Thursday, May 28, 2015

घुमानच्या निमित्ताने– 4 हरमंदिर साहिबच्या पवित्र प्रांगणात

Golden Temple Amritsar

अमृतसरला पोचल्यानंतर पहिल्यांदा बसस्थानकावरच राहण्याची खोली घेतली. येथील बस स्थानकावर सामान ठेवण्याची आणि खोलीची चांगली सोय आहे. भाड्यानुसार खोलीचा दर्जा बदलतो. नाही म्हणायला हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) आणि अन्य गुरुद्वाऱ्यांच्या यात्री निवासांमध्ये राहण्याची सोय होते, परंतु मी ऐकले, की एकट्या व्यक्तीला सहसा तिथे जागा मिळत नाही. म्हणून असा खासगी निवासाचा मार्ग पत्करावा लागला. चेन्नई, म्हैसूर अशा ठिकाणी मी ही सोय पाहिली आहे. बस स्थानकावरच राहण्याची सोय उपलब्ध असते. आपल्याकडे मला मुंबईचे माहीत नाही परंतु अन्य शहरात तरी अशी सोय मला दिसली नाही. पुण्यात तर बस स्थानकांचाच पत्ता नाही तिथे राहण्याचा काय ठावठिकाणा?

अमृतसरला आल्यानंतर पाहण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे हरमंदिर साहिब. सुवर्ण मंदिर या नावाने ते अधिक प्रसिद्ध आहे. ते शिखांचे उपासनामंदिर आहे, प्रसिद्घ पर्यटनस्थळ आहे आणि सांस्कृतिक केंद्रही आहे. शहरातील एका भव्य तलावाच्या मध्यभागी वसले आहे. वास्तविक या तलावामुळेच या शहराला अमृतसर हे नाव मिळाले आहे. ज्या तलावातील पाणी अमृत आहे तो अमृतसर. शिखांचे चवथे गुरु रामदास यांनी या शहराची स्थापना केली. तेव्हा या शहराला रामदासपूर असे नाव होते. या गुरुद्वाऱ्याचा उल्लेख स्थानिक लोक हरमंदिर साहेब, दरबार साहेब, हरिमंदिर अशा नावांनीही करतात. 

शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिब पहिल्यांदा या मंदिरात ठेवला गेला. एखाद्या गुरुद्वाऱ्यात गुरु ग्रंथसाहिब ठेवणे याला प्रकाश होना असे म्हणतात. तर गुरु ग्रंथसाहिबचा पहिला प्रकाश पहिल्यांदा येथे प्रकट झाला. त्यामुळे या मंदिराला शीख संप्रदायात सर्वोच्च स्थान आहे. गुरु रामदास यांनी त्याचा पाया घातला. विशेष म्हणजे गुरु रामदास यांनी एका मुस्लिमाच्या हातून पायाचा पहिला दगड रचला. पुढे पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी १५८८–१६०७ दरम्यान त्याचे बांधकाम पूर्ण केले. नंतर वेळोवेळी सभोवतीच्या प्राकारातील वास्तूत बदल होत गेला. मात्र मूळ मंदिराची रचना होती तशीच आहे. 

Golden Temple Amritsar
हरमंदिर साहिबची वास्तू चौरस असून सांडवा किंवा साकवावरुन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मुंबईच्या हाजी अलीची आठवण यावेळी येते. सध्या तेथे भलीमोठी रांग लागते आणि भक्तांना किमान दोन तास वाट पाहावी लागते. मला स्वतःला दोन तास लागले आणि घुमान येथे भेटलेल्या काही जणांनी अडीच-तीन तास लागल्याचेही सांगितले. नुसता वेळच लागत नाही तर या रांगेमध्ये चांगलीच रेटारेटी आणि ढकलाढकली चालू असते. एखाद्या हिंदू मंदिरातील स्थितीची आठवण करून देणारा हा गोंधळ असतो. त्यामुळे हरमंदिर साहिबपर्यंत पोचणे हा मोठाच अवघड प्रसंग ठरतो.

