Sunday, July 13, 2014

कावळ्याच्या हाती दिला कारभार...

r r patil काही वर्षांपूर्वीची स्थिती होती - महाराष्ट्रात एखादी वाईट गोष्ट घडली किंवा आगळीक घडली, की लोक म्हणायचे, महाराष्ट्राचा बिहार करणार का. कारण महाराष्ट्र हे तेव्हा शांत व विचारी राज्य मानले जायचे तर बिहारमध्ये जंगल राजसारखी परिस्थिती होती. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जायची आणि पुण्याची ख्याती केवळ राज्याचीच नव्हे तर देशाची शैक्षणिक राजधानी अशी होती. भिवंडीत मोहल्ला समितीचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या सुरेश खोपडे यांना देशभरात मान होता तर अरविंद इनामदार आणि ए. ए. खान यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नावे आदराने घेतली जात होती.

त्यानंतर एखाद दुसरे दशक उलटले असेल नसेल. आज बिहारमध्ये काही समाजविघातक गोष्ट घडली, तर तेथील लोक कदाचित म्हणत असावेत, 'अरे आपल्याला बिहारचा महाराष्ट्र करायचा आहे का?' लोकसभेच्या जागांच्या बाबतीत उत्तर प्रदेशाच्या खालोखाल असणारा महाराष्ट्र कायदाविहीनतेच्या बाबतीतही उत्तर प्रदेशाच्या खालोखाल यावा, हा योगायोग अत्यंत वाईट म्हणायला पाहिजे.

इंटरपोलने नोटीस काढलेल्या चार्ल्स शोभराजसारख्या गुन्हेगाराला पकडणारे मधुकर झेंडे यांच्यासारखे अधिकारी एकेकाळी महाराष्ट्रात होते. आज त्याच महाराष्ट्राच्या पोलिस खात्याची परिस्थिती एवढी वाईट झाली आहे, की पोलिसाचीच गाडी चोरून समाजकंटक, राष्ट्रविरोधी शक्ती ती गाडी पोलिस स्थानकाच्याच बाहेर ठेवतात आणि तीत स्फोट घडवून आणतात. त्यानंतर तपास चालू आहे आणि दहशतवादी हल्ला झाला या साचेबद्ध विधानांव्यतिरिक्त पोलिसांकडून काहीही येत नाही.

नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना पकडल्याची बतावणी करून पोलिस अधिकारी दुसऱ्याच गुन्हेगारांना उभे करतात आणि त्याबद्दल राज्याचा गृहमंत्री त्यांचा सत्कार करण्याची बात करतो. कै. नरेंद्र दाभोलकर ही काही अगदीच सामान्य व्यक्ती नव्हती. समाजात बऱ्यापैकी मान्यता असलेले त्यांचे व्यक्तीत्व होते आणि सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेशी जातकुळी सांगणारी त्यांची विचारसरणी होती. त्यांच्या खुनाला एक वर्ष व्हायला आले, तरी मारेकऱ्यांना पोलिस पकडू शकलेले नाहीत. न्यायालयाला अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे लागले. सामान्य व्यक्तींशी संबंधित गुन्ह्यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको.

थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात तसे छोट्या छोट्या गुन्ह्यांच्या बाबतीत पोलिसांची अक्षमता सिद्ध झाल्यावर अट्टल गुन्हेगारांनी वर्दीवाल्यांची पत्रास न बाळगता धुडगूस घालावा, यात नवल कुठले? आझाद मैदानावर पोलिसांना मारझोड करणाऱ्या आणि महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्या गुंडांना केवळ ते मुस्लिम असल्यामुळे सोडण्यात येते. मग हिंदु राष्ट्र सेना नावाने गुंडांची टोळी चालवणारा माणूस पुण्यात राजरोस खंडणीखोरी करतो आणि त्याची माणसे सरळ सरळ दिसेल त्या माणसाचे मुडदे पाडतात. याचा अर्थ एक तर त्यांना कायद्याचा धाक नाही, आपले कोणी वाकडे करणार नाही याची त्यांनी खूणगाठ बांधली आहे किंवा हे कृत्य करण्यासाठी त्यांना कोणीतरी मोकळे रान दिलेले आहे. पोलिसांचा खाकी गणवेष हा जरब दाखविण्यासाठी नाही तर केवळ टिकाऊ व मळखाऊ कापड म्हणून असतो, असा समज होण्याची वेळ आली आहे.

आर. आर. पाटील या माणसाने गृहमंत्री पदावर आल्यापासून पद्धतशीरपणे पोलिस दलाचे खच्चीकरण केले आहे. निष्क्रियतेला सज्जनता आणि नाकर्तेपणाला नैतिकता म्हणण्याची पद्धत दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत आपल्याकडे रुढ झाली आहे. त्यामुळे पोकळ भाषणबाजी करत आला दिवस ढकलणाऱ्या पाटील यांच्यासारख्या व्यक्तीचे फावले. तोंडपाटीलकी हा शब्द त्यांच्यावरूनच निघाला असावा, असे वाटण्याइतका त्यांच्या या प्रवचनबाजीचा अतिरेक झाला आहे.

आतापर्यंत पाटील यांच्या किमान पाच-सहा कार्यक्रमांना वा पत्रकार परिषदांना मी उपस्थित राहिलो आहे. कधीही पाटील यांनी समाधानकारक, मुद्देसूद व अभ्यासू उत्तरे दिले आहेत, असे आठवत नाही.

