Tuesday, January 3, 2017

आता तो पुतळा परत बसवू नका…!

“बाष्कळ बडबड ऐकून चित्ती हास्याचे ध्वनी उठतात, अन् आतडी तुटतात!”


छत्रपती संभाजी उद्यानातून उखडलेला हाच तो राम गणेश गडकरी यांचा पुतळा


ज्या राम गणेश गडकरी यांनी वरील वाक्य लिहिले, त्यांच्याच पुतळ्यावर उन्मत्त जातीयवाद्यांनी हल्ला केला. त्यांचा पुतळा उखडून टाकून नदीत टाकला. अन् वर ही एक मर्दुमकी असल्याची व त्यामागे तर्क असल्याचा दावाही केला. ‘रिकामपणची कामगिरी’ लिहिणाऱ्या लेखकावर नियतीने केलेला हा काव्यगत अन्यायच होय. आता जे कोणी निर्णय घेणारे असतील, त्यांनी एक करावे…तो पुतळा परत त्या जागी बसवू नये. नव्हे, कुठेच बसवू नये आणि सत्ताधारी जातींशिवायच्या अन्य कोणत्याही जातीची चिन्हे सहजगत्या दृष्टीस पडतील, असे करू नये.


खरे तर ‘संभाजी ब्रिगेड’सारख्या उपद्रवी माकडसेनेला कला, साहित्य, संस्कृती अशा तैलबुद्धीच्या गोष्टीत रस नसल्याचा सर्वसाधारण समज होता. पुतळे, इमारती आणि तोडफोड यातच त्यांना गम्य असल्याचे लोक मानत होते. मात्र गडकऱ्यांच्या एका नाटकात छत्रपती संभाजी यांचा अपमान केल्याचे कारण देऊन त्यांनी एका पुतळ्याला आपले लक्ष्य केले. या निमित्ताने ही मंडळी नाटके वगैरे वाचत असल्याचेही कळाले. त्यामुळे आता अभिजनांच्या इतिहासाचे पुनर्लेखन झाले, तसे साहित्याचेही पुनर्लेखन होईलच. शंका नसावी.


नालंदा विद्यापीठावर जेव्हा तुर्की-अरबी आक्रमकांनी (कुतबुद्दीन ऐबकचा सेनापती बख्तियार खिलजी) हल्ला केले, तेव्हा तेथील समृद्ध ग्रंथालयाला चूड लावण्यास ते सरसावले. त्यांना रोखण्याचा काही भिक्खूंनी प्रयत्न केला, तेव्हा आक्रमकांनी त्यांना सांगितले, “या पुस्तकात कुराणाच्या विरोधात काही लिहिले असेल, तर ते टिकण्याच्या लायकीचे नाही. ते नष्ट झालेच पाहिजे. अन् जर ते कुराणास अनुकूल असेल, तर त्यांची गरजच नाही. कारण जे काही ज्ञान पाहिजे, ते कुराणातच मिळू शकते. त्यामुळे तसेही ते व्यर्थच आहेत.”


संभाजीसारख्या महापुरुषांच्या नावावर उच्छाद मांडणाऱ्या आजच्या टोळ्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जे आम्हाला नको, ते प्रतिकूल असल्यामुळे आणि जे आमचे आहे, ते स्वतंत्र कशाला पाहिजे, या मानसिकतेतून ही विध्वंसयात्रा निघाली आहे. आधी ब्राह्मण, मग धनगर, मग अन्य जाती असे करत आता ही यात्रा चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या स्थानकावर आली आहे. (गडकरी यांना सीकेपी असल्याचा अभिमान होता आणि त्यांनी चिंतामण लक्ष्मण देशमुखांचे कौतुक त्याच दृष्टीने केले आहे.) गडकरी हे कदाचित ब्राह्मण असल्याच्या समजातूनच त्यांनी हा उच्छेद केलेला असावा, परंतु पुरेसे पुस्तक वाचल्यामुळे (किंवा फक्त इतिहासश्रीमंत पुस्तकेच वाचल्यामुळे) फसगत झाली असावी. आता या फसगतीला कोणी बामणी कावा म्हणू नये, एवढीच अपेक्षा.


ही यात्रा अशीच पुढे चालू ठेवावी, अशी समस्त ब्रिगेडियांना शुभेच्छा आहेत. त्यांना अधिकाधिक काम मिळावे, म्हणून हजारो कोटी रुपये खर्चून राज्य सरकार नव्या पुतळ्यांची निर्मितीही करत आहे. त्यामुळे त्यांना भविष्यातही कधी रोजगार कमी पडणार नाही, याची खात्री बाळगावी. फक्त तो पुतळा पुन्हा त्या जागी बसवू नये. अन् कुठेच बसवू नये, कारण ब्रिगेडींच्या पुढच्या पिढ्यांना त्याच त्या पुतळ्यांना उखडण्यासाठी पुन्हा-पुन्हा श्रम करावे लागतील. त्यात त्यांचे श्रम अनाठायी खर्ची पडण्याचा संभव आहे. शिवाय त्यामुळे राज्यातील व खासकरून पुण्यातील अन्य जातींच्या इतर पुतळ्यांची तोडफोड मागे पडण्याची शक्यता आहे.


इतिहासाची नवी जाणीव निर्माण करायची, तर अशी नासधूस करणे फार फार महत्त्वाचे असते. खासकरून विधानसभा किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलेला असणे, अशा प्रसंगी ही जाणीव व्यक्त करणे अत्यंत महत्त्वाचे असते. ते काम जोमाने झाले पाहिजे. ब्रिगेडींच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा. अन् ब्रिगेडींच्या या मूर्तिभंजनावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या पुरोगामी, वैचारिक, विवेकवादी, प्रागतिक, लिबरल इ. सर्व निवडक बोलभांडांना अनेकानेक धन्यवाद!