मंदिराची मूळ वास्तू दुमजली आणि त्यावर घुमट अशी आहे. येथे भव्यता कमी आणि पवित्रता जास्त आहे. मुख्य म्हणजे एवढी मोठी वास्तू सोन्याची असल्यामुळे ती झळाळीच डोळ्यांने पारणे फेडते. त्यामुळे भव्यता कमी असली तरी चालून जाते. मंदिराला चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. 

अहमदशहा अब्दाली याने या मंदिरावर विध्वंसक हल्ला केला होता. पुढे शिखांच्या बाराव्या मिस्लने मंदिराची झालेली पडझड दूर करुन पुनर्बांधणी केली. महाराजा रणजितसिंग यांनी मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता त्याची पुनर्बांधणी संगमरवरी दगडात केली व कळस तांब्याच्या पत्र्याने मढवून त्याला सोन्याचा मुलामा चढविला. (नांदेड येथील गुरुद्वाराही महाराजा रणजितसिंह यांनीच बांधून घेतला आहे.) तेव्हापासून ते सुवर्णंमंदिर म्हणून ख्यातनाम आहे.  शिखांच्या संदर्भातील सर्व निर्णय घेणारे ‘अकाल तख्त’ हरिगोविंद यांनी मंदिरासमोर बांधले आहे. मंदिराच्या परिसरात अनेक लहान गुरुद्वारे आहेत. त्यांत शिखांच्या ऐतिहासिक शौर्यगाथा दर्शविणाऱ्या धातूंच्या तबकड्या लावल्या आहेत. त्यावर वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत.

2 comments:

  1. अमृतसर चे सुवर्ण मंदीर च नव्हे तर काश्मीर पासून केरळ पर्यंतची गुरुद्वारे भव्यता कमी आणि पवित्रता जास्त अशीच आहेत ही मंदिरे… , तेथील गरिबां पासून ते अमीर नागरिकांचा सेवाभाव , चप्पल सांभाळण्या पासून ते फरशी धुणे , साफसफाई हि कामे अत्यंत भक्तिभावाने केली जातात . त्यांना स्वच्छ भारत सारख्या दिखाऊ अभियानाची कधी ही गरज भासली नाही . मंदीराची रचनाच अशी असते की मंदिरात भरपूर प्रकाश उजेड , प्रवेश करतानाच पाय आपोआप धुतल्या जातात . सर्व भाविकांना समान वागणूक ….

    ……… या पार्श्वभूमी वर आपली मंदीरे…… माफ करा तुलना करतो म्हणून …. देवाच्या पाया पडतांना मनात चप्पल चोरीला जाण्याची सतत भीती असते … आणि इतक्या घाण अस्वच्छ,कुबट, सडक्या नारळाच्या , तेला तुपाच्या दुर्गंधीत अंधाऱ्या जागी देव कसा राहतो? ते देवच जाणे. पगारी सेवेकरी , विश्वस्त मंदीराची साफसफाई करण्या पेक्षा भाविकांनी देवाला भक्तीभावाने दीलेले दान च सफाईने हडप करण्यात व्यस्त असतात . पुजारी भाविकाच्या दाना कडे लक्ष ठेवून त्या प्रमाणे भक्ताला प्रसाद देत असतात २ - ३ दिवसात लाखो भाविक कसे दर्शन घेत असतात हे गाणी मला कधीच समजले नाही . .…… म्हणूनच मी मंदीरात जाणेच सोडून दिले . हातातील कामे प्रामाणिकपणे करणे हीच देवपूजा हे मी माझ्या पर्यंत धोरण आखले .

    ReplyDelete
  2. धन्यवाद, ठणठणपाळ जी
    गुरुद्वाऱ्यांच्या तुलनेत हिंदूंचीच काय, ख्रिस्ती सोडून अन्य धर्मियांचीही प्रार्थनास्थळे खुजी वाटतात, हे खरे आहे . सेवाभाव आणि भौतिक जीवन यांची सांगड शीख धर्मासारखी अन्य कोणालाही जमलेली नाही, हेच खरे.

    ReplyDelete