Tuesday, April 20, 2010

मोदी लिपीतील पैशाची भाषा

छायाचित्र सौजन्य: एएफपी
र्म ही अफूची गोळी आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो आणि क्रिकेट हा भारताचा धर्म आहे, या दोन वाक्यांचा लसावि काढला तर, क्रिकेट ही भारतात अफूची गोळी आहे असा निष्कर्ष निघतो. हशीश बाळगल्याबद्दल कोणे काळी अटक झालेले ललित मोदी क्रिकेटच्या धंद्यात कसे काय उत्कर्ष पावले, याचे उत्तर वर काढलेल्या लघुत्तम साधारण विभाजकात आहे. धर्मनिरपेक्ष देशात लोकांना भुलविण्यासाठी प्रस्थापितांनी दोनच अस्त्रे गेल्या दोन दशकात अत्यंत प्रभावीपणे राबविली: पहिले जात आणि दुसरे क्रिकेट. त्यासाठी या नव्या धर्माचे देव आणि देव्हारेही उभे करण्यात आले. पारंपरिक धर्मावर तोंडसुख घेण्याऱ्या अनेकानाही हा नवा धर्म खूपच भावला. गेल्या दशकात त्यात बॉलीवूडचीही भर पडली. धर्म आला की पुरोहित आले आणि पुरोहित आले, की अनाचारही आला. त्यामुळेच स्वतंत्र भारतात एका मंत्र्याला त्रयस्थ बाईशी असलेल्या संबंधावरून राजीनामा देण्याची नामुष्की आली (आपल्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने आळ!) आणि या सगळ्या खेळात पैशांचा तमाशा कसा जोरात चालू आहे, याचे उघड्या डोळ्याने दर्शन होऊनही ना लोकांना त्याची चाड ना लोकशाहीतील राजांना.

या देशातील प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांना दोष देण्याची एक मध्यमवर्गीय फॅशन आहे. त्यामुळे परवा बेन्गुळूरुत स्फोट झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नेहमीप्रमाणे शाब्दिक चकमक सुरु झाली. परंतु केवळ काही मिनिटांमध्ये स्फोट झालेला असताना, पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक जण जखमी झालेला असताना हजारो माणसे क्रिकेट सामन्याचा आनंद (!) घेत होती. जगातल्या अन्य कोणत्याही देशात हे शक्य झाले नसते. अत्यंत वैयक्तिक वर्तणुकीसाठी कलंकित झालेल्या टाईगर वूडसची प्रतिमा खालावल्यामुळे त्याच्या जाहिराती बंद करणाऱ्या कंपन्या आहेत. इकडे या देशात सट्टेबाजांशी हातमिळवणी करून, देशबांधवांशी प्रतारणा करून आणि वर परत 'माझ्या धर्मामुळे माझ्यावर आरोप होत आहेत,' असे आरोप करणारे महाभाग संसदेत निवडून जातात. ज्या देशातले लोक माणसाच्या जिवापेक्षा आयपीएल नामक जुगाराला जास्त महत्व देतात, त्या देशात एक थरूर गेला तरी अनेक पवार असतात. आयपीएलच्या या अफाट आर्थिक शक्तीचे महत्व ओळखल्यामुलेच तर गेल्या वर्षी ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात, निवडणुकांच्या बरोबरीने हा खेळ खेळण्यासाठी पवार साहेबांनी अनुकुलता दर्शविली होती. त्यामुळेच तर अजूनही महाराष्ट्रात आयपीएलवर करमणूक कर लागलेला नाही. पी साईनाथ यांना फक्त पेपरात छापलेल्या जाहिराती दिसल्या. त्यामागचे गौडबंगाल कुठे दिसले होते.