कोणतीही घटना घडली आणि त्यावर प्रश्न विचारला की मान वेळावत आणि चेहऱ्यावर जमेल तितका बालिशपणा आणत, "मला याची माहिती घ्यावी लागेल. ती माहिती घेऊन आम्ही कडक कारवाई करू. कोणाही दोषी व्यक्तीची गय केली जाणार नाही," ही ठराविक वाक्ये फेकायची या पलिकडे कोणतेही कौशल्य आर. आर. पाटील यांनी दाखविलेले नाही. राज्यात एकीकडे हाहाकार उडालेला असला तरी यांना काहीही माहीत नसते आणि अधिकाऱ्यांकडून त्यांना सतत माहिती घ्यायची असते. हे सातत्य अन्य एखाद्या क्षेत्रात कौतुकास्पद ठरले असते. मात्र इथे अनेकांचे जीव जातायत. किती जणांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. अज्ञानात सामावलेला आनंद गवसलेला असा माणूस शोधून सापडणार नाही. तो हुडकून काढल्याबद्दल पाटील यांचे मालक शरद पवार यांचा महाराष्ट्र कृतज्ञ आहे. (पवार काका - पुतण्याबद्दल पाटील यांची वक्तव्ये पाहता ते पवार यांना नेते नव्हे तर मालक मानतात, असे मानायला पूर्ण वाव आहे.)

भांडारकर संस्थेवरील हल्ला असो, मुंबईवरील हल्ला असो, दिवे आगर येथील सुवर्ण गणपतीचा मुखवटा चोरी गेलेला असो किंवा ब्राह्मण व मागासवर्गीय जातींबाबत प्रक्षोभक लिखाण केलेल्या पुरुषोत्तम खेडेकराच्या पुस्तकाचे प्रकरण असो, आर. आर. पाटील यांचा तोच 'घेतला वसा टाकणार नाही, कोणतीही कृती करणार नाही' हा बाणा कायमच असणार. यांच्या कारकीर्दीत पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणीही येऊन मारुन जाते, बाया-बापड्यांच्या सोनसाखळ्या दिवसाढवळ्या चोरल्या जातात, तुरुंगातील कैदी फरार होतात किंवा आपसात मारहाण करून एकमेकांचे खून पाडतात, यांच्या कारकीर्दीत पोलिस आमदारांना मारतात आणि आमदार पोलिसांना मारतात, दलितांवर अत्याचारावर अत्याचार घडतात, अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून मारले जाते पण यांची शांती ढळत नाही. तेवढ्याच शांतचित्ताने हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहणारे त्यांचे मालक उलट त्यांना उत्तम कामगिरीचे प्रशस्तीपत्रक देणार आणि त्याच्या जोरावर यांचे चार वाक्यांचे एकपात्री प्रयोग आणखी चालू राहणार.

'कावळ्याच्या हाती दिला कारभार त्याने घाण करून भरला दरबार' अशी एक म्हण मराठीत आहे. त्याचा अर्थ कोणाला पाहायचा असेल, तर आर. आऱ. पाटील यांच्या कारकीर्दीवर नजर टाकली तरी पुरेल.

4 comments:

  1. याला केवळ आर आर च जबाबदारआहेत का ??? साक्षात लष्कर प्रमुखाला जरी महाराष्ट्राचे गृहमंत्री केले तरी परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही एव्हढी भयानक स्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण देशात . या देशात्तील एकतरी गुन्ह्याचा तपास धडपणे लागल्याचे उदाहरण देता येईल का ???? याला जबाबदार आपण RR पेक्षा जास्त जबाबदार आहोत असे आपणास वाटत नाही का???? आणि RR वर राजकीय पक्षान पासून ते धार्मिक अंतकवाद्याचे प्रचंड दडपण आहे त्याचे काय ???? आपण अखेरीस लिहिलेलेच खरे आहे (पवार काका - पुतण्याबद्दल पाटील यांची वक्तव्ये पाहता ते पवार यांना नेते नव्हे तर मालक मानतात, असे मानायला पूर्ण वाव आहे.)आणि पवाराना डोक्यावर कोणी बसवले…… ???? आपणच ना …… याचा सुद्धा विचार ……… करणार का नाही …। सर्वच राजकीय पक्ष गुंडांच्या टोळ्या झाल्याचा हा परिणाम आहे .

    ReplyDelete
  2. ठणठणपाळजी, पोलिस खात्याचे प्रमुख म्हणून आर. आर. पाटील यांनी कोसळणाऱ्या कायदा व सुव्यवस्था परिस्थितीची जबाबदारी घेतलीच पाहिजे. राजकीय-आर्थिक गुन्ह्यांतील आरोपी देशभरात सर्वत्र मोकळे फिरत असल्याचे तुम्ही म्हणता ते खरे आहे, परंतु मंगळसूत्र चोरीपासून वाहतूक व्यवस्थेच्या धिंडवड्यापर्यंत सामान्य परंतु गंभीर परिणाम होणाऱ्या गुन्ह्यांचे काय? देशात सर्वत्र एव्हढी वाईट परिस्थिती नक्कीच नाही. रस्ते अपघातात महाराष्ट्राचा क्रमांक देशात सर्वाधिक आहे. वाहने चोरीत तेच. शेवटी पोलिसांची गाडी चोरून पोलिस ठाण्यात स्फोट घडवून आणण्यात आला. आमदार पोलिसांना नि पोलिस आमदारांना मारण्याच्या घटना देशात केवळ दोन राज्यात घडल्या आहेत - महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. या परिस्थितीला लोकच जबाबदार आहेत हे खरेच. कारण लोकांनीच आर. आर. पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून दिले.

    ReplyDelete
  3. धन्यवाद

    ReplyDelete