Wednesday, October 7, 2009

फोलपटरावांच्या मुलाखती

फोलपटराव राजकारणी भाग 2

प्रश्नः सध्याच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात
फोलपटरावः याबाबत मी अजून काही ठरविले नाही. ठरवू या. कसे आहे, काही झाले तरी आम्ही निवडणुकीच्या वेळेस प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबतच असतो. प्रॉब्लेम निवडणुकीनंतर येतो. आम्ही मुंबईत अडकून अडतो आणि कार्यकर्त्यांना वाटते, की साहेब आपल्याकडे लक्षच देत नाही. आता लोकं आम्हाला लक्षानुलक्ष देत असताना गावाकडे कसे जाणार?

प्रश्नः नाही, आम्ही पक्षाच्या बाजूने या अर्थाने विचारतोय.
फोलपटरावः तसे नाही. आता एवढे पक्ष बदलल्यानंतर मला कुठल्या पक्षाचे कौतुक वाटणार. आताच नवीन निघालेल्या एका तिसऱ्या अडगळीतील चौथ्या आघाडीत मी सामिल झालो. त्याची एक वेगळीच गंमत आहे. त्यांच्या नेत्याने मला विचारले, "फोलपटराव, या पक्षात किती दिवस राहणार" मी उत्तर दिले,"पक्ष पंधरवडा" (परत तेच हासणे.)त्यामुळे सध्यातरी कुंपणावर बसायचे आणि निवडणुकीनंतर शेत खायचे, म्हणजे कोणाला पाठिंबा द्यायचे ते ठरविणार असा विचार आहे.

प्रश्नः या निवडणुकीसाठी तुमचा काही अजेंडा, धोरण आहे का?
फोलपटरावः आमच्यासारखे जे ग्रासरुटचे कार्यकर्ते असतेत, त्यांच्याकडे धोरण नसतं. असतो तो बेत. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने निवडणुका जिंकायच्या, कोणता घोडा विनच्या जवळ आहे तो निवडायचा आणि त्याच्या नावाने तिकिट घेऊन जॅकपॉटची सोय करायची, हा आमचा बेत आहे.

प्रश्नः म्हणजे तुम्ही घोडेबाजाराचे बोलताय...
फोलपटरावः अहो, कसले घोडे आणि कसले काय. हा सगळा शिरगणतीचा प्रताप आहे. निवडणुकांमध्ये लोकांनी गाढवं निवडून द्यायची आणि तुम्हा पत्रकारांनी त्याला घोडेबाजार म्हणायचं, कशाला ही प्रथा पाडता. लोकांच्या फायद्यासाठी आली चार डोकी एकत्र आणि केलं पाच वर्षे तुमचं मनोरंजन, त्याला तुम्ही काय टॅक्स लावणार का. त्यामुळं आम्ही घोडेबाजाराचं बोलत नाही, आम्ही बोलतो प्रॅक्टिकलचं. आता तुम्ही घोडेबाजाराचं बोलताय. घोडं मेलं ओझ्याने शिंगरु मेलं येरझाऱ्यानं तुम्ही ऐकलं असंलच. तर आमचं घोडं न मरता निवडणुकीचं ओझं वाहतंय आणि राजकीय पक्षांचं शिंगरू बंडखोरीच्या, आचारसंहितेच्या येरझाऱ्यानं मरतंय. आता त्यातून या पक्षांचा निकाल लागलाच वाईट, तर आमच्यासारख्या घोड्यांनीच खांदा द्यायला पाहिजेय ना.

प्रश्नः फोलपटरावजी, तुमच्या या यशाचे रहस्य काय?
फोलपटरावजीः सक्रियता. मी नेहमी कार्यरत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तयार असतो. काही वेळेस, समस्या कमी पडू लागल्या तर केवळ सोडविण्यासाठी म्हणून मी नव्या समस्या निर्माण करतो. अखेरचा श्वास असेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आतासुद्धा तुमच्याशी मी बोलत असताना, यातले कोणते वाक्य मी बोललोच नाही असा खुलासा उद्या करायचा, याचा विचार मी करत आहे. मुलाखत संपली की त्याची तयारी झालीच म्हणून समजा.

