Wednesday, January 6, 2010

पत्रकार दिन; दीन पत्रकार

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर (याबद्दल खरे तर संभ्रम आहे) यांच्या स्मृत्यर्थ आज आम्ही सगळ्यांनी पत्रकार दिन साजरा केला. आम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्यांना वेळ मिळाला, ज्यांना वेळ काढावा लागला अशांनी. त्यात अर्थात मी नव्हतो. जागोजागी मार  खाऊन वर त्याच पत्रकारांना आपल्या धंद्याशी (आता तरी त्याला व्यवसाय म्हणण्याचे पातक करु नको) निष्ठा राखण्याचा उपदेश करण्याऱ्यांना ऐकण्याची काय गरज  आहे.

पुण्यात आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांवरील हल्ले असाच विषय ठेवला होता. त्यात झालेल्या भाषणांचा मतितार्थ काढायचा झाला, तर एवढाच निघेल की मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींपासून बालिशशास्त्रींपर्यंत जोमाने मजल मारली आहे. पगार नाही, सुरक्षितता नाही, साधने नाहीत आणि समाजात आता प्रतिष्ठाही नाही, अशा अवस्थेत पत्रकारांनी आता कोणत्या प्रकारची वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी, हे सांगणाऱ्यांना तरी माहित आहे का याबद्दल शंका आहे. योगेश कुटेवर हल्ला झाला, त्यानंतर त्याच्या बाजूने सेवलेकरचा निषेध करण्यासाठी तोंडदेखले का होईना, राजकारणीच पुढे आले. पत्रकारांना ज्यांचे पाठबळ असावे अशी अपेक्षा आहे ते लोकं कुठे होते?  चार दिवस पुण्यातल्या मोठ्या रस्त्यांवर आमची जमात फलक हाती घेऊन आरडा ओरडा करत होती आणि कुठल्याही व्यवस्थेवर साधा ओरखडीही उमटला नाही. आम्हीच घोषणा द्यायच्या, आम्हीच ऐकायच्या आणि आम्हीच त्याच्या बातम्या छापायच्या, असा मोठा गमतीशीर प्रसंग झाला. त्यानंतर न्यायालयात सुनावणी झाली, तेव्हा ज्यांची उभी हयात गुन्हेगारांच्या कृत्यावर काळा पडदा घालण्यात गेली त्यांनीच पत्रकारिता कशी भरकटली आहे, माध्यमांनी मूल्ये कशी पायदळी तुडविली याच्यावर भाषण दिले.

राज्य मराठी पत्रकार संघाने यंदाच्या दर्पण पुरस्कार सोहळ्यासाठी कोणाला बोलवावे मुग्धा गोडसे. वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर नट्यांचे छायाचित्र छापण्याबद्दल तक्रार करता ना, घ्या, आम्ही नट्यांना आता आमच्यातच सामिल करून घेतो. त्यानिमित्ताने तरी लोक आपल्या समारंभाला येतील, अशी  संस्थेला आशा वाटत असावी. एवीतेवी बहुतांशी वर्तमानपत्रांत सदर आणि लेख लिहिण्यासाठी नेटिव्ह (म्हणजे आपल्याकडे असलेल्या) पत्रकारांऐवजी नट-नट्या किंवा खेळाडूंसारख्या सेलिब्रिटींना मानाचे पान देण्याची प्रथा पडलेलीच आहे. वैचारिक मजकुराऐवजी सध्या चारिक मजकुराला अधिक मागणी आहे. पूर्वी लोक समाजात आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी एखाद्या संपादकाने शब्द टाकावा, लेखणी झिजवावी अशी आशा बाळगायचे. आता पेपरं तुरुंगातून सुटलेल्या साबित गुन्हेगारांकडून आपल्या निष्पक्षपाती पत्रकारितेचे टेस्टिमोनियल घेत आहेत.

खरी गोष्ट अशी आहे, की समाजाला आमची गरज आहे का नाही हेच आम्हाला कळेनासे  झालंय. त्या प्रश्नावर उत्तर शोधण्यापेक्षा हे दिवस घालणे चालू आहे.  हे असे धिंडवडे काढण्यापेक्षा पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्याऐवजी दीन पत्रकार नावाचा तमाशा आयोजित करावा. त्यानिमित्ताने तरी लोकांना पत्रकार ही काय चीज आहे, हे कळेल.