गेली दोन वर्षे आयपीएलच्या संदर्भात माध्यमे, राजकारणी, खेळाडू, बघे आणि धंदेवाले (व्यावसायिक असा कोणाला म्हणायचं असल्यास माझी ना नाही.) यांच्या तोंडी एकच भाषा आहे : पैशाची भाषा. त्यापुढे अन्य सगळी पापे क्षम्य मानण्यात आली. कोटीच्या खाली यायलाच कोणी तयार नाही. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेष आहे म्हणून त्या देशाच्या अनेक गुणवान खेळाडूंना अडीच दशके मैदानापासून दूर ठेवण्यात आले. मात्र भारतीयांची गुलाम मानसिकता जोखून असलेल्या आयोजकांनी चीअरगर्ल्स मधून कृष्णवंशीय मुलींना अलगद बाहेर काढले. वास्तविक पाहता चीअरगर्ल्समुळे खेळावर बंधने येत असल्याने त्यांना मैदानापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न विकसित देशांत होत आहेत. आता नवी मुंबईत उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे म्हणे. याचा अर्थ हे सामने होईपर्यंत सामान्य लोकांच्या सामान्य हालचालींवर निर्बंध येणार. दुभत्या गाईच्या लाथा खाव्या, पण ते दुध काढणाऱ्याने, मलई खाणाऱ्याने.

जर, जोरू आणि जमीन हे अनादी कालापासून सर्व संघर्षाचे मुल आहे, असा म्हणतात. सुनंदा पुष्कर हे पात्र येण्यापूर्वी सगळेच सभ्य लोक वाटून खात होते. थरूर यांनी पहिल्यांदा या मूक आचारसंहितेचा भंग केला आणि एकच हलकल्लोळ उठला. गेली दोन वर्षे जे लोक आपसात बोलत होते ते आता उघड उघड बोलत आहेत. फक्त मोदी आणि थरूर यांच्या बोली भाषा वेगळ्या आहेत. एकाकडे पैसा आहे आणि दुसऱ्याकडे सत्ता. त्यामुळेच तीन वर्षांपासून हा नंगानाच चालू असताना झोपलेले प्राप्तीकर खाते जागे होऊन कोण किती खाते ते शोधायला लागले आहे. या खात्याच्या आणि त्यावर विश्वास असणाऱ्या काही वर्तमानपत्रांच्या म्हणण्यानुसार, सहा महिन्यांपासून ही चौकशी चालू आहे. केवळ मोदींनी थरूरशी पंगा घेतल्यानंतर चॅनेलच्या समोर कारवाई सुरु झाली.

मोडी लिपीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्यातले काना, उकार, वेलांट्या या जाणकारांनाच कळतात. संदर्भानेच त्यांचा अर्थ लागतो. आयपीएलच्या निमित्ताने चालू असलेला खेळ तसाच आहे. त्यात इतक्या लोकांचे इतके हितसंबंध जोडलेले आहेत, की आपल्याला त्यांचा कधीच तळ लागणार नाही.

12 comments:

 1. सहमत आहे.
  या प्रकरणात अनेक प्रश्न आहेत जे बहुधा अनुत्तरितच राहतील. त्यातील काही प्रश्न इथे मांडले आहेत.

  http://mr.upakram.org/node/2425

  ReplyDelete
 2. सहमत आहे, राज. तुमचा उपक्रम वरची चर्चाही योग्य आहे. मी सकाळी पाहिलं तेव्हा नव्हती ती. असो. यात थरूर यांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. त्यांना भ्रष्टाचारापेक्षा माज नडला. आयपीएल ही क्रिकेटची गटारगंगा आहे. ती शुद्ध असण्याचा मुळात प्रश्नच नाही. आम आदमीच्या नावाने राज्य चालविणारी मंडळी, त्यातील एकाचा बळी अगदी उघड दुष्कृत्यासाठी गेल्यानंतर गप्प बसतील हे शक्यच नाही. त्यामुळे ललित मोदींवर गंडांतर येणार हे नक्की. शिवाय या निमित्ताने पवार आणि नरेंद्र मोदी या कोंग्रेसच्या शत्रूंचाही बंदोबस्त होणार ते वेगळेच.