प्रश्नः सध्या राज्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे असं तुम्हाला वाटतं?
फोलपटरावः कायदा आणि सुव्यवस्था. अहो, या राज्यात कोणाला काही धरबंदच राहिलेला नाही. कोणीही येतं आमच्या फॅक्टरीला आग लावतं, अमुक येतो गाडीवर दगडफेक करतो. अरे, कायदा हातात कशाला घेता. तो जागच्या जागी राहू द्या ना. कशाला वापरायला लावता. परवा आमच्या गावात आमच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार झाला. सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी कार्यकर्त्यांना गोळ्या घातल्या, सरकारच्या आदेशाची पोलिसांनी योग्य अंमलबजावणी केली, हे कदाचित खरे असेल. मात्र त्यावेळी ते कशाच्या अंमलाखाली होते, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. परिस्थिती इतकी वाईट आहे, का परवा मी एका सभेत म्हणालो, सरकारने आता आठवड्यातील सातही वारांना जोडून एक गोळीवारही जाहीर करावा. यादिवशी राज्यात सगळीकडे गोळीबार करता येईल. बाकीच सहा दिवसतरी बरे जातील ना लोकांचे.

प्रश्नः फोलपटरावजी, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगू इच्छिता?
फोलपटरावः राजकारणाचे क्षेत्र वाईट असं कोणी कितीही बोललं तरी लक्ष देऊ नका. कोटी गमावून बसताल. राजकारणात तरुण रक्ताला खूप वाव आहे. मी तर म्हणेन, तरूणांच्या रक्तावरच राजकारण चालतंय. शक्य असेल तोवर एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातल्या माणसाच्या वळचणीला जा. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर जनतेवर छाप पडायला हवी. त्यासाठी खूप पिक्चर पाहा. पिक्चरमधल्या अॅक्टरपेक्षा असा भारी अभिनय करा, की नाटकी अभिनय शिकण्यासाठी त्याने तुमच्या सभांना आलं पाहिजे. शक्यतोवर अभिनेत्रीशी चांगले (आणि नैतिकही) संबंध ठेवा. ज्या काय चळवळी, आंदोलने करायची असतील ती कोणतेही पद किंवा सत्ता मिळविण्यापूर्वीच करा. कारण कोणताही राजकारणी फक्त खुर्ची मिळेपर्यंत जंगम मालमत्ता असतो. त्यानंतर तो स्थावर मालमत्ता होतो. तुमच्या मागे असलेले लोक तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेत का तुमचा पाठलाग करायला आलेत, त्याची एकदा खात्री करा. एक लक्षात घ्या, सगळ्या नेत्य़ांना राज्यापुढच्या, मागच्यापुढच्या सगळ्याच, समस्यांची जाणीव असते. त्याची उत्तरे मात्र कोणाकडेच नसतात.

