Monday, February 14, 2011

मुंह देखने वालों के लिये जाम नही है...

मुंह देखने वालों के लिये जाम नहीं है

मासूम फरीश्तों का ये काम नहीं है...

प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या आवाजातील ही गझल. ती ऐकताना वेगळ्या संवेदना निर्माण होत असल्या तरी गेल्या आठवड्यात इजिप्तमध्ये झालेल्या घडामोडींमुळे या ओळी परत आठवल्या.

अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी पदत्याग केला आणि इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगमुळे इजिप्तमध्ये क्रांती झाल्याचे यच्चयावत प्रसारमाध्यमांनी जाहीर करून टाकले. जणू काही इंटरनेट नसते तर इजिप्तमध्ये भावना आणि आकांक्षा दडपलेल्या हजारो युवकांनी स्वतःची शक्ती दाखवून देण्याची संधी कधीही मिळाली नसती.

तहरीर चौकात गर्दी करणाऱ्या असंख्य युवकांना आंतरजालावरील आवाहनामुळेच तेथे उपस्थित राहण्याचे बळ मिळाले, हे मलाही मान्य आहे. मात्र त्या युवकांचे चौकात उपस्थित राहणे, हेच या रक्तविहीन क्रांतीचे इंगित होय, असंही मला वाटतंय.

इजिप्तच्या युवकांएवढेच दडपशाहीला तोंड देणारे जगात अनेक युवक आहेत. त्या त्या देशांच्या सरकारांना हात न लावता त्यांना सोशल नेटवर्किंग करणेही शक्य आहे. लोकशाही आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमध्येही बायडू सारखी संकेतस्थळे आहेतच. मात्र आपल्या देशात चाललंय ते अत्यंत हीन आहे आणि त्याचा पाडाव केलाच पाहिजे, ही ऊर्मी निर्माण होणं अधिक महत्त्वाचं आहे. ही ऊर्मी निर्माण झालेली नसेल, तर शेकड्यांनी सोशल नेटवर्किंग स्थळांवर खंडीभर बायटी उधळूनही क्रांतीतर सोडाच, साधी राजकीय घडामोडही होऊ शकत नाही हे भारताच्या स्थितीवरून दिसून येतं.

मुंबईत २६ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या वेळेस काय कमी क्षोभ झाला होता? त्यावेळी भारतात ऑनलाईन क्रांती झाल्यासारखीच परिस्थिती होती. इजिप्तवर केवळ हुकूमशहाचीच दडपशाही होती. इथे तर आपल्यातूनच फुटून निघालेल्या परकीयांनी आपल्या सत्ताधाऱ्यांच्या नेभळटपणाचा आणि भोंगळपणाचा फायदा उचलून हल्ला केला होता. त्यावेळी फेसबुक किंवा ऑर्कूटसारख्या संकेतस्थळांवर निषेध उतू जात होता. त्याचे पुढे काय झाले?

एसी केबिनमध्ये बसून निषेधाच्या गप्पा केल्याने किंवा राजकारण्यांच्या नावाने खडे फोडल्याने क्रांती होत नसते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान वर्तमानपत्रे ही आजच्या आंतरजालाप्रमाणेच माध्यम म्हणून मान्यता पावत होती. त्यावेळी वर्तमानपत्रांनी बजावलेली भूमिका आजच्या फेसबुकपेक्षा काही कमी नव्हती. त्यामुळे आंतरजाल असो वा नसो, क्रांती योग्य ती जागा पाहूनच जन्म घेते. याच क्रांतीच्या दरम्यानचे एक प्रसिद्ध चित्र, Liberty Leads Itself, हे या संदर्भात मोठे अन्वर्थक आहे.

LIbert Leads Itself…फ्रेंच राज्यक्रांती दरम्यानचे अन्वर्थक चित्र. सौजन्यः dipity.com

त्यामुळे इजिप्तमध्ये क्रांतीची दखल करताना आणि तेथील सत्तांतराचे स्वागत करतानाच, केवळ आंतरजालामुळे हे घडले नाही, तर लोकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन जीवाची बाजी लावल्याने हे घडल्याचे लक्षात घ्यावेच लागेल. नसता आज ५-७ टक्के असलेला भारतातील आंतरजालाचा वापर दहा पट वाढला म्हणजे क्रांती होईल, असा वावगा आशावाद जन्माला येईल.

