Tuesday, June 2, 2015

घुमानच्या निमित्ताने-5 भिंडराँवालाचा गुरुद्वारा!

Gurudwara यातीलच एक गुरुद्वारा जर्नैलिसिंग भिंडराँवाला (भिंद्रनवाले) याचाही आहे. पंजाबमध्ये खालसा चळवळ जोरात होती, त्यावेळी या भिंडराँवाला आणि त्याच्या हस्तकांच्या कारवायांमुळे सुवर्णंमंदिर बदनाम झाले होते. ६ जून १९८४ रोजी भिंडराँवालाचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार लष्कराने‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ राबविले. त्यावेळी मंदिराचे बरेच नुकसान झाले. यात भिंडराँवाला मारला गेला. परंतु त्याच्या अनुयायांनी त्याच्या स्मृत्यर्थ एक गुरुद्वारा बनविला आहे.

हा गुरुद्वारा केवळ तीन वर्षांपूर्वी (2012) बांधला आहे. आधी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्थळ बनविण्याची योजना होती. पण केंद्र सरकारने घेतलेला आक्षेप,काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेली टीका आणि लेफ्ट. जन. (निवृत्त) कुलदीपसिंग ब्रार व केपीएस सिंग गिल यांच्यासारख्यांनी केलेला विरोध, यामुळे स्मृतिस्थळाऐवजी गुरुद्वाऱ्यावरच काम भागले.

हरमंदिर साहिबला जाण्यासाठी जी रांग लागते त्या रांगेच्या बाजूलाच हा गुरुद्वारा आहे. भिंडराँवालाला येथेच गोळ्या घालून मारण्यात आले, असे म्हणतात. 'काँग्रेस सरकारने राबविलेल्या मोहिमेत शहीद झालेले जर्नैलिसिंग भिंडराँवाला' असा या गुरुद्वाऱ्याच्या पायथ्याशी शिलालेख आहे.

इतकेच कशाला, सुवर्णंमंदिराच्या प्रवेशद्वाराशी शिखांचे संग्रहालय असून त्यात शीख हुतात्मे, लढाया आणि इतिहास यांची माहिती आहे. त्यातही भिंडराँवालाचे गुणगान गायले आहे. मात्र त्याची फिकीर करण्याची गरज वाटली नाही. कारण मी पाहिले, की गुरुद्वाऱ्यात जाणारे भाविक भिंडराँवाला किंवा खलिस्तानबाबत फारशी आस्था बाळगून जात नाहीत. हरमंदिर साहिबच्या प्राकारातील सर्व उपासना स्थळ त्यांना पवित्र वाटतात. त्यामुळे तिथे डोके टेकवून ते जातात. याच प्रांगणात एक बोराचे झाड असून त्यात दैवी शक्ती आहे, असे मानतात. त्या झाडाची लोक जशी पूजा करतात तशीच या गुरुद्वाऱ्यात माथा टेकतात.

दमदमी टाकसाळ किंवा भिंडराँवाला किंवा खलिस्तान अशा बाबींशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. एकीकडे भिंडराँवालाला हुतात्मा बनवून हळूच त्याच्या आंदोलनाची हवा काढण्याची उत्तम राजकीय चाल भारतीय सरकारने खेळली आहे. कारण या गोष्टी उभारण्याची परवानगी दिली नसती, तर विनाकारण खलिस्तान्यांच्या हाती कोलीत मिळाले असते आणि ती नसती डोकेदुखी ठरली असती. तीन वर्षांपूर्वी सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या दिवशी झालेली तलवारबाजी डोळ्यांपुढे आणली, तर कल्पना येईल की काय गहजब झाला असता.

ते असो. पण हरमंदिर साहिबमध्ये फिरताना दोनदा शिरा खाल्ला. गुरुद्वाऱ्याचा प्रसाद म्हणून नांदेडला असताना हा शिरा कितीदा तरी खाल्लेला. आता येथे परत तीच चव, तोच तुपकट ओशटपणा आणि तोच सुगंध. शुद्ध आटीव तुपाचा घमघमाट ल्यालेला हा शिरा हातातून तोंडात टाकण्याची इच्छाच होत नाही. या शिऱ्याच्या बदल्यात शीख धर्म स्वीकारण्याची अट असती तर तीही मान्य केली असती, इतकी त्याची लज्जत भारी. घास न घेता या शिऱ्याचा मुटका ओंजळीत घेऊन त्याचा सुवासच घेत राहावा, अशी इच्छा होत राहते. मात्र त्याही मोहावर विजय मिळवून त्याला गिळंकृत केले.

याच्या जोडीला नांदेडहून आलेली एक यात्रा आणि घुमानला जाण्यापूर्वी आलेले अनेक लोक, असे बहुतांश मराठी लोक त्याचवेळेस हरमंदिर साहिबमध्ये आलेले असल्याने अवतीभवती मराठी स्वर कानावर पडत होते. येथे परत काळ आणि वेळेची गल्लत होऊ लागली. मी कुठे आहे? अमृतसर का नांदेड? आणि पुण्याचे काय झाले? या मधल्या १८ वर्षांचे काय झाले? असे प्रश्न पडू लागले.

3 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. http://thanthanpal.blogspot.in/2010/02/blog-post_02.html

  इंदिरा गांधीने अकाली दलाला नष्ट करण्यासाठी पाकीस्थान सरहददीवर असलेल्या संवेदनशील पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले General Vaidya Shridhar Vaidya Shridhar Vaidya became the 13th Chief Of Army Staff of the Indian Army . In 1984, he planned Operation Blue Star. या करता त्यांना निवृत्ती नंतर अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. पण महाराष्ट्रने याचे कधी राजकारण केले नाही .
  http://thanthanpal.blogspot.in/2011/10/blog-post_06.html
  कॉंग्रेस च्या कृपेने ८० च्या दशकात भिंदरवाला नामक भस्मासुराच्या दहशद वाद्याच्या टोळ्यांनी पंजाबात मोठ्या प्रमाणात दहशदवाद माजवला होता. आणि भारतात सर्वात प्रगतीशील असलेले हे राज्य कित्येक वर्ष मागे फेकले गेले. अखेर परीस्थिती हाताबाहेर गेल्यावर भारतीय सैन्याची मदत घेत आणि सुवर्ण मंदीरावर सैनिक कार्यवाई करत भिंदरवाल्याचा त्याच्या साथीदारांचा खातमा केल्यावरच हा दहशदवाद संपला. पण पुढे इंदिरा गांधी आणि जनरल वैद्य या ऑपरेशन ब्लू स्टार प्रमुख यांची ही आहुती या दहशतवादा आगीत पडली. स्वतःच उभ्या केलेल्या भस्मासुराला मारण्याची आणि इंदिरा गांधीच्या खुनाचा सुद्धा गैरवापर कॉंग्रेस आज पर्यंत स्वार्था करता करत आली.

  ReplyDelete
 3. होय, ठणठणपाळजी. अमृतसरचे सुवर्ण मंदिर आणि जन. वैद्य यांचे बलिदान हे अभिन्नपणे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यांची स्मृती कधीही जाणार नाहीत. काँग्रेसच्या राजकारणाचे हे अत्यंत विषारी दुष्परिणाम होत.

  ReplyDelete