Tuesday, October 6, 2009

फोलपटांच्या मुलाखती

फोलपटराव, राजकीय नेते
भाग १
मुलाखतकारः नमस्कार, आज आपण भेटणार आहोत आपले लाडावलेले, माफ करा लाडके नेते फोलपटराव यांना. विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून फोलपटराव यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यामुळेच दर निवडणुकीच्या वेळी जनताही निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भरीस घालते. यंदाच्याही विवडणुकीत ते मतदारांच्या नशिबाची परीक्षा पाहणार असल्याने आपले नशिब आजमावून पाहणार आहेत. तर या आपण त्यांच्याशी संवाद साधू या.तर फोलपटरावजी, आतापर्यंतच्या वीस वर्षांच्या काळात आपण अठरा पक्ष बदलले आणि स्वतःचे दोन पक्ष काढून विसर्जितही केले. यामागचे इंगित काय?
फोलपटरावः त्याचं असं आहे...जनतेचं कल्याण व्हायचे असेल तर राज्यात स्थिर सरकार पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे दहा पक्ष तर आम्ही स्थिर सरकार याच मुद्द्यासाठी बदलले. गेल्या दहा वर्षांत तर आमची ख्यातीच अशी झाली आहे, की ज्याला आपले गव्हर्नमेंट टिकवायचे असेल, त्याला आमची मदतच घ्यावी लागते. आमची इस्त्री बसल्याशिवाय राज्याची घडीच बसत नाही म्हणा ना. दोन पक्ष आम्ही धर्मनिरपेक्षतेसाठी बदलले. जातीय शक्तींना आमच्यामुळे मदत होऊ नये, यासाठी सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी जुळवून घेण्याचे आमचे आधीपासून धोरण आहे. आता त्यात गफलत काय होते, का आम्ही एखाद्या पक्षात गेल्यानंतर तिथे जातीयवाद सुरू झाल्याचे आमच्या लक्षात येते. एक उदाहरण देतो. आम्ही सत्ताधारी पक्षात असताना आमच्या मतदारसंघात दंगल झाली. त्यावेळी आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो, की दंगल लवकर आटोक्यात आणा. दोषी कोण आहे, याची तपासणी करायची गरज नाही. तर गृहमंत्र्यांचे उत्तर होते, आम्हाला माहित आहे या दंगलीत कोण जातीने लक्ष घालत आहे. मग मी सत्ताधारी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. शिवाय माझ्या पक्ष बदलण्याने जनतेला किती फायदा होतो,पहा ना. दरवेळी त्यांना कोरी पाटी असलेला प्रतिनिधी मिळतो. पाट्या टाकणाऱ्या प्रतिनिधीपेक्षा कोरी पाटी असणारा प्रतिनिधी केव्हाही चांगलाच ना (आपल्या विनोदावर स्वतःच हसतात.)
आणखी एक कारण आहे। आपल्या नागरिकांनी, आमच्या अनुयायांनी सर्व प्रकारच्या अनुभवांना, नवीन विचारांना सामोरे जावे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठीही मला असे राजकारणातले आडवळणं घ्यावे लागले.

प्रश्नः परंतु हे सर्व पक्षांतर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी केले, असे लोक म्हणतात...
फोलपटरावः लोक म्हणजे कोण हो? विरोधक! त्यांच्या म्हणण्याला कोण भीक घालतो. समोरच्या उमेदवाराच्या पाठीमागे असं काही बाही बोलण्याची रीतच असते राजकारणात. आता आम्ही काय आमच्या विरोधकांवर कमी आरोप केले. काय झालं त्याचं। तसंच असते ते. राहता राहिला प्रश्न आमच्या फायद्याचा॥ आता असं बघा, आमचा फायदा हा समाजाचा फायदा असतो. दिल्लीतून निघालेला एक रुपया गल्लीपर्यंत पोचेपर्यंत तेरा पैसे होतो, असं राजीव गांधी म्हणायचे. आता आमच्यापर्यंत रुपयाच नाही आला तर खालच्यांना तेरा पैसे तरी मिळतील का तुम्हीच विचार करा. शेवटी आम्हाला थोडेच पैसे खावेसे वाटतात. पण लोकांचे पोट भरण्यासाठी आम्हाला तेही करावे लागते. पापी पेट का सवाल है ना!

प्रश्नः मात्र अलिकडे राज्यातील जमीनींच्या विक्रीत तसेच प्रकल्पांसाठी जमिनी घेण्याच्या बाबतीत तुमचे नाव अनेक वादांमध्ये सापडले...
फोलपटरावः थांबा थांबा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. परवा दिल्लीत मला बिहारचे एक खासदार भेटले. त्यांना मी विचारले, तुम्ही आमच्या राज्यात एवढ्या जमिनी का विकत घेत आहात. त्यांनी मला सांगितले, तुमच्याच राज्यात नाही तर मी सगळ्या भारतात जमिनी घेत आहे. कारण मला राष्ट्रीय नेता व्हायचे आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती सत्ता हे शिवाजी राजांच्या काळी ठीक होतं हो. आता सत्तेच्या किल्ल्या जमिनी ज्याच्याकडे असतात त्यांच्या हाती असते. काय आहे, विकास करायचे म्हणजे सोयीसुविधा, जागा पाहिजे. त्या ताबडतोब मिळायच्या झाल्या तर आपल्या हाती काही तरी पाहिजे ना. यासंबंधात काही वाद व्हावे, असे मला वाटत नाही. शिवाय आपला वेव्हार एकदम स्वच्छ आहे. सगळ्या जमिनी सरकारी भावाने घेतल्या आहेत, तर लोकं काय म्हणणार का सगळ्या जमिनी माझ्या भावाने घेतल्या आहेत. सगळा शब्दांचा खेळ आहे हो सारा.