Wednesday, January 27, 2010

भारतीय भूमीवरील ब्रिटिश गोपालक

एडमंड पायपरएडमंड पायपर यांना भेटण्यापूर्वी केवळ एक ब्रिटीश व्यक्ती मंचरला गाईंचा गोठा सांभाळण्या साठी आला आहे, हीच आमची कल्पना होती. पायपर यांच्याशी तासभर गप्पा मारून निघाल्यानंतर शेती, पशुपालन आणि व्यावसायिकता यांच्याबद्दलच्या अनेक नव्या कल्पनांनी आमची झोळी भरून गेली होती. अनेक प्रकारची नवी माहिती मिळाली होती. भारतीय शेतकऱ्यांचे दुखणे कुठे आहे, याची अंधुकशी कल्पना आली होती. तसेच भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे, मला काहीही माहित नसताना वाटायचे सगळे माहित आहे आणि जसजसे कळत गेले तसतसे जाणवत गेले, की मला काहीही माहित नाही.

गोवर्धन फार्मगेल्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, दररोज चाळीस टन चीज बनण्यासाठी 'गोवर्धन'ला लागणारे दूध पुरविले जाते ते मंचरजवळच असलेल्या एका फार्मवर सांभाळलेल्या गाईंपासून. 'लोकमत'मध्ये पायपरबद्दल आलेली एक त्रोटक बातमी वाचून आम्ही तिथे गेलो होतो. आमच्यादृ्ष्टीने ही एक रंजक घटना होती. त्यात रंजक काही नसून व्यावसायिकता आणि वैज्ञानिक माहितीचे ते एक उपयोजन होते, हे कळाले पायपर यांच्याचकडून.

शेतीविज्ञानात पदवी घेतल्यानंतर पायपरनी मायदेशी इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी कामे केली. लहानपणापासून शेतावर राबल्यामुळे शेतातच काम करण्याची आवड होती. इंग्लंडमधील यंत्रणेमुळे आणि लाल फितीच्या कारभारामुळे पायपरला कंटाळा आला आणि स्वारी निघाली पोलंडला. तिथून हंगेरी, सौदी अरेबिया बहारिन आणि जॉर्डन अशी यात्रा करून पायपरची  स्वारी भारतात आली. शहा यांनी 'गोवर्धन’च्या उत्पादनांसाठी ऑऱ्गॅनिक फार्मिंगचे प्रमाणपत्र मिळण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी डेअरी व्यवसायातील आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन करण्यासाठी त्या प्रकारचे ज्ञान असणारी व्यक्ती हवी होती. त्यातून आधी मायकेल नावाच्या एकाची आणि दीड वर्षांपूर्वी पायपर यांची निवड करण्यात आली.

“मला केवळ काम म्हणून करायचे असते, प्राण्यांवर माझं प्रेम नसतं तर इथं एक क्षणभरही थांबलो नसतो,” पायपर म्हणाले. कारण सुमारे तासभर जनावरांच्या पालनाबाबत मांडलेली भूमिका आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचे असे काही गणित मांडले होते, की गाय म्हणजे त्यांना केवळ कच्चा माल वाटतो की काय अशी शंका मला आली होती. 2300 गाई आणि सुमारे शंभरेक कालवडी सांभाळणाऱ्या पायपरना विचारलं, की कालवडींना पिंजऱ्यात का ठेवलं आहे तर ते म्हणाले, कारण त्या उद्याच्या गाई आहेत. त्यांना काहीही इजा होऊ द्यायची नाही यावर त्यांचा कटाक्ष आहे. ते अशा थराला, की कालवडींना देण्यात येण्याऱ्या खाद्यावर माशा बसू नयेत, म्हणून ते झाकून ठेवण्यात येतं. त्यामुळे त्या प्राण्यांवर त्यांचे प्रेम आहे का नाही हा प्रश्न मला सतावत होता.

भाग्यलक्ष्मी फार्म, मंचर सुमारे तेवीसशे गाईंना तसेच कालवडींना स्वतंत्र क्रमांक देण्यात आला आहे. त्यांच्या अंगावर एक चिप बसविण्यात आली आहे त्यातून त्या गाईवर संगणकाद्वारे लक्ष ठेवण्यात येते. या गाईने किती खाद्य घेतले, तिच्य़ापासून किती दूध मिळाले, तिला कोणता आजार आहे का, तिच्यात आजाराचे काही लक्षणं आहेत का, हे सगळं त्या एका चिपच्या साहाय्याने पाहण्यात येतं. एवढंच नाही तर एखाद्या गायीने दिलेल्या दुधाचे तापमान जास्त असलं तर काहीतरी गडबड आहे, हेही त्या संगणकाच्या साहाय्याने कळतं. पन्नास गाईंचा एक गट अशा रितीने रोलर पार्लर नावाच्या यंत्रावर चढवून पाच मिनिटांत दूध काढण्यात येतं. या सगळ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पायपर साहेबांवर आहे.

