Sunday, April 19, 2020

किमान साधूंचे तरी श्राप घेऊ नका

गोष्ट आहे ९ नोव्हेंबर १९६६ ची. देशभरातील साधू आणि संत दिल्लीतील संसद भवनाबाहेर जमले होते. ब्रिटिश काळापासून चालू असलेली गोहत्येची प्रथा बंद व्हावी अशी त्यांची मागणी होती. तशी ही मागणी जुनीच होती. परंतु 'विज्ञान'वादाचा टेंभा मिरवणाऱ्या नेहरूंच्या काळात ही मागणी पूर्ण होणे शक्यच नव्हते. मात्र फेब्रुवारी महिन्यात सत्तेवर आलेल्या इंदिरा गांधी यांनी गोवधबंदीचा कायदा करण्याचे वचन देऊनच सत्ता हातात घेतली होती. त्यामुळे त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी साधूंचा अपेक्षा होती. 
सत्तेवर आल्यानंतर मात्र इंदिराजींनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे साधू समाज संतप्त झाला होता. संसदेचे अधिवेशन सुरु होते. त्यामुळे सगळे साधू तिथे जमा झाले होते. हा कायदा झाला नाही तर संसदेला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या साधूंचे नेतृत्व करत होते करपात्री महाराज. प्रत्यक्षात इंदिराजींच्या आदेशावरून या साधूंवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात अनेक साधू मारले गेले (सरकारी आकडा ८) तर शेकडो जखमी झाले. संसद भवानाबाहेरचा रस्ता जखमी साधू आणि मृतदेहांनी भरून गेला होता. हा प्रकार इतका भयंकर होता, की गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी राजीनामा दिला. 
त्या दिवशी तिथी होती गोपाष्टमी. या दिवशी गाईंची पूजा करण्यात येते.
त्या साधूंचे मृतदेह उचलता उचलता करपात्री महाराजांनी इंदिरा गांधींना शाप दिला, "या साधूंची शरीरे जशी छिन्नविछिन्न झाली तसाच तुझा होईल. तुझा निर्वंश होईल आणि तो गोपाष्टमीलाच होईल." त्यानंतर १४ वर्षांनी संजय गांधीचा अपघाती मृत्यू झाला. तिथी होती दशमीची. त्यानंतर चार वर्षांनी खुद्द इंदिराजींची हत्या झाली. त्यादिवशी तिथी होती गोपाष्टमी. नंतर सात वर्षांनी राजीव गांधी यांची हत्या झाली. त्याही दिवशी तिथी होती अष्टमीची. करपात्री महाराज म्हणाले तसंच घडलं - संजय गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेतच होते. विमान अपघातात संजय गांधी गेले, इंदिराजींच्या शरीराची चाळणी झाली आणि बॉम्बस्फोटात राजीवजींच्या शरीराचे शतशः तुकडे झाले. 
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे काल उघडकीला आलेली महंतांच्या हत्येची घटना. दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला सुमारे 100-200 लोकांनी जीवे मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये घडली होती. या मारहाणीचा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. गुरुवारी रात्री गडचिंचले येथे ही घटना घडली. आणखी भयानक म्हणजे खुद्द पोलिसांनीच या साधूंना जमावाच्या ताब्यात दिलेले दिसते. कोरोनाच्या संकटाच्या हाताळणीमुळे आधीच वस्त्रहरण झालेल्या महाराष्ट्र सरकारवर यामुळे टिकेचा पुन्हा मारा झाला तर नवल नाही. 
भाजपला टांग मारून उध्दव ठाकरे यांनी सत्ता हस्तगत केली खरी, पण सत्ता राबवायची कशी यावरून त्यांची गोची झालेली साफ दिसते. गोएथेच्या 'फाउस्ट'मध्ये कथानायक ज्याप्रमाणे आपला आत्मा विकायला काढतो, तशी काहीशी गत ठाकरे व शिवसेनेची झालेली दिसते. फाउस्ट अत्यंत हुशार असतो, परंतु स्वतःच्या जीवनाबद्दल तो असमाधानी असतो. मग तो सैतानाशी समझोता करतो आणि स्वतःचा आत्मा विकतो. शिवसेनेने तेच केलेलं दिसतंय. 
ख्रिस्ती प्रसारक काँग्रेस आणि जेहादी राष्ट्रवादी काँग्रेसची भूते त्यांना हवं ते करत आहेत. राज्याच्या सत्तेच्या बदल्यात उद्धवनी त्यांना मोकळे रान दिल्यासारखं दिसतंय. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या न्यायाने कोरोनाचं संकट येऊन कोसळलं. राज्याचा कारभार कसा चालवावा हा वेगळा प्रश्न. त्यात मत मतांतरे होण्याची शक्यता भरपूर. त्यामुळे त्यात जायला नको. पण किमान माणसाच्या जीवाची तरी शाश्वती मिळावी, त्यात कुठल्या मानवी आगळीकीमुळे विघ्न येता कामा नये...इतकी अपेक्षा करणं फारसे वावगे म्हणता येणार नाही. दुर्दैवाने हीच शाश्वती आज राहिलेली नाही. शाश्वती जाऊ द्या, मुळात सरकारचीच भीती वाटायला लागलीय. सरकारचे मंत्रीच गुंडाचा डबल रोल करतायत. दिवसाढवळ्या लोकांना उचलून नेले जातेय, साधूंना पोलीस स्वतःच गुंडाचा हातात सोपवत आहेत...जी जी म्हणून जंगल राजची लक्षणे ऐकली होती ती प्रत्यक्षात येताना दिसताहेत. 
महाराष्ट्रातल्या किमान दोन पिढ्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकून आपली राजकीय मते बनविली आहेत. यापैकी बहुतांश लोक अजून हयात आहेत आणि बाळासाहेबांच्या मुलाच्या कारकिर्दीत त्यांच्याच विचाराची शकलं उडावीत, हे त्यांच्या मनाला आणखी घरे पाडणारी गोष्ट आहे. चार पाच दशके बाळासाहेबांनी जे 'विचाराचे सोने' दिले, ते असे मोडीत काढताना पाहून त्यांना जास्त वेदना होतात. उध्दव यांना टेकू देणाऱ्यांची कदाचित तीच इच्छा असावी. तरीही ज्या राज्यात साधूंच्या जीवाची खात्री नसते ते राज्य कधीही चांगले असू शकत नाही. आज नाही तरी अगदी अलीकडेपर्यंत शिवसेना हिंदुत्वाची जपमाळ ओढत होती. त्याच हिंदुत्वाचे दोन पूज्य व्यक्तिमत्व धर्ममाफियांच्या गुंडगिरीला बळी पडले आहेत. परोपकाराय सतां विभूतयः या न्यायाने ते काही बोलणार नाहीत, पण त्यांच्यावर श्रद्धा असणारे तेवढेच क्षमाशील असतील, असे नाही. त्यांच्यामधून कोणी करपत्री महाराज उभे करून घेऊ नका...किमान साधूंचे तरी श्राप घेऊ नका! 
देविदास देशपांडे