Wednesday, November 25, 2009

गोंधळ-धर्माचा आणि राजकारणाचा

देशाच्या राजधानीत राम मंदिर आणि बाबरी मस्जिद यांच्या पाठीराख्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ चालू असताना पुण्यात काल रामकृष्ण मिशनचे स्वामी तत्वज्ञानानन्द यांचे भाषण होते. एमआयटीच्या कार्यक्रमात त्यांचे हे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, "भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे असे म्हणण्यापेक्षा तो अध्यात्मिक देश आहे, असे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे. इंद्रियांमधून मिळणाऱ्या आनंदापेक्षा आत्मिक आनंद महत्वाचा आहे. हा आनंद कसा मिळवायचा हे आपलाल्या केवळ धर्मग्रंथच नाही, तर शास्त्रीय संगीत, कला आणि साहित्य यातूनही ही शिकवण मिळते."

खरे तर अशा प्रकारची वाक्ये चोहोबाजूला अनेकजण बोलत असतात. मात्र रामकृष्ण मिशनसारख्या संस्थांमधील वरिष्ठ आणि सन्माननीय व्यक्ती वरील विचार मांडते तेव्हा त्याला वेगळा अर्थ असतो. अयोध्येतील ज्या वास्तूवरून नवी दिल्लीत गोंधळ सुरु आहे, तो धार्मिक आहे का राजकीय? म्हणजे पहा, धार्मिकता सोडा आणि भौतिकता पकडा, असा उपदेश आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी केला. त्यामुळेच रामापेक्षा रामाच्या मंदिराबाबतच या लोकांना अधिक प्रीती आहे. घ्या, तुम्हाला भौतिक विचारसरणी हवी होती ना? आता बोला, आम्ही अयोध्येतील भौतिक वास्तू आणि भौतिक जमिनीसाठी हातघाईवरच येऊ.

खरं म्हणजे, धर्म, आध्यात्मिकता आणि नैतिकता या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे आपल्या शिक्षणव्यवस्थेने  कधी नीट सांगितलेच नाही. धर्म म्हणजे पूजापाठ, देव-देवस्की आणि मंदिरात जाणे, अशा तद्दन बाह्य उपचारांशी जोडली गेलेली वस्तू. 'आनंदो' नावाच्या एका बंगाली नियतकालिकाचा आरोग्य विशेषांक एकदा माझ्या हातात पडला. त्यात बंगालमधील बहुतेक साऱ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती होत्या. त्यात जवळजवळ सगळ्यांनी आपण प्राणायाम करतो हे सांगतानाच, याचा कोणत्याही देवाशी संबंध नाही अशी पुस्तीही जोडली होती. कम्युनिस्ट बंगालमधील नामवंतांना आपण धार्मिक गणले जाऊ, याची कोण हि धास्ती! भारत हा आध्यात्मिक देश आहे, हि वस्तुस्थिती देशाच्या मुखंडांना मान्य करता आलेली नाही. त्यामुळे प्रच्छन्न समारंभ आणि कर्मकांड धार्मिक विचारांच्या नावावर खपविले जातात. सत्य साईबाबांना 'वर्षा'वर बोलावणे येतात आणि पुणे जिल्ह्यात तसेच आजूबाजूला डुप्लिकेट धर्मस्थळांची रास उभी राहते. तिरुपती बालाजी, शिर्डी, पंढरपूर यांच्या प्रतिकृती एखाद्या मॉलच्या शाखा निघाव्यात तशा निघत आहेत.

गम्मत पहा, शिरगावला शिर्डीच्या नावाखाली एक राजेशाही दुकान काढले तर अर्धा अर्धा पान छापणारे वर्तमानपत्र आध्यात्मिकता शिकवणाऱ्या पुरुषांना मात्र खड्यासारखे दूर ठेवते. नवरात्रात महालक्ष्मी मंदिराचे,  गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीचे छायाचित्र छापणारे किंवा दाखविणारे, या सगळ्याची गरज नसून केवळ स्वतःकडे पहा असे सांगणाऱ्या लोकांना वगळणारच. त्यात त्यांची भौतिक गरज आहे. तुकारामांच्या देहू येथे त्यांच्या मूळ मंदिरात भाविक श्रद्धेने जातात. तिथेच आता थोड्या अंतरावर गाथा मंदिर नावाचे एक मोठे दुकान उभे राहत आहे. संगमरवराच्या या तीन माजली इमारतीत तुकोबांचे अभंग संगमरवराच्याच फारशीत कोरलेले आहेत. जोडीला तुकोबांचा भव्य पुतळा. आयुष्यभर व्यवहार न जमलेल्या तुकोबांनी जवळच्या डोंगरावर जाऊन साधना केली. अशा उंची प्रसादाची गरज असती तर त्यांनी आपल्याकडे चालून आलेल्या शिवाजीसारख्या राजाला मागितले असते. पण नाही. स्वामी तत्वाज्ञानानन्द म्हणाले, सध्या उपभोगवाद वाढत आहे. मोठ्या धर्मस्थळांच्या  प्रतिकृती काय किंवा या गाथा मंदिरासारख्या नवीन रचना काय, या आध्यात्मिकातेत शिरलेल्या उपभोगवादाचेच परिणाम आहेत. हा उपभोगवाद आहे, तोपर्यंत मंदिर-मशीद पडतच राहणार. राजकारण हे त्याचे केवळ एक रूप आहे.
Sunday, November 22, 2009

…अखेर व्हायचे ते झालेच

अखेर व्हायचे ते झालेच. निखिल वागळे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शिवसैनिकांच्या मारामारी स्वातंत्र्याने अतिक्रमण केले. स्वतःच्या मोठेपणासाठी वागळे यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही चोप कसा असतो ते दाखवून दिले आणि शिवसेना अद्यापही शिवसेनाच आहे, ते पाच पंचवीस कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गात हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे राणा भीमदेवी थाटात आश्वासन दिले. (त्यावेळी खरं तर त्या फ्रेममध्ये आबांच्या जवळ विनायक मेटे दिसतात का, याचा शोध मी घेत होतो.शिवाय  छगन भुजबळही कुठे दिसले नाहीत ते.)

