Sunday, November 1, 2009

फोलपटराव, निर्माते-दिग्दर्शक

मुलाखतकारः नमस्कार, आज आपणblog भेटणार आहोत प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक फोलपटराव यांना. खरं तर प्रेक्षक आणि वाचक यांना फोलपटरावांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता भासू नये. झपाट्याने अस्तंगत होणारे टांगाचालक, पाठ्यपुस्तके विक्रेत्यांच्या हृदयद्रावक समस्या अशा विविध विषयांवर त्यांनी चित्रपट काढले आहेत. तर आज आपण त्यांना पहिला प्रश्न हाच विचारू या, की अशा वेगळ्या वाटांनी जाणारे चित्रपट काढण्यामागची त्यांची प्रेरणा काय आहे.

फोलपटरावः मी मुळात चित्रपट व्यवसायाकडे वळलो अपघाताने. बारावी झाल्यानंतर योगायोगाने मला खूप गुण मिळाले. त्यामुळे वैद्यकीय शाखेत प्रवेशही मिळाला. मात्र ते शिक्षण घेत असतानाच, डॉक्टर झालेल्या माणसाने कलेच्या प्रांतात जावे अशी एक साथच असल्याचे माझ्या लक्षात आले. मग वैद्यकीय अभ्यासापेक्षा याच विषयाचा मी अभ्यास करायला लागलो. त्याच तंद्रीत असताना एकदा माझ्या दुचाकीचा अपघात झाला. त्यावेळी दवाखान्यात दाखल असताना रात्रपाळीतील नर्सेसच्या हालअपेष्टा मी दिवसरात्र जागून पाहत होतो. त्याचा परिणाम म्हणून मला दवाखान्यातून पंधरा दिवसांऐवजी एका आठवड्यातच डिस्चार्ज देण्यात आला. याच अनुभवातून माझा पहिला चित्रपट सलाईन आणि ऑक्सिजनचा जन्म झाला.

प्रश्नः या चित्रपटाच्या अनुभवाचा मग पुढील कलाकृतीच्या वेळी तुम्हाला कसा फायदा झाला.

फोलपटरावः खूपच. म्हणजे हा माझा पहिला चित्रपट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने बनविण्यात आला होता. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक चित्रपटासाठी कोणाला कसे बनवायचे, यात मी एक्स्पर्ट झालो. शिवाय ओसाड फेस्टिव्हल, रान फेस्टिव्हल अशा महोत्सवांमध्ये त्याचे प्रदर्शन झाले. त्यामुळे करपरती आणि राज्य सरकारच्या अनुदानातून काहीही तयार केले तरी ते खपविता येते, हे मला कळाले. हा चित्रपट जेव्हा आपल्याकडे प्रदर्शित झाला तेव्हा मात्र मला काहीसा वेगळा अनुभव आला. काही प्रेक्षकांनी मला पत्र पाठवून या चित्रपटामुळे खूपच मनोरंजन होते, अशी तक्रार केली. त्यामुळे पुढील सगळ्या चित्रपटांमध्ये 10 टक्के मनोरंजन आणि 90 टक्के चर्चासत्र असायलाच हवा, यावर माझा कटाक्ष आहे. त्यामुळे लोकंही त्यांना प्रतिसाद देतात.

प्रश्नः तुमचा नवा जो चित्रपट आहे, काळा कोळसा सर्वकाळ, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे

फोलपटरावः आता हा जो चित्रपट आहे तो आहे कोळशाच्या नामशेष होत चाललेल्या वखारींच्या संदर्भात. सुमारे दीड दोन शतके अनेक घरांत ज्यांनी चूल पेटविली, त्या कोळशांच्या वखारींना एक सांस्कृतिक महत्व आहे. कोळशाच्या काळ्या रंगातून अनेक जीवनांमध्ये रंग भरले. कित्येक मोठ्या व्यक्ती पूर्वी स्वतः जाऊन कोळसे विकत घेत. मात्र आज गॅस आणि ओव्हनच्या काळात ही संस्था काळाच्या पडद्याआड जात आहे. त्यामुळे त्यावर एक चित्रपट तयार करावा, असे मी ठरविले. सुदैवाने केंद्र सरकारच्या ऊर्जा बचत ब्युरोच्या अधिकाऱ्यांनाही ही कल्पना पटली. त्यामुळे त्यांनीही लगेच चित्रपटासाठी अनुदान मंजूर केले. कोळशाची वखार चालविणाऱ्या एका घराण्यातील तीन पिढ्यांची ही कथा आहे.

प्रश्नः ही कल्पना तुम्हाला कशी सुचली

फोलपटरावः काय झालं, की माझ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिग्नलमन या चित्रपटाच्या एका शोला मी गेलो होतो. आता माझ्या बहुतेक चित्रपटांमध्ये सिल्हौट पद्धतीने चित्रीकरण केलेले असल्याने अंधाराला मुख्य स्थान असते, हे तुम्हाला माहित आहे. तर त्या शोला पडद्यावर बराच वेळ अंधार असल्याने एका प्रेक्षकाने, कदाचित खेड्यातला असावा तो, अस्वस्थ होऊन काडी पेटविली. त्यावेळी मला वाटले, की या काडीमुळे मल्टिप्लेक्सच्या खुर्च्यांनी पेट घेतला तर...अन् यातूनच काळा कोळसा सर्वकाळचा जन्म झाला. अर्थात् नेहमीच्या पद्धतीने यात मी मुख्य कथेऐवजी पात्रांचे रडके चेहरे, भक्क अंधार आणि दीनवाणे संगीत यांनाच जास्त महत्व दिले आहे.

प्रश्नः चित्रपटसृष्टीत एक दशक घालविल्यानंतर आणि एवढे चित्रपट काढल्यानंतरही तुम्हाला एकही पारितोषिक मिळालेले नाही, याची खंत वाटते का

फोलपटरावः बिल्कुल नाही. पारितोषिकांच्या स्पर्धेवर माझा कधीही विश्वास नव्हता आणि आजही नाही. कारण मला पारितोषिक मिळणार नाही, याची मला खात्री आहे. माझ्या दृष्टीने थिएटर किंवा मल्टिप्लेक्सला चांगल्या मूडमध्ये आलेला प्रेक्षक अस्वस्थ होऊन गेला पाहिजे, हीच मोठी गोष्ट आहे. नांगरलेली नांगी या चित्रपटाच्या वेळची गोष्ट आहे. चित्रपटाचा मुख्य नायक, एक पाप्याचे पितर असलेला शेतकरी, अत्यंत दयनीय, केविलवाण्या परिस्थितीत शेतात माजलेले तण उपटून काढत असतो, असे एक दृश्य त्या चित्रपटात आहे. ते दृश्य पाहून अनेक प्रेक्षक स्वतःचे केस उपटायला सुरवात करत असत, हे मी माझे सर्वात मोठे पारितोषिक समजतो.

प्रश्नः फोलपटरावजी, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगू इच्छिता

फोलपटरावः माझे एकच सांगणे आहे. लक्षात ठेवा, आपण समाजाचे काही देणं लागतो. त्यामुळे काहीही समस्याग्रस्त दिसलं की ते समाजाला देऊन टाका. आपण समस्येची उत्तरं द्यावीच, असं नाही. त्यामुळे जी काही मिळेल ती समस्या शोधा आणि त्या सगळ्यांना. सुदैवाने सध्या मराठी चित्रपटांत अनेक वेगळे प्रयोग होत आहेत. त्यात नजरबंदीचा हाही प्रयोग सर्वांनी करावा, असे मला वाटते.

No comments:

Post a Comment