  ReplyDelete
 3. बंगलोरला स्फोट झाल्यावर तिथे मॅच सुरु झाल्याचे ऐकले तेंव्हा मला पण धक्काच बसला होता.
  माणुसकी पुर्ण पणे मेलेली आहे. क्रिकेट हा देशापेक्षा पण मोठा करून ठेवलाय. उद्या बॉर्डर वर युध्द सुरु असतांना पण आपले लोकं मॅचे पहायला गर्दी करतील.
  पुर्वी एकदा नागपुरला स्टेडीयम मधला एक भाग पडला होता, त्यामधे काही लोक्ं मेलें पण होते, तरीही मॅच सुरु ठेवण्यात आली होती.

  इथे दोष कोणाला द्यायचा? मॅच खेळणाऱ्यांना? मॅच अरेंज करणाऱ्यांना - म्हणजे स्फोट झाल्यावरही मॅच कॅन्सल न करणाऱ्या व्यवस्थापनाला?

  की मढ्याच्या छाताडावर बसून पुरण पोळी खाण्याची मानसिकता असलेल्या आपल्य षंढ समाजाला??

  ReplyDelete
 4. देविदास, अगदी मनातलं लिहिलं आहेत. शेवटच्या परिच्छेदात सगळ्याचं सार आहे.
  बॉम्बस्फोट झाल्यावरही तिथे सामना सुरु झाल्याचं आणि लोक त्याचा आनंद घेत आहेत हे ऐकून मीही वेडा झालो होतो असाच.

  ReplyDelete
 5. अगदी खरं आहे, क्रिकेटपुढं काहीही सुचत नाही भारतियांना असेच प्रतित होते आहे...

  ReplyDelete
 6. हेरंब, आनंद, महेंद्रजी,
  तुमच्या प्रतिसादाबद्दल खरोखर धन्यवाद. यातली संवेदना मेलेली माणसे निवडून काढणे खरोखर अवघड आहे. एक चौकी जळाली म्हणून आंदोलन मागे घेणारे गांधीजी जसे या देशात होते, तसे शास्त्रीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एक दिवस उपास करणारे लोकही या देशात होते. मात्र आज सगळेच यात सामिल आहेत. खेळाडूंच्या खेळावर प्रेक्षक नाचताहेत का बेटिंग करणाऱ्या प्रेक्षकांच्या तालावर खेळाडू आणि व्यवस्थापन नाचताहेत, हे न कळण्याइतकी सरमिसळ झाली आहे.

  ReplyDelete
 7. अप्रतिम लेख देविदास. जबरदस्त विवेचन केलंय तुम्ही.

  ReplyDelete
 8. 08/05/2010

  श्री.माननीय मुख्य न्यायधीश

  मुंबई हाय कोर्ट मुंबई

  विषय :- विजेचा क्रिकेट सामन्यातील दुरुपयोग थांबविणे बाबत.

  सन्मानीय न्यायधीश महोदय,

  या जनहित याचिकेद्वारे द्वारे मी आपणास विनंती करतो की आज महाराष्ट्राची विजेची गंभीर समस्या पाहता आणि १० ते १५ घंटे लोडशेडिंग असताना क्रिकेटचे सामने रात्री विजेचा वापर करून विजेची नासाडी करण्यास आपण बंदी घालावी ही विनंती आज प्रत्येक ठिकाणी असे रात्रीचे सामने आयोजित करून वीज नासाडी केली जाते. महाराष्ट्रा शासन MSEB यांना या बाबत प्रतिवादी करावे , ही विनंती.

  सदरील पत्राची जनहित याचिका म्हणून दाखल घेण्यात यावी.ही नम्र विनंती.

  ReplyDelete
 9. ठणठणपाळ साहेब, हे पत्र पाठवून एक महिना होत आला. त्याची दखल घेऊन याचिकेत रूपांतर केलं का नाही? तसं केलं असंल तर ती मोठी आनंददायक गोष्ट असणार आहे.

  ReplyDelete
 10. me and my friends send it through register post but there was no response from high court mumbai.

  ReplyDelete
 11. वाईट आहे. खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं, की एका एक दिवसीय सामन्यात वापरली जाणारी वीज दोन खेडेगावांना वर्षभर पुरेल इतकी असते.

  ReplyDelete