Sunday, March 28, 2010

सीएम जाए पर बच्चन न जाए!

Amitabh Satakar साहित्य संमेलनाच्या मांडवातून आताच परतलो आहे. पहिल्यांदा चांगली वार्ता. संमेलनाच्या मांडवात प्रचंड म्हणावी अशी गर्दी पुस्तकांच्या दालनात होती. एकीकडे अमिताभ बच्चनचा कार्यक्रम चालू असतानाही दृष्ट लागाव्या अशा उत्साहाने लोकं पुस्तकांची चळत पाहत, न्याहाळत, हाताळत होते. माझ्यासारख्या काकदृष्टी माणसाला हा एक कल्चर शॉक होता. लोकांनी किती पुस्तके विकत घेतली, कोणत्या प्रकारची विकत घेतली हा वेगळा मुद्दा आहे. मात्र मुद्रीत माध्यमं हळूहळू कालबाह्य होत असल्याची समजूत करून घेतलेल्या मला, एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तके पाहण्यासाठी का होईना, येताहेत ही एक धक्कादायक गोष्ट आहे.

बरं, हे नुसतेच पुस्तकांचे दालन नव्हते. पुण्यात पुस्तक प्रदर्शन ही फार मोठी कौतुकाची गोष्ट नाही. मात्र विस्तार, प्रतिनिधीत्व आणि पुस्तकांची संख्या-प्रकार यादृष्टीनेही हे दालन अन्य प्रदर्शनांपेक्षा वेगळे होते. मला खरोखरच आवडले ते.  अगदी राज्य शासनाच्या स्टॉलवरील कन्नड साहित्य परिचय या पुस्तकानेही मला भूरळ घातली होती. मात्र अशा प्रकारची पुस्तके नेटवर सर्रास मिळत असल्याने मी तो मोह टाळला. बाहेर आलो तोवर पडद्यावरचा अभिनयसम्राट खरोखर महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा हा हुकुमी मंत्र आळवून समोरच्यांवर भुरळ पाडण्यात यशस्वी झाला होता.

अलीबाबाच्या गोष्टीत एक शीळा उघडण्यासाठी पासवर्ड होता. तसाच महाराष्ट्रात हे वरील चार शब्द बोलले की  टाळ्यांचा खजिना हमखास. बाहेर वाटेल ते पुरस्कार स्वीकारून महाराष्ट्रात मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे मंत्र्यांना नाचविणाऱ्या म्हाताऱ्या नट्याही हे चारच (त्यापेक्षा जास्त बोलले की पैसे कट!) शब्द बोलून अनेकांना डोलवायला लागतात. “68 वर्षांपैकी 38 वर्षे मी महाराष्ट्रात राहिलो,” हे बच्चन यांचे बोल चॅनेलवर ओथंबून गळायला सुरवात झाली आहे. उद्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर त्याचे ओरखडे दिसू लागतील. चार दशकांत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात शून्य योगदान देणाऱ्या व्यक्तींकडून मराठीचा गौरव ऐकून अंगावर रोमांच उठावेत, इतकी का अमृतात भेसळ झाली आहे? बच्चन महाशयांनी विंदा, ज्ञानेश्वर, एकनाथ अशा अनेकांचा उल्लेख केला. सुरेश भटांच्या ओळी म्हटल्या. कौशल इनामदारांचा सत्कार केला. आयुष्यभर मेकअपमनचं काम केलेल्या कामगाराकडे, कारकीर्दीत मुख्य भूमिका मिळेनाशा झाल्यावर बच्चन महाशयांनी मराठी चित्रपट केला. वरच्या भाषणातील संत-कवींची माहिती लिहून देणाऱ्यास ते पुढेमागे एखादी जाहिरात फुकट करून देतील, अशी अपेक्षा करूया.

जानेवारी फेब्रुवारी 2008 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बच्चन यांच्यावर शरसंधान केले नसते, तर त्यांना ही सगळी महती कळाली असती का? मनसेच्या आंदोलनावेळीस कॉंग्रेसप्रणीत माध्यम व लुडबुडी मंडळी छोरा गंगा किनारेवालाच्या बाजूने होती. त्यामुळेच विनाकारण, संबंध नसताना बच्चन यांना साहित्य संमेलनाची निमंत्रणे गेली. खासदार सुरेश कलमाडी, आमदार उल्हास पवार आणि नगरसेवक सतीश देसाई ही संमेलनाच्या आयोजकांतील कारभारी माणसे पाहिली की हा डाव लक्षात येतो. आयोजकांच्या दुर्दैवाने संमेलनाच्या वेळेपर्यंत सर्वच भूमिकांची अदलाबदल झाली. नायक बच्चन कॉंग्रेससाठी खलनायक झाले. त्यामुळे चव्हाण बिचारे ‘बच्चन के रहना रे बाब’ करत फिरत होते.