5 comments:

 1. प्रत्यक्षात लोक सहभागाविना काही बदल शक्य नाहीत. इंटरनेट हे एक सूत्र आहे पण अखेर सूत्रधारही लागतातच!

  ReplyDelete
 2. खर सांगायचे तर आपल्या वर्तमान पत्रांचे मिडियाचे किती वार्ताहर इजिप्त मध्ये प्रत्यक्ष युद्ध भूमीवर हजर होते हा एक चर्चेचा विषय आहे. येथे बातम्या छापून आणि दाबून ठेवून पैसा मिळत असताना युद्ध भूमीवर कोण जीव धोक्यात घालेल राज्यकर्त्यांच्या वाटमारीत सहभागी झालेला हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आज पेड न्यूज च्या विळख्यात अडकला आहे. यामुळे याच्या कडून क्रांतीची अपेक्षा ठेवण चूक आहे. आता राहिला महाजालाचा प्रश्न.आपण म्हणता त्या प्रमाणे एसी केबिनमध्ये बसून विकासाचे फायदे मिळालेला हा वर्ग आपले महाजाल वर काम करत पेम, कविता कथा विनोद वाड्मय यापलीकडे जग आहे याचा विचार करू शकत नाही. आणि कोणी हे करत असेल तर त्याची टिंगल टवाळकी करत हे लोक स्वतः: ला धन्य समजतात. क्रांती चा इतिहास पाहील्यास ध्येय असलेला वर्गच क्रांती करू शकतो. यशस्वी राज्यक्रांतीचा वणवा जेव्हा केव्हा भडकतो तेव्हा तो अशाच प्रतिशोध घेणार्‍या हौतात्म्याच्या जळत्या चितेतील आगीनेच भडकतो. आम्ही आमचे कर्तव्य करणार - मग इतर कोणी मागे येवो वा न येवो ! क्रांत्या ह्या गणितातल्या बेरीज - वजाबाकीने चालत नसतात, तर हृदयातील अवसानाच्या अतर्क्य बलाने विजय पावतात.- (१९४९ पू.पी., स.सा.वा. १ : ३१सावरकर ) इजिप्तच्या क्रांती मागे अमेरिकेचे हितसंबंध सुद्धा कारणीभूत आहेत. USE AND THROUGH ही अमेरिकेची राजनीती कुप्रसिद्ध आहे.

  ReplyDelete
 3. @सविता
  अगदी बरोबर. आंतरजालामुळे कदाचित संदेशवहन जलद झाले असेलही, पण क्रांतीमागचे खरे कार्यकारण ही जीवंत माणसेच असतात.
  @ठणठणपाळ,
  इजिप्तमध्ये वार्तांकनासाठी कोणी गेलेले नव्हते हे खरे आहे. मात्र महाराष्ट्र टाईम्ससारख्या वृत्तपत्रांनी तेथे राहणाऱ्या मराठी माणसांकडून लिहून घेतलेले वृत्तांत छापलेच की. त्यांनी पाठविलेल्या मजकूरात खरोखर आंतरजालावर कमी भर होता आणि नागरिकांना भोगाव्या लागलेल्या कष्टांची जंत्री अधिक होती. कार्यालयात किंवा घरातील संगणकावर इजिप्तच्या बातम्या वाचून, आंतरजालामुळेच या घडामोडी शक्य झाल्याचे आपल्याकडे चित्र रंगवण्यात येत आहे.

  ReplyDelete
 4. माणसांशिवाय क्रांती शक्यच नाही.. 'फेसबुक क्रांती' म्हणणं अतिशयोक्तीपूर्ण आहेच, पण दिशाभूल करणारंही आहे... बहुतेक ह्यातही व्यापारिक हितसंबंध जोडलेले असू शकतात!

  ReplyDelete
 5. खरं आहे विश्वनाथ. माणसांशिवाय-पेटून उठलेल्या माणसांशिवाय-कुठलीही क्रांती शक्यच नाही. यात व्यापारिक हितसंबंध असतीलही, पण त्याहून जास्त माध्यमांचे नवखेपण आणि आंतरजालाने हुरळलेल्या लोकांचा भाबडेपणा अधिक कारणीभूत आहे.

  ReplyDelete