Monday, January 4, 2010

दहावीनंतरची वीस वर्षे

परवा गुगल रिडरच्या सर्वात लोकप्रिय मजकुरांध्ये एक पोस्ट वाचली दहा वर्षांपूर्वीच्या परिस्थितीबद्दल. त्यात बहुशः अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक घडामोडींबद्दल लिहिलेले होते. त्यानंतर आज सहज विचार केला आपणही असा काहीतरी धांडोळा घ्यावा. मात्र दहा वर्षांपूर्वी एकविसाव्या शतकाच्या आगमनाचा विचार करण्यापूर्वी, एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकाचा विचार केला.

तेव्हा लक्षात आले, अरे यंदा मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश करून वीस वर्षे पूर्ण होत आहेत. मॅट्रिक पास होऊन पुढल्या वर्षी वीस वर्षे उलटतील. त्यामुळे पोस्टला शीर्षकही तेच दिले. मात्र खरंच तेव्हाच्या, म्हणजे 1990 च्या घडामोडी आता पाहिल्या तर आता खूप गंमत वाटते. काही वानगी बघूः

 • देशातील दुसरे बिगर काँग्रेसी सरकार पाकिस्तानला इशारे देण्याची पं. नेहरूपासून चालत आलेली परंपरा टिकवून होते. वर्षाच्या सुरवातीस दोन महिने जुने असलेले व्ही. पी. सिंह यांचे सरकार वर्ष संपेपर्यंत इतिहासजमा झाले होते. वर्ष सरता सरता चंद्रशेखर यांचे सरकार सत्तेवर आले आणि जागतिक बँकेकडे सोने गहाण ठेवण्याचे अपश्रेय घेऊन चार महिन्यांनी लयाला गेले.
 • देशात संगणक या शब्दाची चलती झाली होती तरी साधा टेलिफोनही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होता. एसटीडी पीसीओचे पिवळे बोर्ड मुख्य रस्त्यांच्या कोपऱ्या कोपऱ्यावर वाढू लागले होते मात्र त्यांचे दर लक्षात ठेवण्याची कसरत लोकांना करावी लागत होती. रात्री 11 नंतर सर्वात कमी दर असल्याने त्यावेळी संवाद साधण्याची घाई लोकांना करावी लागत असे. काही सरकारी कार्यालयांमध्ये मोठे संगणक दिसू लागत होते. इंटरनेट हा शब्द प्रचलीत होण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी लोटायचा होता. मायक्रोसॉप्टने विंडोज 3.0 बाजारात आणले.
 • महाराष्ट्राच्या तीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाने काँग्रेससमोर कडवे आव्हान निर्माण केले होते. शिवसेना भाजपऩे शरद पवारांच्या नाकी नऊ आणले होते. त्यातही आताचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईतील 130 भूखंडांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा शब्दसमु्च्चय तेव्हा तरुणांमध्ये चलनी नाणे होते. शिवसेनाप्रमुखांचीही तोफ तेव्हा धडाडत होती. त्यावर्षी झालेल्या निवडणुकीत पुणे-मुंबई रस्ता अडीच तासांचा करण्याची ठाकरे यांची घोषणा गाजली. ती पूर्ण करण्यासाठी आणखी नऊ वर्षे लागली.
 • फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने निसटत्या बहुमताने निवडणूक जिंकली. लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसला हा मोठा धक्का होता. देश में काँग्रेस हारी है, अब महाराष्ट्र की बारी है ही तेव्हाची घोषणा होती. शरद पवार यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. निवडणुकीनंतर मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते म्हणून नेमल्याने भुजबळ रुष्ट झाले. त्याची परिणती पुढे त्यांनी शिवसेना सोडण्यात झाली.