अशोक चव्हाण यांची लाचारी आपण एका बाजूस ठेऊया. (त्यांनी जशी लोकलज्जा ठेवली आहे तशी.)  मात्र वांद्रेच्या कार्यक्रमात त्यांनी आडमार्गे उपस्थित केलेला मुद्दा काय चुकीचा होता? सी-लिंकच्या कार्यक्रमात अमिताभला मानाने बोलवावे अशी कोणती मर्दुमकी त्यांनी गाजविली आहे? त्या पुलासाठी त्यांनी काही रक्कम दिली आहे का? संमेलनाहून परतताना बच्चन यांची गाडी जाईपर्यंत गेटवर चेंगराचेंगरी व्हायची बाकी राहिली होती. अनेक वृद्ध लोकांची (व त्यांची संख्या पुण्यात काही कमी नाही) जी काय गत झाली, त्यातून कुठली साहित्यसेवा आयोजकांनी केली. अमिताभला पाहण्यासाठी आलेल्या रसिकांची गुणवत्ता एका उदाहरणात दिसून येते. आपण अग्निपथ ही कविता वाचणार म्हटल्यावर प्रेक्षकांना बच्चन आता ‘अग्निपथ’मधील संवाद म्हणणार असेच वाटले. काय आरोळ्या उठल्या. पुढच्या दोन मिनिटांत मंडपात शांतता! मग आयत्या घरात घरोबा अशी त्यांना वागणूक कशासाठी. चित्रपट अभिनेत्यांनी, त्यातही बॉलिवूडच्या लाडावलेल्या दिवट्यांनी असे काय केले आहे, की समाजाच्या प्रत्येक घडामोडीत त्यांच्या उपस्थितीची आम्हाला गरज भासते आहे. धन्य ते प्रेक्षक, धन्य ते आयोजक आणि धन्य धन्य ते साहित्यसेवक!

7 comments:

 1. Lekhashi purnapane sahamat! Sussphat vichar mandalyabaddal abhinadan. Marathi lokana ya bajar bungyanchi lachari karanyachi kahi garaj nahi he jeva umajel to sudin. Baki tya Bacchan babat kay bolave.. sagalikade tyachi and tyachya sarva kutumbiyanchi upasthiti 'apariharya' ahe ase bhasavnyachi tyachi dhadpad kevilvani disate. Jaya bai ni kahi mahinyapurvich ek marathi dweshte vaktavya karun mafi magayala nakar dila hota he hi Marathi loak visaralele distat..teva sadhya paristhitit tumachya - mazyasarakha vichar karanare loak alpasankhyacha! Lekhabaddal Abhar!

  ~Anonymous

  ReplyDelete
 2. http://marathi-girls-marrying-non-marathis.wikidot.com

  ReplyDelete
 3. “68 वर्षांपैकी 38 वर्षे मी महाराष्ट्रात राहिलो,” हे वाक्य ऐकल्यावर मला तरी अजुन मराठी कस येत नाही असा प्रश्न आला होता. मराठी अभिमान गीत वाचताना अमराठीपण जाणवत होत. आंध्रातील कामगार पुण्यात आल्यावर मराठी शिकलेले मी पाहिलेत. मराठीवर त्यांची रोजी रोटी अवलंबुन असल्याने ते 'आपोआप' झाल. बच्चनच्या बाबत ते संभवत नाही. साहित्य संमेलनात राजकारणाचा मागील दाराने कसा प्रवेश होतो ते मात्र जाणवल. अमिताभचे भाषण संपायच्या आत आम्ही कल्टी मारली. गेटवर चेंगराचेंगरी होईल याचा अंदाज असल्याने आम्ही ती कृती केली.
  अमिताभची भुरळ जनसमूहावर किती आहे याचा प्रत्यय आला.या नशेत लोक आपले दैनंदिन प्रश्न चिसरतात. द भिं ना अमिताभ आपल्या शेजारी बसल्याचे अप्रुप भाषणात सांगावेसे वाटले.
  जय हो!

  ReplyDelete
 4. धन्यवाद, अनामिक. बच्चन साहेबांना महाराष्ट्राचा एवढा पुळका आताच का आला. त्यांची बायको तर सहा महिन्यांपूर्वीपर्यंत हम तो यूपी के है जी, हिंदी में ही बोलेंगे. महाराष्ट्रवाले हमें माफ करें, असं बोलत होती. थोडक्यात म्हणजे पडद्यावरचा अभिनय आपण आता प्रत्यक्षात पाहत आहोत.

  ReplyDelete
 5. @प्रकाशजी,
  38 वर्षे हे साहेब महाराष्ट्रात राहिले मात्र त्यातील 36 वर्षे त्यांना आपण महाराष्ट्रात राहतो, असं कधी वाटलंच नाही. आंध्रातील कामगार कशाला, देहू रोड किंवा पिंपरी भागातील मल्याळी अधिकारी किंवा सिंधी व्यापारी शिताफीने मराठी आत्मसात करतात. त्यांना अडचण येत नाही कारण त्यांना स्वतःला शिकावंसं वाटतं. अशा लोकांना महाराष्ट्रातील संस्था कधी महत्त्व देणार? बरं झालं, तुम्ही कल्टी मारली.
  अमिताभच कशाला, त्याच्या जागी जॉनी लिव्हरला आणलं असतं तरी लोकं असंच भुलले असते. (त्याला किमान दोन वाक्यं मराठी धड तरी बोलता येतात.) कारण लोकांना चित्रपट कलावंत म्हणजे फारच अप्रूप. हाच प्रश्न पडलाय, की समाजात आता आकर्षण शक्ती असणारी मंडळी फक्त चित्रपटांत आहेत का?

  ReplyDelete
 6. मस्त. खुपंच सुंदर. वर्णन खरंच छान केल. संमेलनात मी होतो की काय असा भास झाला. छान!!! आवडल

  ReplyDelete
 7. धन्यवाद, हेरंब. वास्तविक मी फार कमी अवधी होतो मंडपात. पण होतो तेव्हा बरंच काही महत्त्वाचं घडत होतो.

  ReplyDelete