ते हे काम काटेकोरपणे करत आहेत, याची चुणूक आमची गाडी भाग्यलक्ष्मी फार्ममध्ये प्रवेश करतानाच मिळाली. फाटकाजवळच जीपवर जंतुनाशकाचा फवारा करण्यात आला. त्यानंतर कालवडींच्या गोठ्यात जातानासुद्धा जंतुनाशक मिसळलेल्या पाण्यात पाय बुडवूनच आत प्रवेश करावा लागला. गायींचे दूध यंत्राद्वारे तीन वेळेस काढण्यात येते. ते पाहण्यासाठी खास प्रेक्षागृह केलेले आहे. तिथेच पायपर आणि आमचा संवाद झाला. आधी काहीसा आखडू वाटणारा हा माणूस नंतर एवढा खुलला, त्याला आवरताना आमच्या नाकी नऊ आले होते.

“भारतात सर्वाधिक गायी आहेत, पशुधन आहे. मात्र जगात प्रति गाय दुधाचे उत्पादन सर्वात कमी आहे. याचं कारण इथल्या लोकांना दिलेली चुकीची माहिती आणि काळानुसार न बदलणे,” हे त्यांचं निदान होतं. एकावेळी पाच पाच हजार गाईंचे गोठे सांभाळण्याऱ्या माणसानं ते सांगितलं म्हणजे खरंच असणार.

“ब्रिटनध्ये माणसांना पगार खूप द्यावा लागतो. त्यामुळे तिथे एवढा फार्म चालविण्यासाठी दोन किंवा तीन माणसे पुरतात. तुमच्या इथे माणसं मुबलक मिळतात. शिवाय त्यांना अनेक कामं करायला आवडत नाहीत. एक माणूस एकच काम करू पाहतो. गाई ढकलायला एक माणूस आणि मशीन चालू करायला दुसरा माणूस कशाला पाहिजेत? गाईंना एवढे आजार होतात त्यांच्यासाठी आम्हाला लसीसुद्धा मिळत नाहीत. फक्त तीन लसी घेण्यासाठी सरकारी परवानगी देत. इथं एवढ्या माशा आहेत, किडे आहेत त्यामुळे गाईंना खूप सांभाळावं लागतं. आता आम्ही इतक्या कडेकोट वातावरणात गाईंना ठेवलंय आणि त्यासाठी गुंतवणूक केलीय. पण सगळेच ते करू शकतील असं नाही,” त्यांचं सांगणं चालू होतं.

तिथे काम करणाऱ्या माणसांनी सांगितलं, की पायपर यांना जुजबी मराठी येतं. त्याच्या साहाय्याने त्यांनी हाताखालच्या माणसाला अगदी तयार केलंय. एका सहाय्यकाकडे बोट दाखवून ते विचारू लागले, “हाच माणूस जर जनावरांच्या खुराकाकडे लक्ष देऊ शकला, त्यांच्या बारीक सारीक बदलांकडे लक्ष ठेवू लागला, वेळेवर सगळी निरीक्षणे घेऊ शकला तर डॉक्टरची गरजच पडणार नाही. डॉक्टरचे काम फक्त आजारी प्राण्यावर उपचार करण्यापुरतेच राहतील. प्राण्यावर लक्ष ठेवण्याचं, रोगाचं निदान करण्याचं काम हाच माणूस करेल ना.” हे धोरण काहीसं सफल झालं असावंही कारण फार्मवर ठेवलेल्या कालवडींपैकी फक्त एक टक्का कालवडींचा मृत्यू झाला. शिवाय भारतात कालवडींचा वाढीचे सरासरी प्रमाण दररोज तीनशे ग्राम असताना या कालवडींचा वाढीचे प्रमाण दररोज नऊशे ग्राम आहे.

हा माणूस इतक्या दूर का आला असवा? हाच प्रश्न विचारला असता पायपरचे उत्तर होते,  “मला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला आवडते. तिथली संस्कृती जाणून घ्यायला आवडते. दर दिवशी नवीन काहीतरी जाणून घ्यायला आवडते. शेवटी थेअरी सगळीकडे सारखीच असते. प्रात्यक्षक वेगवेगळे असतात. मी याच्यापेक्षाही उष्ण देशांमध्ये राहिलेलो आहे. त्यामुळे मला इथं फारसं वेगळेपण जाणवत नाही.”

फार्मजवळच्याच एका बंगल्यात पायपर राहतात. त्यांना कोणीतरी विचारलं,  “तुम्हाला इथं चर्च नाही मग कसं करता?” त्यावर त्यांचं उत्तर होतं, “माझा देव चार भिंतीच्या आत नाही. तो सगळीकडे आहे. त्यामुळे मला चर्चमध्ये जाण्याची गरज नाही. ”

Monday, January 25, 2010

दुग्धं दर्शयामि चीजं दर्शयामि

तयार झालेले चीज बाहेर पडताना “हे पहा, इथून दूध येतं, हे पहा, इथं त्याचं दही होतं. या टाकीत दही कडक करून त्याचे तुकडे पाडतात. पहा, इथून चीजचे तयार ब्लॉक बाहेर पडतात,” मिश्रा साहेब आम्हाला सांगत होते आणि आम्ही ‘वा वा’, ‘ओ हो’ करून वेळ मारून नेत होतो. त्या असंख्य नळ्या, नळ आणि टाक्या पाहून झाल्यानंतर लक्षात काय राहिलं असेल, तर सर्वात आधी दूध असतं आणि सर्वात शेवटी त्याचं चीज होतं.  हे एक सत्य शिकणं, यातच आमच्या बुद्धीचे चीज झाल्यासारखं आहे.

