम्यान, विधानसभेत हा प्रश्न चर्चेला आला तेव्हा तब्बल तीन सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या!

इन्किलाब जिन्दाबाद!

1 comment:

  1. जुन्नर तालुक्यातील बेल्हे हे आमचे गाव. आमच्या शाळेतील देव गुरुजी सांगायचे की राजगुरु आमच्या घराच्या बळदात लपले होते. राजगुरु हे आमच्या आजोबांचे नातेवाईक लागतात. ब्रिटिश मागे लागल्याने आजोबांनी त्यांना बळदात लपवले. यातील खर खोट माहित नाही पण त्यावेळी मात्र माझी कॊलर ताठ व्हायची. आमच्या माडीत भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचे एकत्र फोटो मी रोज पहात असे.आमचे काका तीन चार वर्षांपुर्वी पंजाबला आपल्या लष्करातील मुलाकडे गेले होते. तेथील मुख्यमंत्र्यांच्च्या हस्त्ते भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनी कार्यक्रमात त्यांना राजगुरुंचे नातेवाईक म्हणुन आदाराने सत्कार केला होता. त्यांनी छोटे भाषणही दिले होते. हा प्रसंग सांगताना त्यांचा उर भरुन आला. दै. सकाळला बातमी देउन त्यांनी याची बातमी छापली नाही याचा त्यांना रागही आला होता.

    ReplyDelete