Saturday, September 10, 2011

देव(स्थान) धनाचा भूकेला?

हाच तो तिरुपतीला दान देण्यात आलेला मुकूट.  
सौजन्यः http://thatskannada.oneindia.in
देवाच्या दारात पातकी आणि पापभीरु माणूस, असा काही भेद नसतो. मात्र देवासाठी म्हणून माणसांना अर्पण केलेल्या वस्तुंना अर्पण करण्याऱ्या माणसांच्या कर्माचा डाग लागावा की नाही. हा प्रश्न उपस्थित झाला आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात. कर्नाटकातील खाण माफिया म्हणून बदनाम असलेल्या जनार्दन रेड्डी आणि त्यांच्या भावामुळे ही समस्या उभी राहिली आहे आणि तिरुमला तिरुपती देवस्थानाने तिचा निकालही लावून टाकला आहे. रेड्डी बंधू कितीही कलंकीत असले, तरी त्यांनी दिलेल्या रत्नजडीत सोन्याच्या मुकुटाचा अव्हेर करण्यास देवस्थानाने नकार दिला आहे.

रेड्डी बंधूंचे नशीब जोरावर होते आणि बेळ्ळारीतील खाणींमधून अमाप धन ते कमवत असताना, दोन वर्षांपूर्वी, या भावांनी पैसेवाल्यांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजीला ३० किलो वजनाचा, अडीच फूट उंचीचा आणि ४५ कोटी रुपयांचा एक मुकुट अर्पण केला होता. गेल्या आठवड्यात रेड्डी बंधूंच्या कमाईचा घडा भरल्यानंतर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) त्यांना अटक केली. त्यानंतर या कलंकीत माणसांनी दिलेला मुकूट त्यांना परत करावा, अशी मागणी आंध्र व कर्नाटकातील काही राजकारणी आणि तिरुपतीच्या भक्तांनीही केली.

आज, शनिवारी, तिरुपती तिरुमला देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली. त्यात हा मुकूट परत करण्यास विश्वस्तांनी साफ नकार दिला. "तिरुपतीला दिलेला कुठलाही अलंकार परत करण्याची रीत नाही. जनार्दन रेड्डी यांनी दिलेल्या देणगीलाही हाच नियम लागू आहे," असे देवस्थानाच्या अधिकाऱ्यांनी आज जाहीर केले आहे. रेड्डी बंधूंना अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भक्तांनी तिरुमला तिरुपती देवळाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली होती.

गाळि जनार्दन रेड्डी, त्यांचे भाऊ आणि कुटुंबाने हा एकच मुकूट अर्पण केलेला नाही. आंध्र, कर्नाटक आणि तमिळनाडूतील मिळून एकूण ३२ निरनिराळ्या देव-देवतांना या भावांनी अर्पण केले आहेत. ज्या ज्या वेळी वाय. गंमत म्हणजे रेड्डी बंधूंवर कारवाई न केल्याबद्दल भाजपला दूषणे देण्यात येत असली, तरी वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या राजकीय कारकीर्दीला समांतर असे हे मुकूट देण्यात आले आहेत. वर उल्लेख केलेला ४५ कोटींचा मुकूट हा ब्रह्मणी स्टील्स या कंपनीला वायएसआर यांनी परवानगी दिल्यानंतर देण्यात आला होता. वायएसआर व त्यांचा मुलगा जगनमोहन यांच्या निवडणूक विजयानंतरही देवतांना मुकूटाची खैरात वाटण्यात आली.

पक्षांची आणि राज्यांची सीमा ओलांडणारे असे श्रीमंत भक्त असल्यावर त्यांना हात लावण्याची कोणाची टाप होणार? एवढ्या काळानंतर आणि एवढ्या दानानंतरही, चंचलगुडा कारागृहात हे दोन बंधू गेलेच कसे, हे फक्त तिरुपतीचा बालाजीच जाणे!

2 comments:

  1. रेड्डी बंधू सारखे अनेक भ्रष्ट्र माफिया या भारतात प्रत्येक धर्मात आहेत, जे आपल्या पापात देवाला भागीदार करून घेतात . तिरुपतीच्या संचालकांना नैतिकतेशी कांही देणेघेणे नाही यामुळे त्यांनी पापाचा मुकुट परत करण्यास नकार दीला. या तिरुपती, शिर्डी,अजमेर, लालबागचा राजा चे स्तोम माजवून जनतेला लुबाडण्याचे पद्धतशीर कारस्थान चालू आहे, आपण याला कीती बळी पडायचे हे आता ठरवणे आवश्यक आहे. याला रोखण्यास भारतात कोणताही कायदा नाही. गुप्त दानाअंतर्गत काळा पैसा देणगी देण्याच्या प्रथेवर कायद्याने बंधन आणावे आणि कोणत्याही धर्मातील संस्थाना ,देवालयाना गुप्त दान घेण्यास बंदी घालावी. तसेच या देवालयाना मिळणाऱ्या दानावर कांही टक्के कर लावावा. यांना ऑडित सक्तीचे करावे. दर ५ वर्षांनी नवीन देखरेख मंडळ स्थापन करावे. एकदा संधी दिल्यावर आयुष्यात परत संधी देऊ नये. तरच या पापाच्या भागीदारीला आळा बसेल.

    ReplyDelete
  2. सूचना चांगल्या आहेत, ठणठणपाळजी. मात्र त्यांची अंमलबजावणी कशी आणि कोण करणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हा खरा प्रश्न आहे.

    ReplyDelete