गोवर्धन या ब्रॅण्डने दुग्ध उत्पादन करणाऱ्या पराग मिल्क यांचा चीज उत्पादनाचा प्रकल्प मंचरजवळ आहे. आशियातील चीजचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. कंपनीचे मालक देवंद्र शहा यांच्या आदेशावरून मिश्रा साहेब आम्हाला अख्खा प्रकल्प फिरवून दाखवत होते. त्यात दूध कुठं जमा होतं, कोणत्या टाक्यात जातं, किती डिग्रीवर उकळतं, हे सगळं कसं स्वयंचलीत आहे, कुठंही माणसाचा हात लागत नाही हे ते यथासांग सांगत होते. मात्र आमच्या टाळक्यात त्यातलं काही जाईल तर शप्पथ. बरं, हे त्यांना सांगता येईऩा. पत्रकार म्हणवून घेतात स्वतःला आणि इतकंही काही समजत नाही, असं त्यांना वाटण्याची शक्यता. मग त्यातल्या प्रत्येक गोष्टीला ‘मम’ म्हणण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच काय होता?

यंत्रांच्या जंजाळातील चीजचे उत्पादन एक तर त्या सगळ्या आसमंतात दुधाचा वास पसरला होता.  मला त्या वासाने काहीसं अस्वस्थ व्हायला होत होतं. त्यात ते अगडबंब नळकांडे पाहिल्यावर काहीसं खट्टू व्हायला होतं. त्यात दुधाच्या पदार्थांबद्दल आमची पाटी अगदी दुधासारखीच पांढरी शुभ्र. त्यामुळं स्लाईसचं चीज आणि पिझ्झाचं चीज याच्यात काय फरक असतो हे आम्हाला कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्या अधिकाऱ्यांनी बिचाऱ्यांनी आपली कामं सोडून आमची ट्यूशन घ्यावी, अशी अपेक्षा तरी कशी करणार. त्यामुळे मुकाट्यानं ते जे सांगत होते ते ऐकून घेण्यापलिकडे आम्हाला काम नव्हते.

त्या तासाभराच्या धड्यानंतर लक्षात राहिलं एवढंच, की या कारखान्यात दिवसाला चाळीस टन चीजची निर्मिती होते आमि त्यासाठी चार लाख लिटर दूध दररोज लागतं. हे दूध साठवण्यासाठी तीन टाक्या बाहेर उभ्या केलेल्या आहेत. टॅंकरमधून सरळ या टाक्यांत दूध जातं आणि तिथून ते गरम होण्यासाठी जाते.  साधारण 30 अंश सेल्सिअस तापमानाला आल्यानंतर एका ठिकाणी 26 मिनिटांत त्याचं दही करण्यात येते. (विरजणासाठी वापरलेले पावडर डेन्मार्कहून आयात करण्यात येतं-मिश्रा) पुढच्या एका टाकीत या दह्यातील पाणी आणि मुख्य पदार्थ वेगवेगळे केले जातात. अगदी रवाळ स्वरूपात असलेल्या या मुख्य पदार्थाचेच नंतर चीज तयार केले जाते.  त्यातील एक चीज मोठ्या ठोकळ्यांच्या स्वरूपात कापले जाते आणि दुसरे पुढे पाठवून पिझ्झासाठीचे (बहुतेक मोझ्झेरेला) चीज तयार केले जाते.

Cheese storage शीतगृहात साठवलेले चीजगोवर्धनच्या ब्रॅण्डखाली अनेक उत्पादन तयार केले जातात. मात्र त्यातील मुख्य आहे चीजचे. महिन्याला 480 टन चीजच्या उत्पादनापैकी साधारण 320 टन कोरियाला निर्यात करण्यात येते.  आम्ही गेलो तेव्हा प्रकल्पाचे काही बांधकाम चालू होते. मात्र मिश्रा आणि त्यांचे सहकारी अगदी भरभरून आम्हाला कारखाना दाखवत होते. उत्पादनच नाही तर स्टोरेजसुद्धा. “आपको सिमला-काश्मीर देखना है,” असं विचारत त्यांनी कोल्ड स्टोरेजचा दरवाजा उघडला. एक सेकंदात उणे तापमानाची शिरशिरी पायांपासून सुरू होऊन अंगभर पसरली. तिथे अगदी चीजचे भांडारच ठेवलेले. बाहेरच्या जगात दुध टंचाई आणि दुधाच्या दरवाढीवर चर्चा चालू होती आणि तिकडे आम्ही दुधाचे भांडार बघत होतो.  त्या दुधाच्या स्रोताबद्दलच आम्हाला उत्सुकता होती. त्याबद्दल पुढच्या पोस्टमध्ये…