 • सध्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव पचवून राज्यसभेवर नियुक्ती मिळवली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते.  या दोघांनी वर्षाच्या शेवटी पवार यांच्या विरोधात बंड केले. सुमारे 13 दिवसांच्या नाट्यानंतर ते बंड अयशस्वी झाले. मात्र त्यानंतर 95 साली झालेल्या निवडणुकीत विलासरावांना पराभवाच्या रुपाने या बंडाची किंमत चुकवावी लागली. मुख्यमंत्री पदावर डोळा असलेले नारायण राणे व आर. आर. पाटील पहिल्यांदाच विधानसभेवर निवडूऩ आले.
 • राष्ट्रीय पातळीवर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढून हवा निर्माण केली. त्यांच्या या यात्रेला बिहारमध्ये अडवून लालूप्रसादांनी कडी केली. तोपर्यंत केवळ नऊ मुलांचे बाप एवढी ओळख असलेल्या लालूंनी स्वतःची ओळख निर्माण केली. तिकडे अडवाणींनी या यात्रेच्या बळावर पक्षाचे पारणे फेडले.  दोन आकडी असलेली पक्षाच्या लोकसभेतील सदस्यांची संख्या त्यांनी तीन आकड्यांवर नेली. त्यातून पुढे बाबरी मशिदीचे रामायण घडले.
 • कोका कोलाला भारतातून हद्दपार केल्यानंतर 20 वर्षांनी पेप्सीला सरकारने परवानगी केली. पेप्सी  आणि सेव्हन अप यांनी भारतात धुमाकूळ घालायला सुरवात केली तरी ती प्रसिद्धीपुरती. पारलेच्या थम्स अपने पेप्सीला पाय रोवण्याची फारशी संधी दिली नाही. मात्र पाच वर्षांनी कोकच्या आगमनानंतर पारलेने दाती तृण धरले.
 • झोंबी या कादंबरीसाठी आनंद यादव यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
 • 63 वे साहित्य संमेलन पुण्यात झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण हे संमेलनाचे अध्यक्ष होते.
 • व्ही. शांताराम यांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले.
 • डॉलरचा भाव 31 रुपयांच्या जवळपास होता. पुढच्याच वर्षी सरकारने रुपयाचे दोनदा अवमूल्यन केले. त्यामुळे हा भाव 37 ते 40 रुपयांच्या जवळपास पोचला.
 • 27 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर नेल्सन मंडेला यांची फेब्रुवारी महिन्यात सुटका झाली.
 • 8 जुलैला पश्चिम जर्मनीने शेवटचा फुटबॉल विश्वचषक जिंकला. त्यानंतर तीन महिन्यांच्या आत, 3 ऑक्टोबर रोजी  पश्चिम आणि पूर्व जर्मनीचे एकीकरण झाले व 94 साली एकसंघ जर्मनी स्पर्धेत उतरला.
 • सद्दाम हुसेन यांनी बहुचर्चित आणि शेवटी त्यांच्या ऱ्हासास कारणीभूत ठरलेले कुवैतवरील आक्रमण याच वर्षात केले. 2 ऑगस्ट रोजी इराकचे रणगाडे कुवैतमध्ये शिरले. त्यानंतर जॉर्ज बुश यांनी त्यांच्या पाडाव करण्याचा विडा उचलला. धाकट्या बुश महाशयांनी ते काम 16 वर्षांनी पूर्ण केले. सद्दाम यांच्या आक्रमणानंतर पहिल्यांदाच भारताला पेट्रोल टंचाई काय असते, याचा अनुभव आला. त्यावेळी पेट्रोल बचतीच्या जाहिरातींचा मारा सुरू झाला. आर्थिक उदारीकरणानंतर काही वर्षे त्या नाहिशा झाल्या. याच वेळेस कुवैतमधून भारतीय लोकांनी भरलेली खास विमाने येण्यास सुरवात झाली.
 • लोकांच्या मनोरंजनाची जबाबदारी खासगी वाहिन्यांनी उचलण्यास आणखी अवकाश होता. त्यामुळे दूरदर्शनचे राष्ट्रीय केंद्र आणि मुंबई केंद्र इतरांची नक्कल करण्याऐवजी स्वतःच्या हिकमतीवर कार्यक्रम सादर करत होते.