आयबीएन-लोकमतवर हल्ला झाला, त्याच संध्याकाळी योगायोगाने पुण्यात मनसेच्या एका नेत्याकडे पत्रकारांचा स्नेहमेळावा जमला होता. तिथे याच घटनेची चर्चा झाली नसती तर नवल. त्यावेळी बहुतेक पत्रकारांचे मत पडले, की वागळे कधी न कधी मार खाणारच होते. त्यांच्या शैलीमुळे महानगरच्या काळापासून शिवसैनिकांची आणि त्यांची सातत्याने गाठभेट होत असे. नव्हे शिवसैनिकांचा मार खाऊनच त्यांनी जिगरबाज पत्रकार अशी स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्यांच्यावर हात साफ करूनच शिवसैनिकांनी स्वतःची हिंस्र प्रतिमा निर्माण केली.

त्यांच्यावर पहिला हल्ला झाला 1991 मध्ये. त्यावेळी विजय तेंडुलकर यांच्यासहित बरीच मोठी मंडळी निषेधासाठी रस्त्यावर उतरली होती. त्यानंतरच्या पाच वर्षांमध्ये महानगरवर अनेकदा हल्ला झाला. मग पूर्वीचा निषेधाचा जोष उतरला. त्यावेळी लोकमतमध्येच आलेले अग्रलेख मला आठवतात. सातत्याने एकाच वर्तमानपत्रावर हल्ले का होतात, अशा प्रश्न त्यावेळी विचारला जाई. वागळे इलेक्ट्रॉनिक माध्यमात आले आणि त्यांच्या धडाकेबाज व आक्रमक शैलीमुळे आयबीएन-लोकमत वाहिनी यशस्वीही झाली. मात्र आक्रमकता वेगळी आणि अहंमन्यता वेगळी, हे त्यांच्या गावी नव्हती. वागळे चर्चेसाठी नेत्यांना बोलावतात आणि त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना बोलू देत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार आहे. सध्याच्या राजकीय नेते भ्रष्टाचारी आहेत, काहिसे अनघड (रॉ) आहेत ही गोष्ट खरी आहे. मात्र म्हणून त्यांना वाटेल तसे सोलून काढण्याची गरज नाही. दुर्दैवाने राजकारणी म्हणजे पंचिंग डॉल आणि त्यांना हवं तसं बोलण्याचा आपल्याला परवाना आहे, असा बहुतेक पत्रकारांचा समज आहे. राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, करण थापर ही यातलीच मंडळी. त्यामुळेच थापरच्या डेव्हिल्स अ़ॅडव्होकेटमधून नरेंद्र मोदी उठून गेलेले गुजराती जनतेत खपून गेले. समोरची बाजू ऐकायचीच नाही, असे ठरवलेल्या लोकांशी आणखी कसे वागणार. वर उल्लेख केलेल्या मनसेच्या नेत्याच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, चॅनेलवाले एखाद्या माणसाला संपवायलाच निघतात. त्या माणसाने केलेले काम, त्याचीही काही बाजू असते हे ऐकायला ते तयारच नसतात.

राहता राहिल प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. ज्यांची मालकी राजकीय नेत्यांकडे आहे, ज्यांच्या प्रकाशनामध्ये विशिष्ठ राजकीय पक्षांची तरफदारी करण्यात येते, एकतर्फी प्रचार हीच ज्यांची ओळख आहे, त्या वर्तमानपत्रांनी हल्ले झाल्यावर मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र आणि विचार स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढावेत हीच मोठी गंमत आहे. दीड महिन्यांपूर्वी सगळी वर्तमानपत्रे जेव्हा राजकीय पक्षांच्या पैशांवर लोकशाहीवर काळी शाई पुसण्यात दंग होती, त्यावेळी यांची ही चाड कुठे गेली होती, ते कळायला मार्ग नाही. (नाही म्हणायला, ज्यांनी पॅकेजसाठी पैसे पुरविले त्यांचेच लेख पॅकेजच्या विरोधात छापून लोकसत्ताने पापक्षालन करण्याच प्रयत्न केला होता. ) पुण्यात काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी असेच माध्यमांच्या नैतिकतेवर भाषण दिले होते. अशावेळी आपलं गप्प बसण्याचं स्वातंत्र्य वापरण्यापलिकडे आपण काय करू शकतो.

सरते शेवटी बाकी शिवसैनिकांनी हा हल्ला करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे अपयश अधोरेखित केले आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात, असे म्हणतात. त्याप्रमाणे आधीच राजकीय पराभवाने गलितगात्र झालेल्या या पक्षाच्या प्रतिष्ठेला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सुरुंग लावलेला आहे. बाळासाहेबांपेक्षा वेगळ्या मार्गाने राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही मोठी चपराक आहे. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेने अनेक पत्रकारांवर हल्ले करून पचविले कारण ते पाप धुवून काढणारे अनेक चांगली कामे शिवसेना करत होती. आता मात्र एकीकडे राजकीय पदांसाठी चाललेली दुकानदारी आणि दुसरीकडे रस्त्यावरील ही गुंडगिरी अशा कात्रीत पक्ष अडकला आहे. एकतर हे पक्षाचे भान सुटल्याचे लक्ष आहे किंवा नियंत्रण तरी सुटल्याचे लक्षण आहे.

…………..

संबंधित पोस्ट

पत्रकाराची प्रतिज्ञा